कारवार : कर्नाटक राज्याच्या उत्तर कॅनरा जिल्ह्याचे ठाणे लोकसंख्या २७,७७० (१९७१). हे मुंबईच्या दक्षिणेस ४८८ किमी., समुद्रकिनाऱ्याला बैतकल उपसागरावर, काली नदीच्या मुखाशी असून बऱ्याच प्रमाणात मराठी भाषी आहे. इतिहासकाळात ही व्यापारी पेठ व विजापूर राज्यात देसायांचे ठाणे होते. १६३८ मध्ये इंग्रजांनी येथे वखार घातली. लौकरच मलमल, मिरी, वेलदोडे, निळे दडस ‘डंगारी’ कापड या मालाची निर्यात येथून होऊ लागली. शिवाजीने कारवारवर दोन वेळा स्वारी केली. इंग्रजांबरोबर पोर्तुगीज व डचांनीही येथून व्यापार सुरु केला. १६९७ मध्ये मराठ्यांनी कारवार पुन्हा उद्‌घ्वस्त केले. १७१५ मध्ये सोंडेकर संस्थानिकाने जुना किल्ला पाडून सदाशिवगड बांधला. १८०१ मध्ये जुने कारवार जवळजवळ नष्ट झाले. त्यानंतर मुंबई–कोचीन दरम्यानचे एक सुरक्षित बंदर म्हणून याचे महत्व टिकून राहिले. उपसागरात लहान लहान बेटे असून ऑयस्टर रॉक या खडकावर दीपस्तंभ आहे. मुंबईहून बोटीने, त्याचप्रमाणे हुबळीवरुन अर्बेल घाटाने १५० किमी. मोटारमार्गही आहे. नदीमार्गे येणारा अंतःप्रदेशातील उत्तम साग, जंगली लाकूड, बांबू या मालांखेरीज तांदूळ, नारळ तसेच मॅकरेल, सार्डिन व कॅटफिश या जातींचे मासे आणि सुकी मच्छी यांचा व्यापार येथे चालतो. कारवारला शुभ्र रेतीचा लांब किनारा, सुरुची दाट बने आणि भोवतालची वनश्री प्रेक्षणीय आहेत.

ओक, शा.नि.