गार्थिलासो दे ला व्हेगा: (१५०३–३६). स्पॅनिश कवी. जन्म टोलीडो येथे. तो स्पेनच्या राजदरबारी तसेच लष्करातही होता. एका लहानशा चुकीसाठी स्पेनच्या राजाने (पहिला चार्ल्स) त्याला काही काळ हद्दपार केले होते. फ्रेझ्यूसजवळ झालेल्या एका लढाईत जखमी झाल्यामुळे त्याला अकाली मृत्यू आला.

ओड, विलापिका, सुनीत गोपगीत इ. विविध काव्यप्रकार त्याने हाताळले. त्याच्या कविता थोड्या असल्या, तरी त्याने स्पॅनिश कवितेवर लक्षणीय परिणाम घडवून आणला. तिला नवी स्फूर्ती आणि चैतन्य दिले. विफल प्रेमाचे सूर त्याच्या काव्यात उत्कटपणे जाणवतात. कवितांसाठी नवे नवे छंद त्याने समर्थपणे वापरले. अभिजात काव्यादर्शांचा डोळसपणे स्वीकार केला. व्हर्जिल, पीत्रार्क, हॉरिस ह्यांसारख्या कवींच्या संस्कारांतून त्याने अल्पावधीतच स्वतःचे स्वतंत्र वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व घडविले. आल्मोगाव्हेर बॉस्कान हा स्पॅनिश कवी गार्थिलासोचा मित्र. गार्थिलासोच्या मृत्यूनंतर बॉस्कानच्या विधवा पत्नीने त्याच्या व बॉस्कानच्या कविता एकत्र छापून प्रसिद्ध केल्या (१५४३). द वर्क्स ऑफ गार्थिलासो दे ला व्हेगा (१८२३) ह्या नावाने त्याच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद संगृहीत केलेले आहेत.

कुलकर्णी, अ. र.