लँगम्यूर, अर्विंग : (३१ जानेवारी १८८१-६ ऑगस्ट १९५७). अमेरिकन भौतिकीय रसायनशास्त्रज्ञ. घन व द्रव पृष्ठभागांवरील रेणवीय पटलांसंबंधीच्या यांच्या अध्ययनामुळेकलिल संशोधनाच्या क्षेत्रात व जीवरसायनशास्त्रात नवे दालन उघडले. त्याबद्दल त्यांना १९३२ सालचे रसायनशास्त्रचे नोबेल पारितोषिक मिळाले.

लँगम्यूर यांचा जन्म ब्रुकलिन (न्यूयॉर्क) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अल्पकाळ फ्रान्समध्ये व नंतर न्यूयॉर्क येथे झाले. १९०३ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ माइन्सची धातुविज्ञानाची पदवी मिळविली. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते जर्मनीला गेले. तेथे त्यांनी डब्ल्यू. एच्. नेर्न्स्ट यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९०६ मध्ये गटिंगेनविद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविली. अमेरिकेला परतल्यावर न्यू जर्सीमधील स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉ लॉजीमध्ये ते रसायनशास्त्राचे निदेशक झाले.

पुढे स्कनेक्टडी (न्यूयॉर्क) मधील इलेक्ट्रिक कंपनीमध्ये ते काम करू लागले व १९५० मध्ये निवृत्त होईपर्यंत ते तेथेच काम करीत होते. नंतर मृत्यूपावेतो ते या कपंनीचे सल्लागार होते.

वायूंमधील विद्युत् विसर्जन, इलेक्ट्रॉन उत्सर्जन इ. विषयांवर त्यांनी अनुसंधान केले तसेच टंगस्टन तंतूच्या विजेच्या दिव्यांचे आयुष्य वाढविण्यासंबंधी संशोधन केले. यांखेरीज त्यांनी निर्वात पंप, रेडिओ प्रक्षेपणात वापरल्या जाणाऱ्या उच्च निर्वात नलिका व ३,०००° से. पेक्षा उच्च तापमान निर्माण करणारी आणवीय हायड्रोजन प्रज्योत ही उपकरणे विकसित केली.

लँगम्यूर यांनी स्वतंत्रपणे आणवीय संरचना व रासायनिक बंधनिर्मिती यांच्या सिद्धांतांचे सुसूत्रीकरण केले त्याचबरोबर सहसंयुजा ही संज्ञा उपयोगात आणली. १९४६ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सिल्व्हर आयोडाइड व घनरूप कार्बन डाय-ऑक्साइड हे ढगांत टाकल्याने कृत्रिम पाऊस पडण्याची शक्यता पडताळून पाहिली.

लँगम्यूर यांना भ्रमंतीची आवड होती, तसेच ते गिर्यारोहकही होते. ते खाजगी विमानचालक होते. १९३२ मध्ये त्यांनी २,७४३ मी. उंचीवरून विमानातून सूर्यग्रहणाची निरीक्षणे केली होती.

फॅल्मथ (मॅसॅचूसेट्स) येथे ते मृत्यू पावले.

जमदाडे, ज.वि.