ब्रूनाई: बोर्निओ बेटाच्या वायव्य भागातील ब्रिटिशरक्षित इस्लामी राज्य. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४ २’ उ. ५ ३’ उ. व ११४ ४’ पू. ते ११५ २२’ पू. यांदरम्यान. क्षेत्रफळ ५,७६५ चौ. किमी. लोकसंख्या २,१५,००० (१९८० अंदाज). उत्तरेकडे दक्षिण चिनी समुद्राचा १६० किमी. लांबीचा किनारा लाभला असून बाकीच्या सर्व बाजूंनी मलेशियाच्या सारावाक राज्याने ब्रूनाई वेढलेले आहे. सारावाक राज्यातील १३ ते ५२ किमी. रुंदीच्या लिंबांग नदीखोऱ्याने हे राज्य दोन भागांत विभागले आहे. त्यामुळे पश्चिमेकडील तीन जिल्ह्यांपासून टेंबुराँग हा पूर्वेकडील जिल्हा अलग झाला आहे. बांदार सेरी बगावन-पूर्वीचे ब्रूनाई-(लोकसंख्या ८०,००० – १९८० अंदाज) ही या राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : किनाऱ्यावरील अरुंद मैदानी प्रदेश वगळता राज्याचा बाकीचा भूप्रदेश डोंगराळ व ओबडधोबड आहे. तथापि प्रदेशाची उंची क्वचितच १,२२० मी. पर्यंत आढळते. अतिपश्चिमेकडील भागात लाबी टेकड्या असून त्यांची कमाल उंची ३९६ मी. पर्यंत आढळते. टेंबुराँग जिल्ह्याचा विशेषतः दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायू ही येथील प्रमुख नैसर्गिक संपदा आहे. खनिज तेलाचे साठे किनाऱ्यावर व अपतट भागात आहेत. अपतट भागातील उत्पादन अधिक आहे. नद्यांच्या संचयनापासून निर्माण झालेली जलोढीय व पीट मृदा किनारी भागात, तर नापीक अशी जांभी मृदा डोंगराळ भागात आढळते.

ब्रूनाईचे जलवाहन प्रामुख्याने बालाइट, टूटाँग, ब्रूनाई व टेंबुराँग या नद्यांनी केलेले असून या सर्व नद्या दक्षिणेकडे उगम पावून उत्तरेकडे दक्षिण चिनी समुद्राला जाऊन मिळतात. बालाइट ही येथील सर्वांत जास्त लांबीची नदी आहे.

ब्रूनाईचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. उष्ण व दमट हवामान असलेल्या या राज्याच्या सखल प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान २८० सेंमी. व उंचवट्याच्या प्रदेशात ३८० सेंमी. पेक्षा अधिक आहे. बहुतेक पर्जन्य नोव्हेंबर ते मार्च या काळात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा काळ त्या मानाने कोरडा असतो, तथापि पूर्ण कोरडा ऋतू येथे नसतो. वार्षिक सरासरी तपमान २७ से. असते. रात्री थंड असतात.

भरपूर उष्णता आणि आर्द्रता यांमुळे येथे वनस्पतींचे दाट आच्छादन निर्माण झालेले आढळते. राज्याचा ७५% भाग उष्ण कटिबंधीय वर्षारण्यांनी व्यापला आहे. अंतर्गत भाग अधिक जंगलव्याप्त आहे. अरण्यांत कठीण लाकडाच्या वृक्षांचे आधिक्य आहे. काही वृक्षप्रकार आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे असले, तरी वाहतुकीच्या अपुऱ्या सोयींमुळे लाकूडतोडउद्योग मर्यादितच राहिला आहे. अरण्यांत वाघ, सिंह, माकडे इ. प्राणी तसेच विविध प्रकारचे पक्षी, किटाणू, सरडे, साप इ. आढळतात.

