भंडारदरा: महाष्ट्रातील अहमदनगर जिल्हाच्या अकोला तालुक्यातील एक गाव. लोकसंख्या १,४३५ (१९७१). प्रवरा नदीवर भंडारदरा गावाजवळ काळसूबाई व बालेश्वर या दोन टेकड्यांदरम्यान विल्सन हे धरण बांधले असून तेच भंजारदरा धरण म्हणून ओळखले जाते. धरणाच्या जलाशयास ‘आर्थर सरोवर’ असे नाव देण्यात आले आहे. धरणाचे बांधकाम १९१० मध्ये सुरू होऊन १९२६ मध्ये पूर्ण झाले. १,१३,९०,०६० रु. खर्चून बांधलेल्या या चिरेबंदी धरणाची लांबी ४८७.८० मी. व उंची ८२.२९ मी असून पाणी साठविण्याची क्षमता ३,१२७ लक्ष घ.मी. आहे. मध्यंतरीच्या काळात धरणाच्या भिंतीस भेगा पडल्याने १९६९-७० मध्ये सु. २ कोटी रु. खर्चुन त्याची दुरुस्ती करण्यात आली. या धरणातील पाणी नदीत सोडले असून धरणापासून ९० किमी. अंतरावर ओझर या गावाजवळ प्रवरा नदीवर २५३ मी. लांबीची व ८.८४ मी. उंचीची चिरेबंदी भिंत बांधली आहे. येथूनच डावा व उजवा असे दोन कालवे (लांबी १२९.१४ किमी.) काढले असून त्यांव्दारे संगमनेरचा काही भाग, श्रीरामपूर, नेवासे व राहुरी या तालुक्यातील ३२,००० हे. क्षेत्रातील खरीप व रब्बी पिकांना व प्रामुख्याने ऊस, कापूस या नगदी पिकांना पाणीपुरवठा होतो. या धरणाच्या जलसिंचनाने अहमदनगर जिल्हातील दुष्काळी भागाचे चित्र पूर्णपणे बदललेले आढळते. भंडारदऱ्याच्या पूर्वेस ९ किमी. अंतरावरील रंधा धबधबा ६० मी. उंचीचा असून त्याच्या पूर्वेस प्रवरा नदीने १३ किमी. लांबीची घळई तयार केली आहे. भंडारदरा येथून राज्य महामार्ग क्र. १० जातो.

भंडारदारा धरण

निसर्गरम्य परिसरामुळे सहलीचे व विश्रांतीचे ठिकाणी म्हणून भंडारदरा प्रसिद्ध आहे. आर्थर सरोवरामध्ये नौकाविहाराचीही सोय आहे. पर्यटकांसाठी भोजन-निवासादी चांगल्या सोयी उपलब्ध असून जवळच असलेला रंधा धबधबा व कळसूबाई शिखर ही पर्याटकांची महत्वाची आकर्षणे आहेत.

 कमलापूर,पां.म.