इंग्‍लिस, सर क्लॉड कॅव्हेंडिश: (३ मार्च १८८३–     ). सनदी स्थापत्य अभियंता. त्यांचे शिक्षण ट्रिनिटी कॉलेज, डब्‍लिन येथे झाले. ते १९०६–४५ या काळात मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिकारी होते. मुंबई इलाख्याकरिता त्यांनी सिंचाईसंबंधी संशोधन व विकास करण्यासाठी वेगळा विभाग स्थापन केला आणि या विभागाची १९१६–३८ या काळात धुरा वाहिली. १९३८–४५ या काळात ते पुणे येथील जलमार्ग प्रयोगकेंद्राचे संचालक व १९४७–५८ मध्ये इंग्‍लंडमधील टेम्स नदीवरील वॉलिंगफोर्ड संशोधन केंद्राचे संचालक होते.

नद्या व खाड्या यांतील प्रवाहवृत्ती, त्यांचे विनयन व नियंत्रण तसेच किनारा संरक्षण यांचे प्रत्यक्ष व प्रतिकृतींवरून संशोधन करून इंग्लिस यांनी बिहेव्हियर अँड कंट्रोल ऑफ रिव्हर्स अँड कॅनाल्स  हा ग्रंथ व त्यासंबंधी इतर संशोधनपर लेख लिहिले. सर्वसाधारण पावसामुळे येणारा पाणलोट काढण्याचे त्यांनी बसविलेले सूत्र आधारभूत समजतात व ते इंग्लिस सूत्र या नावाने ओळखण्यात येते.

ओक, भ. प्र.