बेट्युलेसी : (भूर्ज कुल). फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] ह्या कुलाचा समावेश ए बी रेंडेल व जे. हचिन्सन यांची फॅगेलीझ गणात केला आहे परंतु ⇨ फॅगेसी (वंजू कुल) व जुग्लॅंडेसी (अक्रोड कुल) यांच्याशी असलेले साम्य लक्षात घेऊन बेट्युलेसीचा अंतर्भाव ⇨ जुग्लँडेलीझमध्ये (अक्रोड गणात) केला जातो. जे. सी. विलिस यांच्यासारख्यांच्या मते बेट्युलेसीत बेट्युला व ॲल्नस हे दोनच वंश व एकूण ९५ जाती असून त्यांचा प्रसार उत्तर समशीतोष्ण कटिबंधात व उष्ण कटिबंधातील पर्वतांवर झालेला आहे. या कुलातील बहुतेक वनस्पती क्षुपे (झुडपे) व वृक्ष असून त्यांवर साधी, एकाआड एक पाने व पातळ पतिष्णू उपपर्णे (पानाच्या तळाशी असलेली उपांगे) असतात. फुले एकलिंगी, एकाच झाडावर, टोकावरच्या लोंबत्या फुलोऱ्यावर (नतकणिशावर अथवा स्त्री-पुष्पे स्तबकावर) असतात पुं-पुष्पे ३, छदास चिकटलेली, परिदले सूक्ष्म व केसरदले २-४ स्त्री-पुष्पे २-३ व त्यांना परिदले नसतात. किंजदले २, किंजपुटात तळाशी दोन कप्पे व प्रत्येकात एक लोंबते बीजक (अधोस्त्राव व एकावरणी) असते [⟶ फूल]. फळे कवचासारख्या कठीण सालीची व एकबीजी असतात. फळ पक्व होताना छदे व छदके वाढून कधीकधी फळांना चिकटून राहतात. ⇨ भूर्ज, ⇨ ॲल्डर इ. यातील सामान्य उपयुक्त वनस्पती होत. रेंडेल यांनी या कुलात अंतर्भूत केलेल्या ऑस्ट्रिया, कार्पिनस (हॉर्नबीम) व ऑस्ट्रियॉप्सिस या वंशांचा विलिस यांनी कार्पिनेसी या कुलात आणि कॉरीलसचा (हॅझेलनट, भुतिया बदाम) कॉरीलेसी या कुलात समावेश केला आहे.
चौगले, द. सी.