 इतिहास व राजकीय स्थिती: फार पूर्वीपासून येथे मानवी वसाहती असल्या, तरी ब्रूनाईचा प्राचीन इतिहास विशेष ज्ञात नाही. इ. स. ५१८ पासून चिनी व्यापाऱ्यांचा ब्रूनाईशी व्यापार चालत असावा. त्यावेळी या राज्याचा ‘पूनी’ असा उल्लेख केल्याचा संदर्भ मिळतो. बांदार सेरी बगावनपासून ३ किमी. अंतरावरील कोटा बाटू येथे जुनी नाणी सापडली असून ती आठव्या शतकातील असावीत. कारण त्यावेळी चीन व पूर्व बोर्निओ यांदरम्यानचा व्यापार बराच भरभराटीस आला होता. सातव्या आणि तेराव्या शतकांच्या कालावधीत श्रीविजय (सुमात्रा) व मजपहित (जावा) या भारतीय संस्कृतीची छाप असलेल्या राजसत्तांनी आपली सत्ता ब्रूनाईच्या प्रदेशात विस्तारली. तसेच चिनी संस्कृतीचा प्रभावही येथे येऊन पोहोचला. सुंग राजघराण्याच्या कारकीर्दीतील बखरीनुसार ९७७ व १०८२ मध्ये ब्रूनाईचे चिनी बादशहाला खंडणी पाठविल्याचा उल्लेख मिळतो.

पंधराव्या शतकात येथील श्रीविजय व मजपहित या राजसत्तांचा अस्त झाला व ब्रूनाईचे इस्लामीकरण होऊन सुलतानशाहीची स्थापना करण्यात आली. ब्रूनाईबरोबरच ती सत्ता बोर्निओ बेटाच्या इतर भागातही विस्तारली आणि यूरोपियनांची सत्ता येथे येईपर्यंत टिकली. मॅगेलनच्या तुकडीतील दोन जहाजे ब्रूनाई उपसागरात आली होती (जुलै १५२१). १५८० मध्ये स्पॅनिशांनी यावर ताबा मिळविला मात्र त्यांचा ताबा जास्त काळ राहिला नाही. १६०० मध्ये पोर्तुगीजांनी ब्रूनाई शहरात व्यापारी वखारीची व रोमन कॅथलिक मिशनची स्थापना केली. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात यूरोपीय व्यापाऱ्यांनी व धाडशी प्रवाशांनी या बेटाला वारंवार भेटी दिल्या, तसेच स्पॅनिशांनी दोनदा आक्रमणही केले. पोर्तुगीज, डच व स्पॅनिशांची येथील शक्ती जसजशी वाढत गेली, तसतशी ब्रूनाईतील सुलतानशाही ऱ्हास पावत गेली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तर सांप्रतच्या सारावाक व साबाचा काही भाग यांवरच ब्रूनाईच्या सुलतानाची सत्ता राहिली.

सारावाकमधील मले व खुष्की दायाक या लोकांनी ब्रूनाईविरुद्ध बंड पुकारले (१८३९). पंतप्रधान म्हणून काम करणारा राजा मुडा हसिम (सुलतानाचा चुलता) याने हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात तो अयशस्वी ठरला. ऑगस्ट १८३९ मध्ये जेम्स ब्रुक हा इंग्रज कूचिंग येथे आला. हसिमच्या विनंतीनुसार त्यानेसुद्धा हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या मदतीच्या बदल्यात त्याला ‘राजा’ हा किताब बहाल करण्यात आला आणि सारावाकमधील लुंडू, बाऊ व कूचिंगची सत्ता त्याच्याकडे सोपविण्यात आली. नंतरच्या चार दशकांत ब्रूनाईच्या सुलतानाचे सारावाकमधील वर्चस्व अधिकच कमी होऊन ब्रिटिशांचे वर्चस्व वाढत गेले. १८८८ ते १९५९ या कालावधीत तर ब्रूनाईच्या सुलतानाचे केवळ दुय्यम स्थानच राहिले. १९३१ पासून येथे तेल-उत्पादनास सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धकाळात हा प्रदेश जपानच्या ताब्यात जाऊन (१९४२ ते १९४५ दरम्यान) तेलविहिरी आणि रबराचे मळे यांचे बरेच नुकसान झाले. जून १९४५ मध्ये यावर ऑस्ट्रेलियनांनी ताबा मिळविला. १९४६ मध्ये ब्रिटिश नागरी प्रशासनाची पुनः स्थापना झाली.

