भक्तिमार्ग : व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जाते, ती भावना म्हणजे भक्ती होय. ईश्वराविषयीचे आत्यंतिक व अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ति, असेही म्हणता येईल. ईश्वराचा अनुग्रह करून देण्याचे सामर्थ्य असलेली आचारपद्धती म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग होय. वेगवेगळ्या तत्त्वचिंतकांनी ईश्वराचा अनुग्रह मिळविण्याचे जे मार्ग सांगितले आहेत, त्यापैकी ईश्वरभक्ती हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची व्यक्तीच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव, समर्पणवृत्ती, भीती, ईश्वराचा अनुग्रह वा साक्षात्कार मिळविण्याची उत्कट इच्छा इत्यादींमधून व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना स्फुरते. ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सुर्वगुणसंपन्न, सृष्टीचा निर्माता आणि आपला उद्धारकर्ता आहे, हा विश्वासच या भावनेच्या निर्मितीला कारणीभूत होतो. या व्यापक अर्थाने जगातील सर्व समाजांतून भक्तिभावना आढळते. भारतात भक्तीचा विशिष्ट संप्रदाय असून त्याची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत. या संप्रदायालाच ‘भक्तिमार्ग’ असे म्हणतात. विविध देवता, माता, पिता, गुरू इ. विषयीच्या आदरभावालाही लक्षणेने भक्ती असे म्हटले. जाते. भक्ती हा शब्द ‘भज्'(सेवा करणे) या संस्कृत धातूपांसून बनला आहे. भक्त, भगवान, भागवत इ. शब्द त्याच धातूपासून बनले असून अर्थद्दष्टया ते ‘भक्ती’ या शब्दाशी संबद्ध आहेत.
भक्तीचा उगम : तसे पहावयास गेले, तर जगातील सर्व मानवसमूह फार प्राचीन काळापासूनच कोणत्या ना कोणत्या अतिमानवी शक्तीची भक्ती करीत आले आहेत. परंतु अनेक पाश्वात्त्य विद्वान मात्र जगातील भक्तीचा पहिला आविष्कार ख्रिस्ती धर्मातच झाला, असे मानतात. भारतीय लोकांनी भक्तीची संकल्पना ख्रिस्ती धर्मातूनच घेतली, असेही त्याचे मत आहे. परंतु भारतीय विद्वानांनी हे मत नाकारले आहे. काही विद्वानांनी भारतीय भक्तिसंप्रदायावर इस्लामचा प्रभाव असल्याचे मतही व्यक्त केले आहे. परंतु इतर अनेक जणांच्या मते भारतातील भक्तीचा उगम हा स्वतंत्रपणे भारतीय भूमीतच झाला आहे. वेदसंहितांमध्ये भक्तीची संकल्पना होती की नाही,या बाबतीतही विद्वानांत मतभेद आढळतात. वेदसंहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये भक्ती हा शब्द आढळत नाही. हा शब्द पहिल्यांदा श्वेताश्वतर उपनिषदात आढळतो. परंतु आचार्य बलदेव उपाध्यांच्या मते एखाद्या कालखंडात नसला, तरी त्या शब्दातून व्यक्त होणारी संकल्पना मात्र अस्तित्वात असू शकते. काही पाश्च्यात्य पंडितांच्या मते ऋग्वेदातील वरुणसूक्तांतून भक्ती ही भीतीवर आधारलेली आढळते. याउलट ह. दा. वेलणकर यांच्या मते वरुणसूक्तांत दिसणारी भक्ती ही भीतीवर आधारलेली असल्यामुळे खालच्या दर्जाची असून ऋग्वेदातील इंद्रसूक्तांतच खरी-खुरी भक्ती आढळते. भक्ती ही मूळची वैदिक परंपरेतून आलेली नसून ती अवैदिक आहे, असेही एक मत आढळते. भक्तीचा उगम द्रविड देशात झाला, हे भागवत पुराणातील विधान भक्तीच्या अवैदिकतेचे सूचक आहे. तमिळनाडूमधील आळवारनामक वैष्णव संतांनी (इ.स.सु.५००-८५०) भारतातील भक्तिपंथांचा प्रारंभ केला आणि त्यानंतर या पंथाचा भारतभर प्रसार झाला, असे काही विद्वानांचे मत आहे. आळवाराचा प्रबंधम् नावाचा ग्रंथच भक्तिपंथाचा मूलस्त्रोत आहे, असे ते मानतात. महाभारतामध्ये भक्तीची परंपरा पुढीलप्रमाणे सांगितली आहेः जगाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीला भक्तीचा उपदेश केला आणि त्यानंतर आदित्य, विवस्वान्, मनू व इक्ष्वाकू या क्रमाने प्राप्त झालेली भक्ती सर्व लोकांमध्ये पसरली.
