पीअर, डॉमीनीक झॉर्झ : (१० फेब्रुवारी १९१० – ३० जानेवारी १९६९). बेल्जियममधील एक धर्मोपदेशक व कळकळीचा समाज कार्यकर्ता. शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी व दुसऱ्या महायुध्दातील निर्वासितांचा कैवारी म्हणून तो प्रसिध्द आहे. त्याचा जन्म दिनां येथे सामान्य कुटुंबात झाला. त्याचे प्राथमिक व महाविद्यालीन शिक्षण दिनां येथेच झाले. त्याने रोम आणि लूव्हाँ विद्यापीठांत पुढील अभ्यास केला. त्यानंतर त्याने १९२८ मध्ये डॉमिनिकन ऑर्डरमध्ये प्रवेश केला. तेथे त्यास धर्मोपदेशकाची दीक्षा मिळाली (१९३४). द डॉमिनिकन मोनॅस्टरी ऑफ ला सार्त, वी (बेल्जियम) येथे नीतिविषयक तत्त्वज्ञानाचा अधिव्याख्याता म्हणून त्याने नोकरी केली (१९३७–४७). या काळात त्याने गरिबांसाठी अनेक धर्मादाय संस्था स्थापन केल्या. त्यांपैकी Les Stations de Plein-Air de Huy (१९३८) आणि Le Service d’ Entr Aide Familiale (१९४०) या संस्थांनी महत्त्वाची कामगिरी केली. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्याच्या कार्यास उधाण आले. त्याची वंशविद्वेष प्रतिकार चळवळ जोरात सुरू झाली आणि दुसऱ्या महायुध्दातील असंख्य निराधार निर्वासितांना पाहून त्याचे हृदय हेलावले. त्यांना मदत करण्यासाठी त्याने Aide aux Personnes Deplacees ही संस्था स्थापन केली (१९४९). तिच्या असंख्य शाखा यूरोपमध्ये  फैलावल्या आहेत. त्यांपैकी एक ऑस्ट्रीया, चार बेल्जियम व चार जर्मनी येथे स्थापन झाल्या. यांतील काही संस्था ग्रामीण भागांतही स्थापन झाल्या. प्रत्येक निराश्रित व्यक्तीला, मग ती स्त्री वा पुरुष असो किंवा कोणत्याही  धर्माची, जातीची वा देशाची असो, तिला शक्य ती सर्व मदत ही मिळालीच पाहिजे, हे संस्थेचे मूलभूत तत्त्व होते आणि या ध्येयाने प्रेरित होऊन ती झपाट्याने कार्यरत झाली. पीअरच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, ‘युरोप ऑफ द हार्ट’ या संस्थमुळे एकूण जे लोक धर्म, राष्ट्र, जाती, राजकीय मतांतरे वगैरंनी दूर फेकले गेले होते, ते सर्व एकत्र आले. १९५० ते ५४ च्या दरम्यान पीअरने निर्वासीतांसाठी चार स्वागतगृहे किंवा वृध्दाश्रम बेल्जियममध्ये स्थापन केले. अशा प्रकारे सात यूरोपीय मार्गदर्शक खेडी (पायलट व्हिलेजीस) बेल्जियम, ऑस्ट्रीया व जर्मनी यांत वसविण्यात आली (१९५६–६२).त्यांचे तत्त्व पुनर्वसन हे होते.पीअरला निर्वासित लोकांनी समाजाचे स्वतंत्र घटक म्हणून जगावे असे वाटे. त्याने या तत्त्वाचा जोरदार प्रसार व प्रचार केला. भिन्न देशांतील स्वतंत्र व्यक्तींनी वा कुटुंबांनी अशा निराधार निर्वासितांना आश्रय द्यावा, असे त्याने आवाहन केले. या त्याच्या कार्याबद्दल त्याला शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९५८). याशिवाय त्याला अनेक मानसन्मान व पदके विभिन्न देशांनी बहाल केली. त्यांपैकी Chevalier Legion d’Honneur Croix de Guerre avec palmes Medaille dela Guerre Medaille de la Resistance इ. महत्त्वाची होत. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्याच्या कार्यास अधिक उत्तेजन मिळाले आणि त्याने पारितोषिकाची रक्कम निराश्रितांसाठी खर्च करण्याचे योजिले. त्याने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता केंद्र वी येथे स्थापन केले (१९६०). तेच पुढे युर्निव्हर्सिटी ऑफ पीस या नावाने प्रसिध्दीस आले. काळ्या-गोऱ्यांमध्ये अधिक सामंजस्य प्रस्थापित होऊन विश्वबंधुत्वाचा सुसंवाद घडावा, म्हणून तो नेहमी प्रयत्नशील असे आणि या तत्त्वावरच तरुणांनी काही विधायक कार्य करावे, म्हणून त्याने वरील संस्था स्थापन केली. तो पाकिस्तानच्या निमंत्रणावरून १९६२ मध्ये तेथे गेला. तेथे त्याने आयलंड ऑफ पीस हा प्रकल्प सुरू केला. तेथील कार्य १९६७ मध्ये मार्गी लागल्यावर पीअरने अशी संस्था भारतात सुरू केली. तो ‘जागतिक मैत्री’ या कल्पनेचा प्रणेता असून आफ्रिका व आशिया खंडांमधील निर्वासितांना मदत करण्यासाठी त्याने प्रसार व प्रचार-यंत्रणा मोहीम आखली. त्याने आपल्या तत्त्वांचा, विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी Batir la paix (१९६६) हे पुस्तक लिहिले. याचे इंग्रजी भाषांतर बिल्डिंग पीस (१९६७) या शिर्षकाने झाले आहे. तो लूव्हाँ येथे मरण पावला.

संदर्भ : 1. Houart, Victor, Open Heart : the Inspiring Story of Father Pire and the Europe of the Heart, London, 1959.

    2. Vehenne, Hugues, The Story of Father Dominique Pire : Winner of the Nobel Peace Prize as told to Hugues Vehenne, New York, 1961.

देशपांडे, सु. र.