ब्रूनाईतील सुलतानाचे १९५९ च्या संविधानानुसार पुन्हा एकदा वर्चस्व वाढले. नव्या संविधानानुसार डिसेंबर १९६२ मध्ये येथे पहिली निवडणूक झाली. मात्र त्यावेळी ब्रूनाई, उ. सारावाक आणि साबाचा द. भाग येथे सशस्त्र उठाव झाला. जुलै १९६३ मध्ये मलेशिया महासंघाचा सभासद होण्याचे ब्रूनाईच्या सुलतानाने नाकारले. १९७१ मध्ये ग्रेट ब्रिटनने ब्रूनाईला अंतर्गत स्वयंशासनाचा अधिकार देऊन परराष्ट्रीय व्यवहाराची जबाबदारी आपल्याकडे ठेवली आणि संरक्षणविषयक बाबतीत सल्ला देण्याचे धोरणही चालू ठेवले.


ब्रिटिशांशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासाठी व येथे चालू असलेली चाचेगिरी मोडून काढण्यासाठी १९४७ मध्ये ब्रूनाईचा सुलतान व ग्रेट ब्रिटन यांच्यात झालेला करार आणि १८८८ मध्ये झालेल्या अशाच एका दुसऱ्या करारामुळे ब्रूनाईच्या राज्यकारभारात ब्रिटिशांचा हस्तक्षेप वाढत गेलेला आढळतो. पुढे १९०६ च्या करारानुसार तर सुलतानाच्या अधिकारांवर आणखीच निर्बंध आले. १९५९ मध्ये ब्रूनाईचे प्रशासन सारावाकपासून वेगळे करून ब्रूनाईसाठी ब्रिटिश उच्चायुक्ताची नेमणूक करण्यात आली. याच वर्षी सुलतानाने राज्याची पहिली लिखित राज्यघटना जाहीर केली. तीनुसार प्रशासनाच्या सोयीसाठी प्रिव्ही कौन्सिल, मंत्रिपरिषद (कार्यकारी परिषद), विधान परिषद, धार्मिक परिषद, उत्तराधिकार परिषद अशा पाच परिषदांची स्थापना करण्यात आली. राज्याचा मुख्यमंत्री हा कार्यकारी प्राधिकरणाच्या वापराबाबत सुलतानाला जबाबदार असतो. राज्याचा सचिव, महान्यायप्रतिनिधी व राज्य वित्तीय अधिकारी हे मुख्यमंत्र्याचे साहाय्यक असतात.

 राज्यकारभाराच्या सोयीसाठी ब्रूनाईची चार जिल्ह्यांत विभागणी केली आहे. ब्रूनाईचा सुलतान सर मुदा हसनल बोलकेह व ब्रिटिश शासन यांच्यामध्ये जून १९७८ मध्ये झालेल्या वाटाघाटींनुसार व ७ जानेवारी १९७९ मध्ये झालेल्या करारानुसार १९८३ च्या अखेरीस ब्रूनाईतील ब्रिटिशांची सत्ता पूर्णपणे संपुष्टात येऊन ब्रूनाई हा एक स्वतंत्र व सार्वभौम देश बनणार आहे. सिंगापूरचे पंतप्रधान ली क्वान यू व मलेशियाचे पंतप्रधान दातुक हुसेन ओन यांनी ब्रूनाईला दिलेल्या भेटींमुळे (१९७९) या दोन देशांबरोबरचे संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.

पीपल्स इंडिपेंडन्स फ्रंट (स्था. १९६६) हा येथील प्रमुख पक्ष आहे. ‘ब्रूनाई पीपल्स नॅशनल युनायटेड पार्टी’ (स्था. १९६८) हा पक्ष विशेष क्रियाशील नाही तर ‘ब्रूनाई पीपल्स पार्टी’ वर बंदी घालण्यात आलेली आहे.