विविध धर्मांतील भक्तीचे स्थान : विविध समाजातून व देशांतून वेगवेगळया स्वरुपात भक्तिभावनेचा आविष्कार झाल्याने आढळून येते. यहुदी वा ⇨ ज्यू धर्मामध्ये भक्तीच्या काही प्रभावी चळचळी होऊन गेल्या आहेत. ख्रिस्ती धर्म हा भक्तिप्रधानच आहे. इस्लाममध्ये ईश्वराविषयी आत्यंतिक श्रद्धा बाळगली जाते व या द्दष्टीने इस्लाममध्येही भक्तीचे माहात्म्य असल्याचे दिसून येते. जगातील वेगवेगळ्या आदिम जमाती जे धार्मिक व यात्वात्मक कर्मकांड करतात, त्यामध्ये भक्तीचाही अंश असतोच. जैन व बौद्ध हे धर्म निरीश्वरवादी असले, तरी त्या धर्मांमध्ये अनुक्रमे ⇨तीर्थंकर व ⇨ बुद्ध यांच्याविषयी असलेला पूज्यभाव भक्तीच्या स्वरुपाचाच असतो.
भक्तीचा आविष्कार विविध स्वरुपांत ⇨ हिंदू धर्मात झाला आहे. वेद व उपनिषदे यांमध्ये भक्तीचे स्वरुप अस्पष्ट होते. पाणिनीच्या (इ.स.पू.सु.४ थे शतक) सूत्रांवरुन असे दिसते, की त्याच्यापूर्वीच वासुदेवभक्ती रुढ झाली होती. कृष्णाच्या अवतारापूर्वी भक्तीला ऐकांतिक, नारायणी, ⇨ पांचरात्र, सात्वत इ. नावे होती. कृष्णानंतर भक्तीला ⇨ भागवत धर्माचे स्वरुप प्राप्त झाले. प्राचीन काळातील सनक, ⇨ नारद, ⇨ प्रह्लाद इत्यादींची नावे भक्त म्हणून विख्यात आहेत. द. भारतातील आळवारांनी वैष्णव भक्तीचा संप्रदाय निर्माण केला. दक्षिणेतच ⇨नायन्मार नावाचे त्रेसष्ट तमिळ संत शैव भक्त म्हणून विख्यात झाले (इ.स.सु.५ व्या शतकानंतर). भगवद्गीता व भागवत पुराण या ग्रंथानी भारतातील भक्तिमार्गाला असाधारण प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. ⇨रामानुजाचार्य, ⇨मध्वाचार्य, ⇨वल्लभाचार्य व ⇨निवार्क या वेदान्ती आचार्यांनी मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून भक्तीचे माहात्म्य प्रस्थापित केले. रामानुजांच्या परंपरेतील स्वामी ⇨ रामानंद यांनी उत्तर आणि मध्य भारतात रामभक्तीचे एक अत्यंत प्रभावी आंदोलन निर्माण केले.⇨ तुलसीदास हे महान रामभक्त होऊन गेले. ⇨ चैतन्य संप्रदायाने भक्तीला साधन न मानता पाचवा पुरुषार्थ म्हणजेच सर्वश्रेष्ठ साध्य मानले, ⇨ कबीरानी निर्गुण भक्तीचा पुरस्कार केला. ⇨ सूरदास, ⇨ मीराबाई इ.असंख्य भक्तांनी भक्तिमार्गामध्ये आपले महान योगदान दिले. महाराष्ट्रात ⇨ वारकरी संप्रदायाने वैष्णव भक्तीचा प्रचंड प्रभाव निर्माण केला. ⇨ ज्ञानेश्वर, ⇨ नामदेव, ⇨ जनाबाई, ⇨ एकनाथ, ⇨ तुकाराम, ⇨ रामदास इ. विख्यात संत महाराष्ट्रातच होऊन गेले. शिव (⟶ शिवदेवता ), ⇨ विष्णू, ⇨ गणपती, ⇨ दत्तात्रेय, ⇨ काली, सूर्य (⟶ सूर्यदेवता ) इ. विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची भक्ती करणारे अनेक संप्रदाय भारतात होऊन गेले असून त्यांचा समाजजीवनावर मोठा प्रभाव पडलेला आहे. (⟶ माध्व संप्रदाय वैष्णव संप्रदाय शैव संप्रदाय ).
