हीमेनेथ, व्हान रामॉन : (२४ डिसेंबर १८८१–२९ मे १९५८). स्पॅनिश कवी. जन्म स्पेनमधील मोगर नामक वसाहतीत. सालामांका विद्यापीठात काही काळ शिक्षण घेतल्यानंतर कवीरूबेन दारिओ ह्याच्या निमंत्रणावरून तो माद्रिदला आला (१९००). त्याच वर्षी Almas de violeta (इं. शी. ‘सोल्स ऑफ व्हायोलेट’) व Ninfeas (इं. शी. ‘वॉटर लिलीज’) हे त्याचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. ह्या संग्रहांतील भावविवशता एवढी तीव्र होती, की कालांतराने हीमेनेथने ह्या काव्यसंग्रहांच्या मिळतील त्या प्रती नष्ट करून टाकल्या. हीमेनेथ हा नाजूक प्रकृतीचा होता. त्या कारणास्तव त्याने माद्रिद सोडले. पास्तोरल्स (१९११), Jardines lejanos (१९०५, इं. शी. ‘डिस्टंट गार्डन्स’) आणि Elegiaspuras (१९०८, इं. शी. ‘प्यूअर एलिजीज’) हे त्याचे ह्या काळातले काव्यसंग्रह. त्यांतील कवितांवर असलेला रूबेन दारिओचा प्रभाव स्पष्टपणे प्रत्ययास येतो. दारिओच्या कवितेप्रमाणेच त्याच्याही कवितेतली आत्मपरता मुक्तछंदातून आविष्कृत होत असलेली दिसते. 

 

१९१२ मध्ये हीमेनेथ पुन्हा माद्रिदला आला आणि तेथे एकाशैक्षणिक संस्थेच्या नियतकालिकाचा संपादक झाला. १९१६ मध्ये त्याने न्यूयॉर्क सिटीला भेट दिली. तेथे रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य स्पॅनिश-मध्ये अनुवादणाऱ्या झेनोबिया कांप्रूबी आयमार हिच्याशी त्याचा विवाह झाला. स्पेनमध्ये परत आल्यानंतर त्याने Diari o de unpoeta y mar (१९१७, इं. शी. ‘डायरी ऑफ ए पोएट रिसेंट्ली मॅरिड’) हेत्याचे लेखन प्रसिद्ध केले. त्याच्या काव्यशैलीत घडून आलेले परिवर्तनह्या लेखनापासून घडून आलेले आहे. ‘नग्न कविता’ असे तो ह्या परिवर्तनाला म्हणतो. कविता ही कोणत्याही बाह्योपचारांपासून, तसेच वृत्तांच्या औपचारिक बंधनातून मुक्त करून ती मुक्तछंदात निर्मिलीजावी, असा ह्या परिवर्तनाचा अर्थ होता. स्पेनमधील यादवी युद्धात तो प्रजासत्ताकवाद्यांच्या बाजूने होता आणि पुढे प्वेर्त रीको येथे तो अज्ञातवासात गेला. 

 

हीमेनेथ हा मुख्यतः कवी असला, तरी त्याची Platero y yo (१९१७, इं. शी. ‘प्लेटोरो अँड आय’) ही अनुवादित गद्यकृती विशेष गाजली. Sonetos espirituales१९१४-१५ (१९१६, इं. शी. ‘स्पिरिच्यूअल सॉनेट्स, १९१४-१५’), Piedra y cielo (१९१९, इं. शी. ‘स्टोन्स अँड स्काय’), Poesia en verso, 1917-–23 (१९२३), Poesia en prosa y verso (१९३२, इं. शी. ‘पोएट्रीइन प्रोज अँडवर्स’), Voces de mi copla, (१९४५, इं. शी. ‘व्हॉइसेस ऑफ माय साँग’), Animal de fondo (१९४७. इं. शी. ‘ॲनिमल ऑफ द डेप्थ’) हे त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ. 

 

१९५६ साली त्याला नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्वेर्त रीकोतील सान जुआन येथे तो निधन पावला. 

 

पहा : स्पॅनिश साहित्य. 

कुलकर्णी, अ. र.