बेरिंग सामुद्रधुनी : अलास्का( अमेरिका ) व सायबीरिया(आशिया)या दोन भूखंडामधील चिंचोळा सागरी भाग म्हणजे बेरिंग सामुद्रधुनी होय. या सामद्रधुनीने पॅसिफिक महासागराचा भाग असलेला बेरिंग समुद्र व आर्क्टिक महासागर जोडले गेले आहेत.
⇨व्हीटुस बेरिंगने ही सामुद्रधुनी प्रथम शोधून काढली. त्याच्याच नावाने ती ओळखली जाते. या सामुद्रधुनीच्या रूपाने अमेरिका आणि आशिया खंडांतील अंतर फक्त ८६ किमी. भरते.
हा भाग ऑक्टोबर ते जूनपर्यंत बर्फमय असतो. एरवी रशियातील चुकची द्वीपकल्पापासून अलास्कातील सूअर्ड द्वीपकल्पापर्यंत लहान बोटींनी वाहतूक चालते. आंतरराष्ट्रीय बाररेषा या सामुद्रधुनीतून जाते.
सामुद्रधुनीच्या जागी प्राचीन काळी ‘भूमिपूल’ होता. सध्याच्या पातळीपेक्षा जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी सु. ४५ मी. कमी होती, त्यावेळी सायबीरिया व अलास्का एकमेंकाशी जोडलेले असावेत. सुमारे १०,००० वर्षांपूर्वी सागरपातळी शेवटची खालावली होती. प्लाइस्टोसीन काळात भूमिपूल सु. १,६०० किमी रुंद होता. मानव, वनस्पती व प्राणी यांचे स्थलातंर या भूमिपुलावरूनच उत्तर अमेरिकेत झाले असावे.
तावडे, मो.द पंडित,अविनाश