भडोच : (भरुच) गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,१२,३८९ (१९८१). नर्मदेच्या मुखाशी तिच्या उजव्या काठावरील हे शहर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. भडोच या नावानेही ओळखले जाणारे हे शहर पश्चिम रेल्वेच्या मुंबई-दिल्ली मार्गावरील प्रस्थानक असून येथून जंबुसरला अरुंदमापी रेल्वेमार्ग जातो. ही एक बाजारपेठ असून येथे काही प्रमाणात कापड उद्योग चालतो.
स्थानिक आख्यायिकेनुसार भडोचची स्थापना भृगू ऋषींनी केली व त्यास ‘भृगुपूर’ असे नाव पडले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात हे मोठे बंदर म्हणून उदयास आले. तिसऱ्या शतकात जैनधर्मीय राजपूत व आठव्या ते तेराव्या शतकापर्यंत (७४६-१३००) अनहिलवाड राजे यांची ही राजधानी होती. त्यानंतर हे १३९१ ते १५३५ व १५३६ ते १५७२ पर्यंत अहमदाबादचे मुसलमान राजे, १५३५ ते १५३६ हुमायून, १५७२ ते १७५२ पर्यंत मोगल अशा वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांकडे होते. औरंगजेबाने याचे नाव ‘सुखावाद’ ठेवले होते व या कालखंडात शेवटी-शेवटी स्थानिक अंमलदार नबाव म्हणून वावरु लागले होते. पोर्तुगीजांनी हे १५३६,१५४६ व १६१४ या वर्षी, तर मराठ्यांनी हे १६७५ व १६८६ मध्ये लुटले. इंग्रजांनी भडोच प्रथम १७५२ मध्ये जिंकून नतंर शिंद्यांकडे सुपूर्द केले. अखेर १८०३ मध्ये इंग्रजांनी ते पुन्हा जिंकले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भडोच प्रथम मुंबई राज्यात व १९६० मध्ये गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आले.
सोमनाथ मंदिर व त्यामधील बळीराजाची यज्ञभूमी, भृगृ भास्करेश्वर मंदिर, रणछोडराय मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, पारशी अग्यारी, डचांची वखार, २२५ वर्षांपूर्वीची बेगमवाडी ही सुंदर वास्तू, गुजरात सुलतान तिसऱ्या महमूदचा अमीर इमाद-उल्-मुल्क याची कबर, जामा मशीद इ. शहरातील महत्त्वाची प्रेक्षणीय ठिकाणे होत.
पंडित, अविनाश