न्यायदानासाठी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, अपील न्यायालय आणि प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीची दंडाधिकारी न्यायालये आहेत. मुस्लिम धर्मांतर्गत विवाह, तलाक इ. धार्मिक बाबींबाबतच्या न्यायदानासाठी स्वतंत्र न्यायालय आहे.

संरक्षणविषयक बाबींत ग्रेट ब्रिटन सल्ला देत असून गुरखा बटालियन ही ब्रिटिश सैन्याची येथे असलेली २,४०० सैनिकांची तुकडी (१९८०) १९८३ पर्यंत येथे ठेवण्यात येणार आहे. ‘रॉयल ब्रूनाई मले रेजिमेंट’ मध्ये २,८५० सैनिक होते (१९८०). संरक्षणव्यवस्था पुरेशी असून भूसेनादल, नाविकदल आणि हवाईदल ही सर्व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत. सैन्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. १९८० मध्ये पोलीसदलात १,७५० लोक होते.

आर्थिक स्थिती : ब्रूनाईची अर्थव्यवस्था उद्योगप्रधान असून ती येथे सापडणाऱ्या खनिज तेल व नैसर्गिक वायू या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहे. १९२९ मध्ये खनिज तेलाचा प्रथम शोध लागून आज खनिज तेल म्हणजे ब्रूनाईच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणाच बनला आहे. एकूण कामकरी लोकांपैकी ७% पेक्षा अधिक लोक तेलउद्योगात गुंतले आहेत. खनिज तेल हे राज्याच्या महसुलाचे व निर्यातीचेही प्रमुख साधन आहे. खनिज तेल व पेट्रोल यांवरील करांपासून राज्याला बराच महसूल प्राप्त होतो. ब्रिटिश राष्ट्रकुलातील हा सर्वांत जास्त तेल उत्पादक प्रदेश असून आग्नेय आशियातील सर्वांत उच्च राहणीमान येथे आढळते. १९२९ मध्ये सापडलेल्या सारीआ तेलक्षेत्रातून तेलाचे कमाल उत्पादन निघते. बरेचसे खनिज तेल तसेच निर्यात केले जाते व फारच थोडे सारीआ येथे शुद्ध करून देशांतर्गत वापरासाठी ठेवले जाते. नैसर्गिक वायूच्या उत्पादनासाठीही ब्रूनाई जगात प्रसिद्ध आहे. अशुद्ध खनिज तेलाची निर्यात नळांवाटे सारावाकमधील टूटाँग, मिरी येथील तेलशुद्धीकरण केंद्राकडे केली जाते. सारीआ हे प्रमुख तेलक्षेत्र असून ते टूटाँगशी नळमार्गाने जोडले आहे. १९६९ मध्ये ब्रूनाईला एकूण निर्यात उत्पन्नापैकी ९९% उत्पन्न खनिज तेल निर्यातीपासून मिळाले. १९७९ मध्ये राज्याला खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या निर्यातीपासून ४२० कोटी ब्रूनाई डॉलर इतके उत्पन्न मिळाले. ‘ब्रूनाई शेल पेट्रोलियम कंपनी’ कडून येथील तेलव्यवहार पाहिला जातो. या कंपनी मध्ये ब्रूनाई शासनाची ५०% भागीदारी आहे. १९७९ मध्ये खनिज तेल व पेट्रोल यांचे उत्पादन अनुक्रमे ८,८०,६४,००० व ७,४४,००० पिंपे झाले. १९८२ मध्ये ब्रूनाईची तेल शुद्धीकरणाची क्षमता प्रतिदिनी २,००० पिंपांवरून १०,००० पिंपांवर जाण्याची शक्यता होती.

