गुरुचरित्र : महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रमाणभूत उपासनाग्रंथ. दत्तसंप्रदायाचे एक आद्य प्रणेते नरसिंहसरस्वती (१३८३–१४५८) ह्यांचे हे चरित्र. नरसिंहसरस्वतींचा एक प्रमुख शिष्य सिद्ध मुनी याने रचिलेल्या संस्कृत गुरुचरित्राचाच हा विस्तृत अनुवाद असावा. सरस्वती गंगाधर हा ह्या ग्रंथाचा कर्ता. ह्याचे उपनाव साखरे. सु. १५३८ मध्ये त्याने हा ग्रंथ पूर्ण केला. सायंदेव → नागनाथ → देवराज → गंगाधर अशी आपली पितृपरंपरा तो सांगतो. सरस्वती गंगाधर हा कानडी ब्राह्मण असून तो मूळचा कडगंची येथील. त्याच्या आईचे नाव चंपा.

सिद्ध व नामधारक यांच्या संवादरूपाने लिहिलेल्या या ग्रंथात एकूण ५२ अध्याय (काही प्रतींत ५३) व ७,३०० च्या वर ओव्या आहेत. अध्यायांची विषयांनुसार स्थूल विभागणी अशी : १–मंगलाचरण, २ ते ४–दत्तावतार चरित्र, ५ ते १०–श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, ११ ते ५१–नरसिंहसरस्वती चरित्र, बावन्नावा अध्याय अवतरणिकेचा.

दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंहसरस्वती यांची लीलाचरित्रे गुरुभक्ती, निरनिराळ्या क्षेत्रांचे माहात्म्य इ. विषयांची सश्रद्ध वर्णने वर्णाश्रमधर्म, ब्राह्मणवर्गाचा वेदोक्त आचारधर्म, स्त्रियांची कर्तव्ये व नीतिधर्म इ. विषयांचे उपदेशपर निरूपण सकाम भक्तीचा पुरस्कार इ. विशेष या ग्रंथात आढळतात. तत्कालीन सांप्रदायिक संकेतांनुसार चमत्कारकथांचा भरणाही त्यात आढळतो. हा ग्रंथ शुचिर्भूतपणे सोवळ्यात वाचावा व सोवळ्यातच पूजावा, असा सांप्रदायिक संकेत आहे. ह्या ग्रंथातील शब्दांत मंत्रासारखे सामर्थ्य आहे, असे भाविक समजतात. स्त्रीशूद्रांना या ग्रंथाच्या केवळ श्रवणाचा अधिकार आहे वाचनाचा नाही, असे मानले जाते.

गुरुचरित्राच्या रचनेवर मुकुंदराजाच्या विवेकसिंधूचा प्रभाव असावा कारण विवेकसिंधूतील कित्येक दृष्टांत आणि ओव्या थोड्याफार फरकाने तशाच घेतलेल्या दिसतात. गुरुचरित्रातील वाङ्‌मयीन गुणवत्तेपेक्षाही दत्तसंप्रदायाचा पूज्य ग्रंथ म्हणूनच त्याला मुख्यतः मान्यता लाभलेली आहे. ह्या ग्रंथाची भाषाशैली सरळ, सुबोध असली, तरी गद्यप्राय आहे. सरस्वती गंगाधराची मातृभाषा कानडी असल्याने काही ठिकाणी कानडी लकबी आढळतात. ‘भाषा न ये महाराष्ट्र’ असे सरस्वती गंगाधराने ह्या ग्रंथात नमूद केले आहे. मात्र त्या काळी मुसलमानी राजसत्ता असूनही एकही यावनी शब्द यात आलेला नाही, हे विशेष आहे. ‘महाराष्ट धर्म’ हा शब्द ह्या ग्रंथात प्रथम आढळतो. सांप्रदायिक-असांप्रदायिक या दोहोंवरही या ग्रंथाची जबरदस्त पकड आहे. आकांक्षांच्या इष्ट फलश्रुतीसाठी याची सकाम पारायणे वा सप्ताह करतात. हा ग्रंथ मराठी-कानडीच्या स्नेहानुबंधाचे दृढीकरण करणारा आहे, असेही म्हटले जाते.

गोखले, विमल