होव्हेल्यानोस, गास्पार मेल्कॉर दे : (५ जानेवारी १७४४–२७ नोव्हेंबर १८११). स्पॅनिश मुत्सद्दी आणि लेखक. अठराव्या शतकातल्या स्पॅनिश ज्ञानोदयाचा (एन्लाय्टनमेंट) अत्यंत महत्त्वाचा प्रतिनिधी. जन्म स्पेनमधील गिजॉन ह्या ठिकाणी. कायद्याचा अभ्यास केल्यानंतर त्याने सेव्हिल आणि माद्रिद येथे न्यायालयाशी संबंधित काही पदांवर काम केले (१७६७–७८). वाङ्मयाच्या आणि विद्वत्तेच्या क्षेत्रांतील त्याचे काम, तसेच त्याचा प्रामाणिकपणा आणि नैतिक आचरण ह्यांमुळे त्याला मोठी ख्याती मिळाली तथापि एका बदनाम ठरलेल्या मित्राच्या प्रकरणात त्या मित्राच्या वतीने अयशस्वी हस्तक्षेप केल्यामुळे त्याला माद्रिदमधून हद्दपार करून तो मूळचा ज्या प्रांतातला, त्या आस्तूऱ्यास प्रांतात जाऊन राहण्यास भाग पाडले गेले (१७९०–९७). तेथे त्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली आणि Informe sobre un Proyecto de ley agrania(इं. शी. रिपोर्ट ऑन अगेरियन लॉ) हा आपला ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात त्याने स्पेनमध्ये उदार आर्थिक तत्त्वांवर शेतीविषयक सुधारणा घडवून आणाव्यात, असे विचार मांडले होते. 

 

व्होव्हेल्यानोस याने १७९७ मध्ये काही महिन्यांकरिता न्यायखात्याचा मंत्री म्हणून काम केले. धर्मन्यायपीठांना (इंक्विझिशन्स) त्याचा विरोध होता. त्याचप्रमाणे स्पॅनिश राष्ट्रीय चर्चने रोमन चर्चच्या वर्चस्वातून मुक्त व्हावे, असे त्याचे प्रतिपादन होते. त्याच्या ह्या, तसेच अन्य राजकीय विचारांमुळे १८०१ मध्ये त्याला तुरुंगात जावे लागले. १८०८ मध्ये त्याला मुक्त करण्यात आले. ह्याच वर्षी नेपोलियनने स्पेनवर स्वारी करून ते पादाक्रांत केले होते. ह्या आक्रमकांच्या सरकारात होव्हेल्यानोसला पद मिळाले असते तथापि त्याने त्यास नकार दिला आणि देशाभिमान्यांच्या पक्षाला त्याने निष्ठा दिली. फ्रेंचांना विरोध करणाऱ्या शक्तींमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पुढे राष्ट्रीय विधिमंडळ (नॅशनल असेंब्ली) बोलावण्यातही त्याचा पुढाकार होता. राजेशाहीचा तो पुरस्कर्ता होता परंतु राजाने स्वेच्छावृत्तीने आपली सत्ता वापरू नये म्हणून त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी राष्ट्रीय विधिमंडळासारखी संस्था असावी, अशीही त्याची धारणा होती. अखेरीस तो अस्तूऱ्यासमध्ये राहावयास गेला तथापि नेपोलियनच्या निष्ठावंतांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे अस्तूऱ्यासमधून पळून जाताना व्हेगा येथे तो मरण पावला. 

 

होवेल्यानोसच्या हयातीत मुख्यतः मुत्सद्दी आणि देशभक्त म्हणूनच त्याची ख्याती होती. त्यामुळे त्याच्या वाङ्मयनिर्मितीकडे काहीसेदुर्लक्षच झाले तथापि तो एक नव-अभिजाततावादी कवीही होता. त्याने नाटके लिहिली आहेत. व्होव्हिनो ह्या टोपणनावाने त्याने काही लेखनकेले आहे. नैतिक तळमळीने त्याने लिहिलेल्या उपरोधप्रचुर कविताही दुर्लक्षित राहिल्या. 

कुलकर्णी, अ. र.