नैसर्गिक वायूचे उत्पादन १९७९ मध्ये १,०२७ कोटी घ. मी. झाले. १९७९ मध्ये १.२६ कोटी घ. मी. द्रवीकृत नैसर्गिक वायूची निर्यात करण्यात आली. लूमूट येथील नैसर्गिक वायूचे द्रवीकरण करणारा प्रकल्प हा जगातील सर्वांत मोठा प्रकल्प समजला जातो. याची द्रवरूप वायुनिर्मितीची वार्षिक क्षमता ६० लक्ष टन असून १९७७ मध्ये सु. ८०% क्षमतेचा उपयोग करण्यात आला. ब्रूनाईचा जपानशी एक करार झाला असून त्यानुसार ६०० कोटी ब्रू. डॉलर किंमतीचा द्रवीकृत नैसर्गिक वायू २० वर्षांच्या कालावधीत जपानला पुरविला जाणार आहे. बोटी बांधणे, विणकाम, तांब्याची व चांदीची भांडी तयार करणे हे ब्रूनाईतील इतर उद्योग होत.

राज्याच्या क्षेत्राच्या १०% क्षेत्र शेतीसाठी वापरले जाते. शेतीयोग्य बरीचशी जमीन अविकसितच आहे. राज्याच्या अन्नधान्याच्या एकूण गरजेपैकी ८०% गरज ही आयातीमधून भागविली जाते. तांदूळ, टॅपिओका, अननस, केळी, ऊस, साबूदाणा ही प्रमुख कृषि उत्पादने असून अलीकडे कॉफी, कोको, नारळ, तंबाखू, फळे व भाजीपाला यांच्या उत्पादन वाढीकडे अधिक लक्ष दिले जात आहे. परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख उत्पादन म्हणून पूर्वी महत्त्व असलेल्या रबराचे महत्त्व आता कमी झाले आहे. १९७७ मध्ये रबर उत्पादन १,००० मे. टन झाले. १९७८ मध्ये कृषि- उत्पादन पुढील प्रमाणे होते : (उत्पादन हजार मे. टन) तांदूळ ७, टॅपिओका ३, केळी २, रताळी १.

वनविकास करण्याच्या उद्देशाने जपानी कंत्राटदारांना क्वाला बालाइट येथे कागदाचा लगदा तयार करणारा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकूण निर्यातीत वनोत्पादन निर्यातीचे प्रमाण  मात्र १% पेक्षा कमी आहे. रबर, मिरी, लाकूड, बूच ही प्रमुख वनोत्पादने होत. मिरीचे उत्पादन प्रामुख्याने क्वाला बालाइट जिल्ह्यातील लाबी येथे घेतले जाते. येथील लोकांच्या आहारात माशांना महत्त्वाचे स्थान असून ग्रेट ब्रिटनच्या ‘व्हाइट फिश ऑथॉरिटी’ कडून येथील खोल समुद्रातील मासेमारीचा विकास केला जात आहे. १९७९ मध्ये२,२३२ मे. टन मासे पकडण्यात आले. २ कोटी ब्रूनाई डॉलर खर्चून ४०४.७ हे. क्षेत्रात एक मत्स्यसंवर्धन आणि झिंगासंवर्धन क्षेत्र निर्माण करण्याची महत्वाकांक्षी योजना असून ते आशियातील सर्वांत मोठे क्षेत्र ठरणार आहे. कुक्कटपालन व वराहपालन क्षेत्राचे कार्य दोन कंपन्यांकडून पाहिले जात होते. (१९७८). पशुधनाबाबत १९८४ पर्यंत स्वयंपूर्ण होण्याच्या उद्दिष्टाने पशुपैदास प्रकल्प उभारण्याची घोषणा जपानच्या मित्सुबिशी निगमाने केली असून (१९७९) त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ४० लक्ष ब्रू. डॉ. खर्चाची योजना होती. १९७८ मध्ये पशुधन आणि पशुउत्पादन पुढीलप्रमाणे होते : गुरे ३,००० म्हशी १३,००० डुकरे १३,००० शेळ्या १,००० कोंबड्या ९,९४,००० बदके ४५,००० कोंबडीचे मटण ३,००० मे. टन, अंडी १,६०० मे. टन गुरांचे कातडे ८२ मे. टन.


