भट्टाचार्य, बीरेंद्रकुमार : (२४ मार्च १९२४-). ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात असमिया कादंबरीकर व कवी. त्यांचा जन्म आसाममध्ये सिबसागर येथे चहाच्या मळ्यावर झाला. चफरी येथील प्राथमिक शाळेत व नंतर ककजन येथील (जि. सिबसागर) एम्. ई. स्कूलमध्ये त्यांनी सुरवाताचे शिक्षण घेतले. १९४१ मध्ये जोरहाट हायस्कूल मधून ते मॅट्रिक झाले. बी. एस्.सी. व बी. ए. ह्या पदव्या त्यांनी अनुक्रमे १९४३ व १९४५ मध्ये गौहाती येथील कॉटन महाविद्यालयातून संपादन केल्या. १९५३ मध्ये गौहाती विद्यापीठातून ते एम्. ए. झाले. ‘असमिया साहित्यातील विनोद आणि विडंबन’ या शीर्षकार्याच्या प्रबंधासाठी त्यांना १९७९ मध्ये पीएच्.डी. मिळाली. १९४५ मध्ये बांहि (बासरी) ह्या वाङमयीन मासिकाचे, १९४६ मध्ये ॲडव्हान्स ह्या इंग्रजी सापप्ताहिकाचे, १९४७-४९ ह्या काळात दैनिक असमियाचे व १९४९-५१ या काळात जनता ह्या साप्ताहिकाचे ते सहसंपादक होते. यानंतर १९५३-६३ ह्या कालावधीत असमियातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या रामधेनू (इंद्रधनुष्य) ह्या साप्ताहिकाच्या संपादनाचे व १९६३-६७ ह्या काळात नवा युग ह्या सर्वाधिक खप असलेल्या साप्ताहिकाचे ते संपादक होते. यानंतर काही काळ केवळ पत्रकार म्हणून त्यांनी काम केले. सध्या गौहाती विद्यापीठात वृत्तपत्रविद्या विभागात प्रपाठक म्हणून ते काम करतात.

भट्टाचार्य यांनी १९४२ च्या राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला होता. १९४६ मध्ये झालेल्या कलकत्त्याच्या भीषण हत्याकांडाचे ते साक्षीदार होते. या हत्याकांडातील आपले निकटचे मित्र व उदयोन्मुख असमिया कवी अमूल्य बरुआ यांच्या हत्येचा त्यांना जबरदस्त धक्का बसला व ते दीर्घकाळा पर्यंत निष्क्रिय बनले. १९४९ मध्ये ब्रम्हदेशाच्या सीमेजवळील उखरुल नावाच्या एका नागा खेडयात ते शिक्षक म्हणून गेले. येथील चार वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी नागा लोक व नागा प्रदेश यांबद्दल विपुल माहिती मिळवली आणि फिझोच्या फुटीर चळवळीतून बाहेर पडून भारतीय राष्ट्रवादाला बळकटी आणण्यासाठी नागा तरुणांची मने वळविण्याचे परकाष्ठेचे प्रयत्न केले.

या विविध प्रकारच्या समृद्ध अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटलेले दिसते. व्यक्तिमत्वातील संवेदनशीलता व सच्चेपणा यांमुळे सामाजिक न्याय, समता, सत्य आणि मानवता यांकडे ते आकृष्ट झाले. गांधीजींचे तत्वज्ञान व त्यांची जीवनमूल्ये यांचे ते कडवे पुरस्कर्ते होते. जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीचाही त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. टॉमस हार्डी, टॉलस्टॉय, डॉस्टोव्हस्की, हेमिंग्वे इ. लेखक त्यांच्या लेखनाची प्रेरणास्थाने होत.

अतिशय परिश्रमपूर्वक केलेले समाजाचे वास्तव चित्रण आणि संयमित व काटेकोर भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टये आहेत. बदलती सामाजिक मूल्ये आणि सामाजिक घटनांचा अखंड प्रवाह यांचे बहुरंगी कलात्मक चित्रण त्यांच्या साहित्यात आढळते.

