बेइरा :आफ्रिकेतील मोझॅंबीक देशातील एक प्रमुख बंदर. लोकसंख्या १,१३,७७० (१९७०). हिंदी महासागराच्या मोझॅंबीक खाडीवर, पुंग्वे नदीच्या मुखाशी ते वसलेले असून तेथे उत्कृष्ट बंदर-सुविधा उपलब्ध आहेत. झिंबाब्वे (ऱ्होडेशिया), मालावी प्रजासत्ताक या आफ्रिकी देशांतून येणाऱ्या लोहमार्गाचे हे पूर्वेकडील सागरकिनाऱ्यावरील अंतिम स्थानक होय. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.

पोर्तुगीज मोझॅंबीक कंपनीने एका जुन्या अरब वसाहतीच्या जागी १८९१ मध्ये हे वसविले. कंपनीचे मुख्यालयही येथेच होते. १९४१ नंतर हे कंपनीच्या अखत्यारीतून पोर्तुगीज सरकारच्या अंमलाखाली आले. मध्य व उत्तर यूरोपातील बंदरांपासून केपटाउन व सुएझ कालवा यांपैकी कोणत्याही एका मार्गाने गेल्यास हे बंदर सारख्याच अंतरावर येते. ते मध्य आफ्रिकेतील प्रमुख उत्पादक क्षेत्रांशी वाहतूक व दळणवळणाच्या साधनांनी जोडलेले असून परदेशी व्यापारासाठी सोयीचे आहे. त्यामुळे या बंदराचा वेगाने विकास होऊन मध्य आफ्रिकेतील आयात-निर्यातीचे ते प्रमुख केंद्र बनले. येथून तंबाखू, कापूस, कातडी, क्रोमाइट, तांबे, सोने ॲस्बेस्टस, साखर इत्यादींची निर्यात होते आणि खते, अवजड यंत्रसामग्री, गहू इत्यादींची आयात केली जाते. येथे साखर, रंग, सिगारेट इ. उद्योग विकास पावले आहेत. येथील आल्हाददायक हवामान व रम्य पुळणी ही पर्यटकांची आकर्षणे होत.

लिमये, दि. ह.