तेल व नैसर्गिक वायूच्या निर्यात किंमतीत १९७२ पासून सतत वाढ होत गेल्याने ब्रूनाईचा व्यापारशेष अनुकूल बनला आहे. १९७९ च्या एकूण निर्यात उत्पन्नात अशुद्ध तेलाचा ६७.९%, द्रवीकृत नैसर्गिक वायूचा २५.५% व खनिज तेल उत्पादनांचा ४.९% हिस्सा होता. १९७९ मध्ये एकूण आयात ८६.२१ कोटी व निर्यात ५७९.६५ कोटी ब्रू. डॉ. इतकी झाली. निर्यात मुख्यत्वे जपान (७०.९%), अमेरिका (८.४%), सिंगापूर (६.०%), तैवान (४.२%), सारावाक यांना तर आयात जपान (२५.७%), सिंगापूर (२१.३%), अमेरिका (१६.८%) व ग्रेट ब्रिटकडून (९.९%) केली गेली. अन्नधान्य, निर्मिती वस्तू, यंत्रे, वाहतुकीची साधने इत्यादींची आयात केली जाते. तांदूळ हे प्रमुख आयात धान्य असून ते मुख्यतःथायलंडकडून आयात केले जाते. थायलंड प्रतिवर्षी २०,००० ते २५,००० टन तांदूळ ब्रूनाईला पुरवितो. ब्रूनाईतील व्यापार यूरोपीय व चिनी अभिकरण गृहांकडून व चिनी व्यापाऱ्यांकडून चालविला जातो. येथे चार श्रमिक संघ आहेत.

शासनाच्या १९२.३० कोटी ब्रू. डॉलर इतक्या महसुलापैकी १५० कोटी ब्रू. डॉ. महसूल करांपासून प्राप्त झाला (१९७८). १९७९ चा सार्वजनिक आय व व्यय अनुक्रमे १८८.२० कोटी व १०४.८० कोटी ब्रू. डॉ. तर १९८० चा अंदाजे सार्वजनिक आय व व्यय अनुक्रमे ४४९ कोटी आणि १२३.७० कोटी ब्रू. डॉ. होता. येथे वैयक्तिक आयकर नाही. कंपन्यांकडून त्यांच्या नफ्यावर सरसकट ३०% या दराने कर घेतला जातो. कर, स्वामित्वशुल्क, गुंतवणुकीवरील व्याज ह्या उत्पन्नाच्या प्रमुख बाबी तर संरक्षण, शिक्षण, सार्वजनिक कामे, वैद्यकीय सेवा, पोलीस ह्या खर्चाच्या प्रमुख बाबी आहेत. काही रक्कम विकास निधीत टाकली जाते. महसुलाचे प्रमाण बरे असले, तरी गेली काही वर्षे अंदाजपत्रकात रस्ते, गटारे किंवा त्यांसारख्या प्राथमिक गरजेच्या गोष्टींच्या विकासावर भर देण्याऐवजी संगमरवरी मशिदी बांधण्यावर अधिक भर देण्यात आला होता. परंतु शासनाच्या आर्थिक नियोजनावर तज्ञांनी केलेल्या टीकेमुळे या धोरणात बदल करण्यात आला. चौथ्या पंचवार्षिक राष्ट्रीय विकास योजनेत लोकांच्या  आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासास प्राधान्य देण्यात आले आहे.

ब्रूनाई डॉलर हे येथील चलन असून ते जून १९६७ पासून अंमलात आले आहे. तत्पूर्वी मलायन डॉलर हे चलन होते. १, ५, १०, २० व ५० सेंटची नाणी आणि १, ५, १०, ५० व १०० ब्रू. डॉलरच्या नोटा असतात. १०० सेंटचा १ ब्रू. डॉलर होतो. जून १९८० मध्ये विनिमय दर पुढीलप्रमाणे होता : १ ब्रू. डॉ. = १ सिंगापूर डॉ. १ स्टर्लिंग पौंड = ४.९५ ब्रू. डॉ. १ अमेरिकी डॉ. = २.१२ ब्रू. डॉ. १०० ब्रू. डॉ. = २०.१९ स्टर्लिंग पौंड = ४७.१५ अमेरिकी डॉ. येथे एकूण आठ बँकांच्या २४ शाखा होत्या (जून १९७९). बांदार सेरी बगावन येथे नॅशनल बँक ऑफ ब्रूनाई ही बँक आहे. अमेरिका आणि मलेशिया यांच्या प्रत्येकी दोन आणि ग्रेट ब्रिटन, हाँगकाँग, सिंगापूर यांची प्रत्येकी एक एक बँक आहे.

