ब्रिस्टल : ग्रेट ब्रिटनच्या ॲव्हन परगण्यातील इतिहासप्रसिद्ध प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या ४,२५,२०० (१९७१ अंदाज). हे लंडनच्या पश्चिमेस २१० किमी., ब्रिस्टल चॅनलपासून १३ किमी., ॲव्हन व फ्रोम नद्यांच्या संगमावर वसले आहे.

प्रारंभी हे रोमनांच्या आधिपत्याखाली होते. पुढे नॉर्मन कालखंडात (इ. स. १०६६ पासून) यास व्यापारकेंद्र म्हणून महत्व प्राप्त झाले. यास शहराचा दर्जा १९५५ मध्ये मिळाला व तिसऱ्या एडवर्डच्या (कार. १३२७ – ७७) आदेशान्वये स्वतंत्र परगण्यात त्याचे रूपांतर झाले. त्या काळात लोकरी कापडनिर्मिती व व्यापार यांत हे शहर अग्रगण्य होते. ब्रिटिश साम्राज्य काळात जागतिक व्यापारकेंद्र म्हणून लंडनच्या खालोखाल यास महत्व प्राप्त झाले. या संदर्भात ‘सोसायटी ऑफ मर्चंट्स व्हेंचर्स ऑफ ब्रिस्टल’ ही संस्था उल्लेखनीय आहे. अठराव्या शतकानंतर मात्र गुलामांच्या व्यापारबंदीमुळे तसेच लँकाशर येथील कापड व्यवसायाच्या विकासामुळे येथील व्यापार मंदावला. एकोणिसाव्या शतकाखेरीपासून येथील बंदरातील सुविधांत वाढ करण्यात आली.

यादवी युद्धकाळात राजनिष्ठांचे हे प्रमुख केंद्र होते. दुसऱ्या महायुद्धात बाँबवर्षावामुळे याची हानी झालेली होती. १९७४ पर्यंत हे ग्लुस्टेशर परगण्यात समाविष्ट होते, पण तदनंतर नवनिर्मित ॲव्हन परगण्यात समाविष्ट झाले.

एक उद्योगप्रधान शहर म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथील विमान उद्योग हा अग्रगण्य असून, कागदछपाई, रसायने, जहाजबांधणी, अन्नप्रक्रिया इ. उद्योग विकास पावले आहेत. येथून चॉकोलेट, तंबाखू, केळी, साखर इत्यादींची आयात तर रसायने, तयार माल इत्यादींची निर्यात होते.

अटलांटिक सफरीसाठी १८३८ मध्ये ‘ग्रेट वेस्टर्न’ हे वाफेवरील जहाज येथून रवाना झाले. येथील ब्रिस्टल विद्यापीठ (स्था. १९०९) उल्लेखनीय आहे. पहिल्या एलिझाबेथ राणीने इंग्लंडमधील एक सुंदर व उल्लेखनीय चर्च म्हणून ज्याची प्रशंसा केली ते सेंट मेरी रॅडक्लिफ चर्च (बारावे शतक), त्याचप्रमाणे जॉन वेस्ली चॅपेल (१७३९) हे जगातील पहिले मेथडिस्ट पंथाचे चॅपेल, रॉयल थिएटर (१७६६), कॅबट टॉवर, क्लिफ्टन झुलता पूल इ. पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी होत.

गाडे, ना. स.