कारागांदा : रशियातील कझाकस्तान प्रजासत्ताकाच्या कारागांदा विभागाचे मुख्य शहर. लोकसंख्या ५,२२,००० (१९७०). आल्माआताच्या वायव्येस ७६५ किमी. अंतरावर कारागांदा आहे. ह्या शहराचे आसमंतात उत्तम कोळशाच्या खाणी आहेत. खाणउद्योगाला लागणारी यंत्रे आणि उपकरणे, लाकूड कापणे, विटा, सिमेंट वगैरेंचे कारखाने ह्या शहरात आहेत.

कारागांदा शहरापासून नैर्ऋत्येला १९ किमी. अंतरावर ‘सारान’ येथे एक मोठी कोळशाची खाण सुरु झाली आहे. जवळच तेमिरताऊ येथे विद्युत्‌ उत्पादनाचे केंद्र आहे. ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गाचा बैकल सरोवराकडे जाणारा एक फाटा कारागांदा शहरावरून जातो.

     लिमये, दि.ह.