राज्यात रस्त्यांची बांधणी फारशी झालेली आढळत नाही. रस्त्यांची एकूण लांबी १,३१३ किमी. आहे. राजधानी बांदार सेरी बगावन, सारीआ व काला बालाइट या तेल शहरांना आणि टूटाँग यांना जोडणारे प्रमुख रस्ते आहेत. बाकीचे रस्ते लाबी हे ठिकाण किनाऱ्याशी जोडणारे आहेत. ग्वारा-टूटाँगदरम्यान राजमार्ग-बांधणीचे काम चालू आहे. येथे सार्वजनिक लोहमार्ग नाहीत. ब्रूनाई शेल पेट्रोलियम कंपनीकडून सारीआ- बादास यांदरम्यान लोहमार्ग वाहतूक केली जाते. जलवाहतुकीला मात्र येथे अधिक महत्त्व आहे. बांदार सेरी बगावन व क्वाला बालाइट ही प्रमुख नदीबंदरे आहेत. बांदार सेरी बगावन येथील धक्क्याचा उपयोग स्थानिक वाहतुकीसाठी केला जातो, तर जास्तीत जास्त सागरी वाहतूक ग्वारा या खोल सागरी बंदरातून चालते. बांदार सेरी बगावन ते लाबूआन व बांगर यांदरम्यान फेरीने प्रवासी वाहतूक चालते. सिंगापूरच्या ‘द स्ट्रेट्स स्टीमशिप कंपनी’कडून ब्रूनाई, सिंगापूर आणि मलेशिया यांदरम्यान नियमितपणे प्रवासी वाहतूक केली जाते. यांशिवाय हाँगकाँग, सारावाक, साबा यांच्याशीही जलवाहतूक चालते. बांदार सेरी बगावन येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अंदुकी येथे खाजगी विमानतळ असून तो ब्रूनाई शेल पेट्रोलियम कंपनीकडून चालविला जातो. मलेशिया, सिंगापूर, बँकॉक, मानिला, हाँगकाँग, प. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन यांच्याशी ब्रूनाईची हवाई वाहतूक चालते. हवाई वाहतूकीच्या या सेवा ‘रॉयल ब्रूनाई एअरलाइन्स’ (आरबीए), सिंगापूर एअरलाइन्स, कॅथे पॅसिफिक एअरवेज, ब्रिटिश एअरवेज या कंपन्यांकडून पुरविल्या जातात. १९७८ मध्ये येथे एकूण ४३,८४४ वाहने होती, त्यांपैकी खाजगी मोटारगाड्या ३४,३३५ टॅक्सी १०४ मोटार-सायकल व स्कूटर २,२३४ मालगाड्या ५,८१५ बसगाड्या २१४ व इतर वाहने १,१४२ होती. १९७९ मध्ये ३,५३३ पर्यटकांनी ब्रूनाईला भेट दिली. राज्यात ७ डाक कार्यालये (१९७५), १५,६०० दूरध्वनी ३५,००० रेडिओ संच व २७,५०० दूरचित्रवाणी संच होते (१९८०). रेडिओ व दूरचित्रवाणीवरून मले, इबान, दुसून, इंग्रजी आणि चिनी भाषांतून कार्यक्रम प्रसारित केले जातात.

लोक व समाजजीवन : राज्याच्या एकूण २,१५,००० लोकसंख्येपैकी १,१८,१९० (५५.५%) लोक मले ५४,१५० (२५.५%) चिनी २५,८०० (१२%) मूळ देशवासीय व १४,७०० (७%) इतर वंशांचे लोक आहेत. इतरांमध्ये इबान, कदाझान, यूरोपीय यांचा समावेश होतो. बहुसंख्य लोक इस्लाम धर्माचे असून काही ख्रिश्चन व बौद्ध धर्मीयही आहेत. जन्मप्रमाण दरहजारी २७ व मृत्युप्रमाण दरहजारी ३.४ आहे (१९७९).