भक्तीचे कर्मकांड : भक्तिमार्गामध्ये श्रद्धेला व भावनेला अधिक महत्व असल्यामुळे कर्मकांडाचे स्थान तत्त्वतः गौण असते. किंबहुना भक्तिमार्गामध्ये काटेकोर कर्मकांडाविरुद्ध एक प्रकारची बंडखोरीच आढळून येते. तत्त्वतः असे असले, तरी प्रत्यक्षात श्रद्धेचा आविष्कार होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कर्मकांडाची गरज भासतेच. त्यामुळे भक्तीचेही विशिष्ट असे एक ⇨ कर्मकांड आढळून येते. पूजा, प्रार्थना, तीर्थयात्रा, तीर्थ व प्रसाद यांचे सेवन, नामस्मरण, भजन-कीर्तन, चिंतनमनन इत्यादींचा या कर्मकांडात अंतर्भाव होतो. हिंदू भक्त ईश्वरी ⇨ अवतार व ⇨ मूर्तिपूजा यांना विशेष महत्त्व देतात. भक्तिमार्गामध्ये ⇨ गुरुचे माहात्म्य विशेष असून त्याच्या उपदेशानुसार त्याचे अनुयायी आपला आचार ठेवतात. साधुसंत व भक्त यांच्याविषयाही विशेष आदरभाव व्यक्त केला जातो आणि त्यांच्या सहवासाची अपेक्षा केली जाते.
मोक्षाचा मार्ग : भारतात स्थूलमानाने मोक्षप्राप्तीचे ज्ञान, कर्म व भक्ती असे तीन मार्ग मानले जातात. ⇨ योग हा स्वतंत्र मार्ग मानणारे लोकही आहेत. या विविध मार्गांपैकी कोणत्या मार्गाला किती महत्त्व द्यावयाचे, या बाबतीत आणि हे मार्ग एकमेकांना पूरक, पर्यायी की बाधक आहेत या बाबतीत विविध संप्रदाय, भक्त इत्यादींमध्ये मतभेद आहेत. भक्तिमार्गी संतांच्या मते भक्ती हाच यापैकी सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. काही जणांना ज्ञान, कर्म व भक्ती या तिन्हींचा समुच्चय इष्ट वाटतो. भक्तीला दुय्यम मानणारे विचारवंतही आहेत. याउलट, भक्ती हे मोक्षाचे साधन नसून ती मोक्षापेक्षाही श्रेष्ठ असा पाचवा पुरुषार्थ म्हणजेच साध्य आहे, असे मानणारे भक्तही आहेत. (⟶ मोक्ष ).
