बेकर, गुस्तावो आदॉल्फो:(१७ फेब्रुवारी १८३६ – २२ डिसेंबर १८७०). श्रेष्ठ स्पॅनिश भावकवी. जन्म सेव्हील्या येथे. बालपणीच तो पोरका झाला. त्याच्या पालक मातेने त्याचे लालनपालन केले. कवी म्हणून कीर्ती‌ मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेने वयाच्या अठराव्या वर्षी तो माद्रिद येथे आला तथापि त्याच्या हयातीत त्याला फारशी प्रसिद्धी मिळू शकली नाही उभे आयुष्य दारिद्रयात घालवावे लागले. वर्तमानपत्रांतून लेखन करून तसेच काही फ्रेंच तत्त्वचतुषअटयीकृतींचे अनुवाद करून त्याने कसाबसा आपला उदरनिर्वाह केला. क्षयाच्या विकाराने माद्रिद येथेच त्याचे निधन झाले. त्याचा कवितासंग्रह Rimas हा त्याच्या मृत्यूनंतर, १८७१ मध्ये प्रसिद्ध झाला.

अल्यायुषी बेकरच्या कविता संस्थेने अगदी थोड्य-जेमतेम ८०च्या आसपास आहेत. लोकगीतांशी नाते जोडणारी अत्यंत साधी पण नादवती मितभाषा तसेच प्रेम आणि जीवन ह्यांतील अपयशांमुळे येणारे गडद नैराश्य ही बेकरच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. ह्या सर्व कवितांना एक क्रम असून प्रेमामुळे पल्लवित झालेल्या आशा नंतरचा वियोग व त्यापुढे मृत्यू अशा प्रेमजीवनाच्या तिन्ही अवस्था त्यांतून व्यक्त झालेल्या आहेत. प्रेमाचे परिपूर्ण रूप बेकरला मृत्यूत दिसते. बेकरची भाषा आणि त्याची प्रतिमासृष्टी वरवर फार साधी दिसत असली, तरी त्यांतून ‌त्याने निर्माण केलेले भावविश्व अत्यंत प्रगल्भ आणि अलवार असे आहे. शब्दांना त्यांच्या सां‌केतिक अर्थापलीकडे म्हणजे वाच्यार्थापलीकडे नेऊन एक गहिरा आशय व्यक्तविण्याचे सामर्थ्य बेकरच्या ठायी होते आणि त्या दृष्टीने काही अभ्यासकांना त्याच्या कवितेत आधुनिक प्रतीकवादी कवितेची चाहूल लागते.

बेकरच्या गद्यलेखनात Leyendas Espanolas (१८७१, इं. भा. रोमॅंटिक लेजंड्‌स ऑफ स्पेन, १९०९) ह्या कथासंग्रहाचा समावेश होतो. स्वच्छंदतावादी वळणाने लिहिलेल्या ह्या कथांतून त्याच्यातील भावकवी लपून राहत नसला, तरी काव्यलेखनात त्याने कटाक्षाने पाळलेला शब्दांचा परिणामकारक मितव्यय ह्या कथांत आढळत नाही. 

कुलकर्णी, अ. र.