भवानी नदी : द. भारतातील कावेरी नदीची प्रमुख उपनदी. ही केरळ राज्यातील पालघाट (पालक्काड) जिल्ह्याच्या वेल्लुवनाड तालुक्यात, साइलेंट व्हॅलीच्या जंगल भागात उगम पावते. या पूर्ववाहिनी नदीची लांबी सु. १६९ किमी. आहे. ही नदी पुढे तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यात प्रवेश करीत पूर्व दिशेने वाहत जाऊन भवानी गावाजवळ कावेरी नदीस मिळते. धन्यकोट्टैजवळ मिळणारी मोयार ही भवानी नदीची प्रमुख उपनदी असून कोरंगपल्लम्, कुंदा, पेरिङ्‌गपलम्, सिरुवनी, कूनूर या अन्य नद्याही तिला मिळतात. नैऋत्य मोसमी पर्जन्यकाळात या नदीस मोठे पूरही येतात.

जलसिंचनाच्या दृष्टीने भवानी नदीस महत्त्व आहे. या नदीवर मोयार नदी-संगमाच्या खालील बाजूस सु.२ किमी. व सत्यमंगलमपासून सु. ७ किमी. अंतरावर लोअर भवानी प्रकल्पातील धरण बांधण्यात आले आहे. या धरणापासून ८३,८७० हे. क्षेत्रास पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे कोईमतूर जिल्ह्यात कापूस व अन्नधान्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

गाडे, ना. स.