भक्तीचे प्रकार : भक्तीचे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून वेगवेगळे प्रकार मानण्यात आले आहेत. सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असे दोन प्रमुख प्रकार होतात. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य असे पाच प्रकारही मानण्यात आले आहेत. मनात काहीतरी हेतू बाळगून केली जाणारी ती हैतुकी भक्ती आणि निर्हेतुकपणे केली जाणारी ती अहैतुकी भक्ती होय. हैतुकी ही ‘गौणी’ व ‘अहैतुकी’ ही ‘मुख्या’ वा ‘परा’ भक्ती मानली जाते. यांपैकी हैतुकीचे सात्त्विकी, राजसी व तामसी असे तीन पोटप्रकारही सांगण्यात आले आहेत. शास्त्रांना अनुसरुन केली जाणारी व गौण असलेली वैघी भक्ती आणि ईश्वरावरील नितान्त प्रेम दर्शविणारी व प्रमुख असलेली रागात्मिका भक्ती, असेही दोन प्रकार आहेत. गौणी भक्ती करणाऱ्या भक्ताचे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्था असे तीन प्रकार पाडण्यात आले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन हे भागवतपुराणाने सांगितलेले भक्तीचे नऊ प्रकार आहेत. या प्रकारांची संख्या नऊ असल्यामुळेच या भक्तीला ‘ नवविधा ‘ भक्ती असे नाव रुढ झाले आहे. नारदाने गुणमाहात्म्य, रुप, पूजा, स्मरण, दास्य, सख्य, कांताभाव, वात्सल्य, आत्मनिवेदन, तन्मयता व परमविरह अशा अकरा आसक्तींमध्ये भक्तीचे वर्गीकरण केले आहे.
ईश्वर व भक्त यांचे नाते : ईश्वर व भक्त यांच्या नात्याविषयी विविध धर्म, संप्रदाय व भक्त यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. ईश्वर हा स्वामी, पिता, माता, बंधू, गुरु, सखा, आत्मा इ. विविध नात्यांनी निर्दिष्ट करण्यात आला आहे. खरे म्हणजे या बाबतीत नाती दर्शविणारे लिंगवाचक शब्द हे लाक्षणिक असतात. ईश्वर परमप्रेमास्पद आहे, हेच या शब्दांतून सूचित करावयाचे असते. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी वेगवेगळ्या संदर्भांत ईश्वराबरोबर भक्ताची वेगवेगळी नाती मानली आहेत. ईश्वर हा सर्व आणि सर्वस्व आहे. इतर संतांनीही अशीच विविध नाती मानल्याचे आढळते. ⇨ इस्लाम धर्मात ईश्वर हा स्वामी व भक्त हा त्याचा दास, असे मानले आहे. ⇨ ख्रिस्ती धर्मांत ईश्वराला पिता मानले आहे. ईश्वराला आई मानणारे अनेक संत, विशेषतः महाराष्ट्रात, होऊन गेले. काही ⇨ शाक्त पंथीय उपासकांनी स्वतःला आई. व देवाला पुत्र मानल्याचेही सांगितले जाते. ⇨ मधुराभक्तिनामक भक्तीच्या विख्यात प्रकारात ईश्वराला पती वा प्रियकर आणि स्वतःला पत्नी वा प्रेयसी मानले जाते. स्वतः स्त्री असलेल्या मीराबाईसारख्या भक्तांनी तर हे नाते मानले आहेच परंतु ⇨ चैतन्य महाप्रभू, ⇨ गुलाबराव महाराज इ. पुरुषभक्तांनीही स्वतःला ईश्वराची प्रियतमा मानले आहे. ⇨ सूफी पंथाच्या भक्तांनी ईश्वराला प्रेयसी आणि स्वतःला प्रियकर मानून ईश्वरभक्ती केल्याचे आढळते. अर्जुन, सुदामा इ. भक्त हे ईश्वराला सखा मानणारे होते.
