बूमद्येन, हुआरी : (२३ ऑगस्ट १९२७ ? – २७ डिसेंबर १९७८). आधुनिक अल्जीरियाचा शिल्पकार व राष्ट्राध्यक्ष (१९६५-७८). त्याचे मूळचे नाव मुहम्मद बिन ब्रहिम बुखारूबा. जन्म गरीब शेतकरी कुटुंबात लाउझेल (गेल्मा जवळ, अल्जीरिया) येथे. गेल्मा येथील विद्यालयात शिक्षण घेऊन तो पुढील शिक्षणासाठी कॉन्स्टंटीन व कैरो येथील इस्लामी शिक्षण संस्थांत गेला. तेथे शिक्षण घेऊन पुढे त्याने अल्-अझार विद्यापीठात शिक्षण घेतले. सुरुवातीस काही वर्षे गेल्मा येथे अध्यापनाचे काम केले. तेथे त्याची अहमद बेनबेला या क्रांतिकारकाशी गाठ पडली. त्यामुळे तो अल्जीरियाच्या स्वातंत्र्य लढ्याकडे आकृष्ट झाला. हुआरी बूमद्येन हे टोपणनाव त्याने धारण केले. ओरान (अल्जीरिया) येथील एका बंडखोर विभागाचा तो प्रमुख झाला (१९५५). ‘विलया’ या भूमिगत क्रांतिकारक गुप्त संघटनेचा तो सेनापती होता (१९५५-५७). कैरो येथे क्रांतिकारकांनी प्रतिसरकार स्थापन केले. (१९५८) त्या वेळी एफ्. एल. एन. (नॅशनल लिबरेशन फ्रंट) या क्रांतिकारकांच्या सैन्याचा तो प्रमुख झाला (१९६०-६२). त्याने मोरोक्के आणि ट्युनिशिया येथे अल्जीरियन सैन्याला प्रशिक्षण देऊन फ्रेंच सैन्य आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, अशी खबरदारी घेतली परंतु त्याचा हा बेत फसला. राष्ट्रीय क्रांतिकारक नेते व फ्रेंच शासन यांत समझोता होऊन दिनांक ३ जुलै १९६२ रोजी अल्जीरिया स्वतंत्र झाला. तेव्हा स्वतंत्र अल्जीरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी बेनबेलाची बूमद्येनच्या पाठिंब्याने नियुक्ती झाली (१९६३) आणि बूमद्येन हा त्याच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री व नंतर उप-राष्ट्राध्यक्ष झाला (१९६३-६५). पुढे बेनबेला आणि बूमद्येन यांत मतभेद झाले तेव्हा बेनबेलाने महत्वाच्या प्रशासकीय पदांवरून लष्करातील प्रमुख व्यक्तींची उचलबांगडी केली. परिणामतः बूमद्येनने लष्करी क्रांती करून सत्ता बळकाविली (१२ जून १९६५) आणि स्वतः राष्ट्राध्यक्ष व क्रांतिकारी मंडळाचा अध्यक्ष झाला (१८ जून १९६५-७६) तथापि त्याच्या हुकूमशाही प्रशासनामुळे १९६७ च्या डिसेंबरात लष्कराने उठाव केला. तो त्याने मोडून काढला. प्रशासनात सामंजस्याचे धोरण स्वीकारून अनेक सुधारणा घडवून आणल्या तसेच पाश्चात्य राष्ट्रांना अल्जीरियात आर्थिक गुंतवणूक करण्यास आवाहन केले. परराष्ट्रीय धोरणातही त्याने कोणत्याही एका गटाच्या आधीन न होता अलिप्ततेचे धोरण स्वीकारले आणि विशेषतः फ्रान्स व अमेरिका यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवून पूर्व यूरोपातील कम्युनिस्ट राष्ट्रे व चीन यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध राखण्याचाही त्याने प्रयत्न केला. या परराष्ट्रीय धोरणात त्याचा इस्त्राएलविरोध मात्र स्पष्ट दिसतो. त्याने अरब लीगमधील राष्ट्रांना सशस्त्र पाठिंबा दिला. ईजिप्त – इस्त्राएल शांतता तह त्यास मान्य नव्हता. अल्जीरिया हे मुस्लिम व अरब राष्ट्र म्हणूनच जगात ओळखले जावे, असा त्याचा आग्रही दृष्टिकोन होता. त्याच्या परराष्ट्रधोरणाचे मुख्य सूत्र सावध तटस्थता हे होते. बेनबेलाप्रमाणे तो रशियाकडे जास्त झुकला नाही तथापि तो अमेरिकेच्याही कच्छपी गेला नाही. १९७६ मध्ये त्याने अल्जीरियासाठी नवीन संविधान तयार केले. त्यानुसार २५ फेब्रुवारी १९७७ रोजी राष्ट्रीय संसदेच्या निवडणुका झाल्या. त्याची सहा वर्षाकरिता राष्ट्राध्यक्ष म्हणून फेर निवड झाली. त्या वेळी त्याने मंत्रिमंडळात आमूलाग्र बदल करून स्वतःकडे राष्ट्राध्यक्षपदासह पंतप्रधान, संरक्षणमंत्री, सरसेनापती, एफ.एल.एन.चा अध्यक्ष इ. पदे घेतली. अखेरपर्यंत तो या सर्व पदांवर होता. बेनबेलानंतर सु.१३ वर्षे अल्जीरियाचे नेतृत्व त्याने कौशल्याने केले आणि राजकीय क्षेत्रात स्थैर्य आणले. त्याने राजकीय व आर्थिक व्यवहारवादी धोरणांचा पुरस्कार करून अल्जीरियाचा सर्व क्षेत्रांत विकास घडवून आणला. अल्जिअर्स येथे रक्तस्त्रावाने तो मरण पावला.
संदर्भ : 1.Ottaway, David Ottaway, Marina, Algeria : The Politics of the Socialist Revolution, New York, 1970.
2. Quandt, W.B. Revolution and Political Leadership: Algeria 1954-58, Cambridge
(Mass.), 1969.
शेख, रुक्साना
“