भट्टाचार्यांनी सु. २५ पुस्तके लिहीली आहेत. त्यातील काही महत्त्वाची पुढील प्रमाणे : आई (१९६१), इयरुइंगम (१९६१ म.शी.लोकशासन), कलोंग अजियो बोईं (१९६२ कलोंग अजून वाहत आहे), सातशाझी (१९६२ सात मुक्तमाला), शतध्नु (१९६५ शतधारांचे शस्त्र), मृत्युंजय (१९७०), प्रतिपद (१९७० प्रतिपदा),कबर अरु फुल (१९७२), वल्लरी (१९७३) इत्यादी. यांपैकी इयरुइंगमसाठी १९६१ चा चा साहित्य़ अकादेमीचा पुरस्कर आणि मत्य़ुंजयसाठी १९७९ चा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. हे दोन्ही पुरस्कार मिळविणाऱ्या आजपर्यतच्या लेखकांत ते वयाने सर्वात लहान आहेत.

इयरुइंगम या कादंबरीवर नामा प्रदेशातील वास्तव्याचा आणि त्या वातावरणात निर्माण झालेल्या संवेदनांचा प्रभाव जाणवतो. दुसऱ्या महायुद्धामुळे उदध्वस्त झालेल्या नागा लोकांच्या भावजीवनाचे मार्मिक आणि वास्तव दर्शन भट्टचार्यानी तीत घडविले आहे. त्याचबरोबर उखरुलच्या तान्खुल नागांच्या स्वातंत्र्यसाठी फिझोंनी केलेले क्रांतिकारी प्रयत्न प्रभावीपणे तीत चित्रित केले आहेत.

मृत्युंजय ही कादंबरी १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभुमीवर आधारलेली आहे. आघाडीच्या अनेक नेत्यांना तुरुंगवास घडल्यावर गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व बाजूला राहुन या आंदोलनाने हिंसक वळण घेतले व हे आंदोलन भारतातील शहरांत तसेच खेड्यांतही पसरले. आसाम याला अपवाद नव्हताच. प्रस्तुत कांदबरीत आसाममधील नोगोंग जिल्ह्यातील पश्चिम भागात घडलेल्या घटनांचे वर्णन आहे. एका स्वातंत्र्यसैनिकांच्या गटाने सैनिकांना वाहून नेणाऱ्या आगगाडीला उलथून पाडण्याचे केलेले यशस्वी प्रयत्न, या कथासूत्राभोवती ही कांदबरी गुंफलेली आहे. यातील सर्वच पात्रे निःस्वार्थीपणा व सच्ची देशभक्ती यांची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. घटनांच्या वर्णनाबरोबरच पात्रांच्या मानसिक अवस्थेचेही चित्रण मोठया कलात्मक ताकदीने त्यांनी केले आहे. कथेचा नायक आणि कटाचा सूत्रधार महादा गोसाईन स्थिरचित्ताने आपले कार्य पार पाडीत असतो तथापि गाडी उलटल्यानंतर सैनिकांचे मृत आणि छिन्नविच्छिन्न देह पाहून त्या हिंसक शोकांतिकेने तो संभ्रमित होतो.

स्वातंत्र्यासाठी आसामात झालेल्या संघर्षाचा मृत्युंजय हा नितान्तसुंदर आलेख आहे. आसामी लोकांची ज्यांच्यावर भक्ती आहे, परंतु ज्यांची चरित्रे अन्य कोणत्याही इतिहासग्रंथात मिळत नाहीत अशा अनेक आसामी हुतात्म्यांचे कलात्मक चरित्रचित्रण तीत आढळते. भारताच्या ईशान्येकडील दुरवरच्या कोपऱ्यात घडलेल्या स्वातंत्र्यसमराचा अमोल ठेवा व भावगद्याचा सुंदर नमुना म्हणून ही कादंबरी सदैव स्मरणात राहील.

राजपथे रिंगियाई (१९५७-राजपथाची हाक) या कादंबरीमध्ये मोहन नावाच्या एका कट्टर समाजवादी, क्रांतिकारी तरुणाच्या मानसिक संघर्षाचे व धक्कदायक अनुभवांचे चित्रण आहे. १५ ऑगस्ट रोजी सरकारविरुद्ध केलेल्या भाषणामुळे त्यास अटक होते, या एकाच घटनेभोवती या कांदबरीचे कथासूत्र गुंफलेले असून त्या विशिष्ट दिवसाचेच कलात्मक चित्रण तीत आहे.

भट्टाचार्य यांनी काही नाटकेही लिहीली असून आकाशवाणीवर ती प्रसारित झाली. त्यांनी काव्यरचनाही केली आहे. त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. एक सर्जनशील पत्रकार तसेच प्रतिभासंपन्न कवी व कांदबरीकार म्हणून त्यांनी आधुनिक असमिया पत्रकारितेस तसेच काव्यास व कांदबरीस नवे वळण प्राप्त करून दिले.

गोस्वामी, इंदिरा (इं.) मिरजकर, ललिता (म.)