भक्तिविषयक वाङमय : जगातील विविध भाषांतून निर्माण झालेल्या वाङमयाचा बराचसा भाग भक्तिविषयक साहित्याने भरलेला आहे. ⇨ बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ भक्तिभावनेने ओतप्रोत भरलेला आहे, असे मानले जाते. भारताच्या सर्व प्रमुख भाषांतून विपुल प्रमाणात भक्तिविषयक साहित्य आढळते. विविध संतकवींचे लेखन या संदर्भात लक्षणीय आहे. ⇨आळवारांचा प्रबंधम् हा ग्रंथ भारतातील भक्तीमार्गाचा मुलस्त्रोत मानला जातो. नायन्मारांचे भक्तसाहित्य शास्त्र, चरित्र व स्त्रोत्र या तिन भागांत विभागलेले आहे. ⇨ भगवदगीता व भागवत वा ⇨ भागवतपुराण हे भक्तिमार्गाचे दोन प्रमुख आधारग्रंथ होत. शांडिल्यभक्तिसूत्रे आणि नारदभक्तिसूत्रे हे दोन सूत्रग्रंथ भक्तीची शास्त्रीय मांडणी करणारे असून या ग्रंथावर भाष्येही झाली आहेत. रूप गोस्वामी (१४९२-१५९१) यांचा भक्तिरसामृतसिंधु, मधुसूदन सरस्वती (सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध) यांचा भक्तिरसायन, लक्ष्मीघर (चौदावे शतक) यांचा श्रीभगवन्नामकौमुदी, अनंतदेव (सतराव्या शतकाची अखेर) यांचा भक्तिनिर्णय इ. ग्रंथ भक्तीचे विवेचन करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. हिंदी साहित्याचा विशिष्ट कालखंड हा ‘भक्तिकाल’ म्हणूनच ओळखला जातो. भक्ती हा स्वतंत्र रस मानून त्यानुसार साहित्यशास्त्राची फेरमांडणी करणारे शास्त्रकारही होऊन गेले आहेत. भरताचार्य आणि मम्मटादी इतर प्रमुख शास्त्रकारांनी भक्तीला रस मानलेले नाही, परंतु मधुसूदन सरस्वती, ⇨ रूप गोस्वामी इत्यादींनी मात्र भक्ती हा रस मानून त्याचे स्थायीभाव, विभाव इत्यादींचे विवेचन केले आहे. काहींनी तो सर्वश्रेष्ठ रस असल्याचेही म्हटले आहे. [⟶ रससिद्धांत].
भक्तिचा प्रभावः भारतात इतिहासपुराणांनी परिपुष्ट केलेल्या आणि विविध संतांनी अंगीकारलेल्या भक्तिमार्गामुळे वैदिक यज्ञयागांची पीछेहाट झाली. यज्ञयगांमध्ये गुंतागुंतीचे कर्मकांड होते. याउलट, भक्तिमार्ग मात्र अगदी सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनेदेखील सुलभ, सुबोध व सहजसाध्य होता. सर्व जातींच्या व वर्णांच्या स्त्री-पुरूषांना या मार्गात प्रवेश होता व आहे. हा मार्ग प्रामुख्याने प्राकृत भाषांतून मांडला गेल्यामुळेही तो सर्वसामान्यांना अधिक जवळचा वाटला. कष्ट, पैसा, वेळ इ. बाबतीत हा मार्ग सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातील होता. म्हणूनच तो अधिक लोकप्रिय झाला. वस्तुतः भक्ती हे मुक्तीचे एक साधन असते. परंतु संतांनी भक्तीला मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ मानले. ईश्वराची भक्ती करीत असताना जन्ममरणाच्या फेऱ्यात पुनःपुन्हा फिरावे लागले, तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, असे भक्तीचे माहात्म्य त्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच भक्ती हे एक साधन न राहता साध्यच बनले आहे. भक्तिमार्गनुसार परमभक्तीच्या अनुभवासाठी परलोकात जावे लागत नाही, अंतिम सत्याचा या जगातच अनुभव घेता येतो, हेही या मार्गाचे एक वैशिष्ट्य होय. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे, तिच्यामध्ये भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा आहे. संगीत, साहित्य इ. कलांच्या विकासातही भक्तिमार्गाचा वाटा आहे. जगातील इतर देश व धर्म यांच्या संस्कृतीची निर्मिती करण्यामध्येही त्या त्या ठिकाणच्या भक्तिमार्गने महत्वाची कामगिरी पार पाडल्याचे दिसते.
पहाः कर्मयोग ज्ञानमार्ग.
संदर्भः 1. Bhandarkar. R. G. Vaisnavlsm, Saivism and Minor Rellgious Systems, Varanasi, 1965.
2. Datta, Aswini kumar, Bhaktiyoga, Bombay, 1959.
3. Goswmi, Bhagbat kumar, The Bhakti Cult in Ancient India, Varanasi, 1965.
४. बहिरट, भा. पं. भक्तिसाधना, मुंबई, १९८१.
५. वेलणकर, ह. दा. ऋग्वेदातील भक्तिमार्ग, पुणे, १९५२.
६. शर्मा, मुंशीराम, भक्तिका विकास, वाराणसी, १९५८.
साळुंखे, आ. ह.