बेडी : गुजरात राज्यातील कच्छच्या आखातावरील वर्षभर खुले राहणारे बंदर. लोकसंख्या १३,३२४ (१९८१). हे जामनगरच्या वायव्येस ८ किमी. असून सडकेने व मीटर मापी लोहमार्गाने जामनगरशी जोडलेले आहे.

अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून बेडी हे बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. येथून कच्छ, सौराष्ट्र, कोकण, कराची व इराणच्या आखाताशी व्यापार चाले म्हणूनच या बंदराचे महत्त्व लक्षात घेऊन १९२४ मध्ये जाम रणजितसिंहजींनी याचा विकास करण्याचे ठरविले. त्यासाठी ब्रिटिश तज्ञांना बोलावून त्यांच्या योजनेनुसार नवीन गोद्या, गुदामे, खाडीची खोली वाढविणे इ. आधुनिक सुविधा या बंदराला उपलब्ध करण्यात आल्या. त्यामुळेच ‘काठेवाडचे लिव्हरपूल’ म्हणून हे बंदर ओळखले जाऊ लागले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत गुजरात सरकारने या बंदराच्या विकासासाठी सु. ४६ लाख रु. खर्च केले. हे मध्यम प्रतीचे बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुख्यत्वे साखर, अन्नधान्य, कापड, चांदी, धातू, बांधकामाचे साहित्य, खजूर यांची आयात केली जाते आणि भुईमूग, सुप्रसिद्ध जोदिया लोकर, कापूस, पेंड, लोणी, कडधान्ये यांची निर्यात केली जाते. बोटींच्या इंधन पुरवठ्याची अत्याधुनिक सोय येथे आहे.

येथे मच्छीमारीचा व्यवसायही फार मोठ्या प्रमाणावर चालतो. येथे बर्फाचा कारखाना असून २० टन मासे साठविण्याची क्षमता असलेले शीतगृहही आहे. तेलगिरण्या आणि मीठ उत्पादन हे उद्योग महत्त्वाचे असून गावात बंदर, कर्मशाळा, कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह तसेच सर्व सोयींनी युक्त असे शासकीय रुग्णालय इ. सुविधा आहेत.

कापडी, सुलभा