बेर्गिउस, फ्रीड्रिख : (११ ऑक्टोबर १८८४-३० मार्च १९४९). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. उच्च दाबाखाली घडणाऱ्या रासायनिक विक्रियाचें संशोधन व विकास केल्याबद्दल त्यांना व ⇨ कार्ल वॉश यांना १९३१ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. बेर्गिउस यांचा जन्म गोल्डश्मिडेन (जर्मनी) येथे व उच्च शिक्षण लाईपसिक येथे झाले. १९०७ साली लाइपसिक विद्यापाठाची डॉक्टरेट पदवी मिळविल्यानंतर त्यांनी व्ही. एच. नेर्न्स्ट, एफ. हावर व ई. बोडनस्टाइन यांच्या हाताखाली संशोधन केले. १९०७ साली हॅनोव्हर येथे विद्यापीठ व्याख्यात्याची पात्रता मिळविल्यावर त्यांनी उच्च दाबाखाली घडून येणाऱ्या रासायनिक विक्रियांचे तपशीलवार संशोधन सुरू केले. प्रथम त्यांनी अशा विक्रियांचा अनिष्ट परिणाम होणार नाही अशी उपकरणे तयार करणे व दीर्घकाळ उच्च दाब देता यावा यासाठी झडपांची योजना करणे, यांविषयी कार्य केले. नंतर उच्च दाबाखाली विक्रियांचा वापर करून औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची रसायने बवनिण्याकडे त्यांनी लक्ष दिले. निसर्गात लाकडापासून दगडी कोळसा कसा बनतो याचे स्पष्टीकरण त्यांनी मिळविले. आणि पीट व सोल्युलोज यांच्या कार्बनीकरण प्रक्रियेद्वारे नैसर्गिक दगडी कोळशासारखा पदार्थ बनविला.

दगडी कोळशावर पाण्याच्या वाफेची क्रिया करून हायड्रोजन वायू मिळविण्याची पद्धती त्यांनी शोधून काढली. त्याचवेळी खनिज तेलाच्या उत्पत्तीचा अभ्यास करून त्यांनी कार्बनयुक्त द्रव्यांची हायड्रोजनाशी विक्रिया घडवून द्रवरूप पदार्थ देणाऱ्या प्रक्रियांविषयी प्रयोग केले. खनिज तेलापासून पेट्रोल मिळविण्यासाठी तेलावर त्यांनी हायड्रोजनाची विक्रिया केली त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीपेक्षा जास्त पेट्रोल मिळू लागले. जास्त कार्बन अणू असलेल्या खनिज तेलाच्या रेणूपासून कमी कार्बन अणू असलेले पेट्रोल मिळविण्याच्या या प्रक्रियेला भंजन म्हणतात. १९१३ साली या प्रक्रियेचे एकस्व (पेटंट) त्यांनी व जॉन बिलविलर यांनी मिळविले. १९१४ साली ते एसेन येथील गोल्डश्मिट कंपनीच्या नवीन संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख झाले व त्यांनी हायड्रोजनीकरणाविषयी (रेणूत हायड्रोजन घालण्याच्या प्रक्रियेविषयी) संशोधनास सुरुवात केली. हायड्रोजनीकरण व विहायड्रोजनीकरण (रेणूतून हायड्रोजन काढून टाकण्याची प्रक्रिया) यांच्यातील समतोल हा तापमान, हायड्रोजनाचा अंशिक दाब व हायड्रोकार्बनाच्या रेणूंचे आकारमान यांवर अवलंबून असल्याचे त्यांना आढळले. हायड्रोजनाचे प्रमाण कमी असलेल्या दगडी कोळशाचे ऊष्मीय भंजन करण्याआधी कोळशाचे भरपूर हायड्रोजनीकरण करावे लागते, हे त्यांनी शोधून काढले. नंतर त्यांनी लाकडातील सेल्यूलोजापासून साखर व त्या साखरेपासून अल्कोहॉल, डेक्स्ट्रॉज वा यिस्ट मिळविण्याचे प्रयोग केले. जर्मनीत पहिल्या महायुद्धाच्या काळात या पद्धतीने थोड्या प्रमाणात साखर व इतर द्रव्य तयार करण्यात आली होती. एथिलीनापासून एथिलीन ग्लायकॉल व क्लोरोबेंझिनापासून फिनॉल बनविण्याच्या विक्रियांविषयी त्यांनी संशोधन केले होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी माद्रिद (स्पेन) येथे एक कंपनी स्थापन केली होती. १९४७ साली ते अर्जंटिना शासनाचे शास्त्रीय सल्लागार झाले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथापैकी द यूज ऑफ हाय प्रेशर इन केमिकल ॲक्शन (१९१३) हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. ते ब्वेनस एअरीझ (अर्जंटिना) येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.