ब्रिंडिसी : इटलीच्या दक्षिण भागातील आपूलीया (पूल्या) विभागातील ब्रिंडिसी प्रांताची राजधानी व देशातील एक प्रमुख बंदर. हे एड्रिॲटिक समुद्रावर वसलेले आहे. लोकसंख्या १,३०,००० (१९८० अंदाज). मध्यवर्ती स्थानामुळे रोमनकाळात हे शहर रोम, नेपल्स, मिलान, बोलोन्या, तूरिन या शहरांशी जोडलेले होते. पूर्वीच्या रस्त्यांच्या जागीच आता राष्ट्रीय हमरस्ते दिसतात. ब्रिंडिसी बंदर आयोनियन, भूमध्य व इजीअन समुद्रांवरील बंदरांना मध्यवर्ती असून ते जलमार्गाने ग्रीसकडे जाण्याचे देशातील प्रमुख द्वार समजले जाते. इटली हा देश यूरोपीय आर्थिक संघटनेचा सभासद झाल्यापासून ब्रिंडिसीचे महत्व खूपच वाढलेले आहे. यूरोप, आफ्रिका व आशिया यांना जोडणाऱ्या हवाई मार्गांवरील सर्व विमाने ब्रिंडिसीला थांबतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोस्त राष्ट्रांचा नाविक तळ येथे होता. इटलीचा एड्रिॲटिक समुद्रावरील नाविक तळ येथे आहे.
ग्रीक दंतकथेनुसार डायोमीडोझ याने हे शहर वसविले, असे म्हणतात. इ.स.पू. २६७ मध्ये हे शहर रोमन लोकांच्या आधिपत्याखाली आले. त्या काळात ते ‘ब्रंडिझिअम’ या नावाने ओळखले जाई. रोमनांनी येथे नाविक तळ उभारून प्रसिद्ध ‘ॲपिअन वे’ (ॲपिअस सीकस या रोमन प्रशासकाच्या नावावरून) हा महामार्ग बांधून ते रोमशी जोडले. त्यामुळे त्यास लष्करी महत्त्व प्राप्त झाले. इ. स. पू. ४० मध्ये या शहरी ऑगस्टस व अँटनी यांच्यात समेट झाला. प्रसिद्ध रोमन महाकवी व्हर्जिल याचे निधन येथेच झाले (इ. स. पू. १९). रोमनकाळानंतर ब्रिंडिसी ग्रीक, नॉर्मन, स्पॅनिश, फ्रेंच व जर्मन यांच्या अंमलांखाली होते. रोमनांनंतर नॉर्मनांच्या कारकीर्दीतही याची प्रगती झाली. धर्मयुद्धांच्या काळात (१०९६ – १२९१) ख्रिस्ती धर्मयोध्दयांचा प्रमुख लष्करी तळ या ठिकाणी होता. धर्मयुद्धानंतर ब्रिंडिसीचा ऱ्हास झाला त्यातच चौदाव्या शतकाच्या अखेरीस नेपल्सच्या वारसा युद्धात व १४५६ च्या भूकंपात या शहराची अतोनात हानी झाली. नेपल्सच्या कारकीर्दीत या शहराचा योजनाबद्ध विकास करण्यात आला. सुएझ कालव्यामुळे या बंदरास व्यापारी महत्व प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या काळात येथील नाविक तळास अनन्यसाधारण महत्व होते.
शहराच्या परिसरात खनिज तेलाचे उत्पादन वाढल्यापासून येथील औद्योगिकीकरणास चालना मिळाली. येथे रसायने, खनिज तेलशुद्धीकरण, मासेमारी, प्लॅस्टिक, मद्ये, ऑलिव्ह तेल, अन्नप्रक्रिया इ. उद्योगधंदे विकसित झालेले आहेत. ‘ॲपिअन वे’ चे आग्नेयीकडील शेवटचे टोक म्हणून बांधण्यात आलेला संगमरवरी स्तंभ, सॅन बेनेदेत्तो, सँता मारिया देल कॅसल, सॅन जोव्हान्नी अल् सेपोल्को (सांप्रत वस्तुसंग्रहालय) चर्च, तसेच सम्राट दुसरा फ्रेड्रिक याने बांधलेला किल्ला इ. स्थळे पर्यटकांची खास आकर्षणे आहेत.
भागवत, अ. वि. गाडे, ना. स.