अंतर्गत भागात लोकसंख्या विरळ असून तेथे प्रामुख्याने येथील मूळ रहिवाशी राहतात. जंगल साफ करून तेथे ते अस्थायी स्वरूपाची शेती करतात. किनारी प्रदेशातील व नदी खोऱ्यांमधील मले, इबान, कदाझान व चिनी लोक कायमची वस्ती असणारे व स्थायी स्वरूपाची शेती करणारे आहेत. त्यांची घरे लाकडी किंवा बांबूची, गवताच्या छपराची आणि जमिनीपासून उंच डांबांवर बांधलेली असतात. ते भात, मिरी, सागो यांची शेती करतात. त्यांच्या झोपडीभोवती नारळ व काही फळझाडे असतात. थोड्याफार प्रमाणावर रबराची लागवड केलेली आढळते. किनारी भागात शेतीला पूरक असा मासेमारी व्यवसाय केला जातो. कृषिउत्पादकता कमी असून शेतकरी गरीबच आहेत. सारीआ, क्वाला बालाइट ह्या तेलक्षेत्रांत व राजधानी बांदार सेरी बगावन येथे लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आढळते. राजधानीतील काम्पुंग अयेर ह्या जुन्या भागातील बांबूची घरे ब्रूनाई नदीपात्रात  डांबांवर बांधलेली असून ती एकमेकांशी छोट्याछोट्या बोटींनी आणि साकव मार्गांनी जोडली आहेत.

मले, इंग्रजी व चिनी या तीन भाषांमधून शिक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या शाळा येथे आहेत. मले माध्यमाच्या सर्व शाळा सरकारी, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरकारी वा खाजगी आहेत. चिनी माध्यमाच्या शाळांना मात्र सरकारी मदत नसते. मले व इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिक्षण मोफत आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृह व प्रवासाच्या सोयी मोफत पुरविल्या जातात. काही धार्मिक शाळाही येथे चालविल्या जातात. ब्रूनाईमध्ये एकूण २५ बालोद्यानांत २,६६१ विद्यार्थी १५७ प्राथमिक शाळांत ३३,०५३ विद्यार्थी २७ माध्यमिक शाळांतून १५,५७१ विद्यार्थी २ शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांत ५३३ विद्यार्थी व ३ व्यावसायिक विद्यालयांत ३०६ विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९७८). उच्च शिक्षणाची मात्र येथे सोय नसल्याने ते शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रूनाईबाहेर जावे लागते. एकूण ४९४ ब्रूनाई विद्यार्थी ब्रूनाईबाहेर उच्च शिक्षण घेत होते (१९७८). १९७९ मध्ये शिक्षणावर ९.३० कोटी ब्रू. डॉ. इतका खर्च करण्यात आला.

बोर्निओ बुलेटिन (इंग्रजी साप्ताहिक), मले, इंग्रजी व चिनी भाषांतील पोलेता ब्रूनाई (साप्ताहिक) व सालम (पाक्षिक) आणि इंग्रजी, मले भाषांतील पेट्रोलियम दी ब्रूनाई ही वृत्तपत्रे येथून प्रसिद्ध होतात. ब्रूनाई हे कल्याणकारी राज्य असून समाजोपयोगी सोयी उपलब्ध आहेत. वैद्यकीय सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या आहेत.  वयोवृद्ध, निराधार व आजारी लोकांना अर्थसाहाय्य दिले जाते.

राजधानी बांदार सेरी बगावन हे येथील प्रमुख शहर व बंदर, ब्रूनाई नदीमुखापासून आत १४.५ किमी. वर वसले आहे. बाजार, व्यापार, बंदर, निवास व उपहारगृहे इ. सोयींनी युक्त असे हे शहर आहे.

संदर्भ :  1. Fisher, C. A. South East Asia, London, 1966.

            2. Hall, D. G. E. A History of South East Asia, London, 1968.

            3. Tregonning, K. G. A History of Modern Sabah: 1881-1963, Oxford, 1965.  

          

चौधरी, वसंत.