धर्मशाही : ईश्वरी इच्छा हाच कायदा या सिद्धांताच्या आधारे, धर्मशास्त्र सांगणाऱ्या पवित्र ग्रंथांच्या आधारावर शासन चालविणारे राज्य हे धर्मसत्ताक किंवा धर्मशाही होय. येथे धर्म म्हणजे प्रस्थापित धर्मसंस्थेने पवित्र मानलेले धर्मशास्त्र आणि रूढी होत. या राज्यात धर्मगुरुंचे—मग ते प्रत्यक्ष शासक असोत वा नसोत—वर्चस्व असते. अधिकृत धर्माचे रक्षण व प्रसार करणे हे या राज्याचे प्रमुख कर्तव्य मानले जाते. उदा., व्हॅटिकन सिटी स्टेट किंवा मध्ययुगीन तिबेटमधील लामाशासन. आपला धर्म हाच खरा व सर्वश्रेष्ठ अशी भूमिका असल्यामुळे सर्वसाधारणपणे अशी राज्ये परधर्माविषयी असहिष्णू वृत्ती बाळगतात. धर्मनियमांचे उल्लंघन हा कायदेभंग व म्हणून गुन्हा समजला जातो तर सर्व कायदे हे ईश्वरप्रणीत मानले असल्यामुळे कायदेभंग हे पाप समजले जाते. कायद्याचा अन्वय धर्मग्रंथांच्या आधारे बहुधा धर्मगुरूंकडून लावला जातो. राज्यकर्ता हा ईश्वराचा प्रतिनिधी मानण्यात येतो.

जनतेत प्रामाण्य मिळविण्यासाठी राजसत्तेस ईश्वरी अधिष्ठानाची गरज असल्यामुळे, तसेच धार्मिक व राजकीय कार्यांचे विशेषीकरण न झाल्याने अनेक प्राचीन राज्यांत धार्मिक व राजकीय सत्ता यांचे मिश्रण झालेले असे. राजा हाच धर्मगुरूही असे किंवा त्यावर धर्मगुरूचे वर्चस्व असे. तथापि या व्यवस्थेस धर्मशाही म्हणता येणार नाही. प्राचीन भारतात धर्म आणि राज्यव्यवहार यांत फरक केला जात असल्यामुळे धर्मसत्ता होती असे म्हणता येत नाही. राज्यकर्त्याने नैतिक तत्त्वांनुसार राज्यकारभार करावा, एवढीच अपेक्षा असे. प्राचीन हिब्रूंचे राज्य धर्मसत्ता होती, पण आधुनिक इझ्राएल राष्ट्र धर्मशाही राष्ट्र म्हणता येणार नाही. पूर्वी राजसत्ता ईश्वरदत्त मानली जात असे. होमरच्या काळात ग्रीक राज्यात रूढी व परंपरा महत्त्वाच्या मानल्या जात आणि धर्मनियम व कायदा यांत भेद केला जात नसे. ईश्वरी इच्छा राजसत्तेचे अधिष्ठान मानली जाई. इस्लामच्या उदयानंतर तो धर्म मानणारी राज्ये धर्मसत्ता बनल्या. धर्माचा प्रसार करणे व संरक्षण करणे हे राज्याचे एक प्रमुख ध्येय मानले गेले.

सोळाव्या शतकात धर्मसुधारणेच्या चळवळीत कॅल्व्हिन या तत्त्ववेत्त्याने धर्मसत्तेचा पुरस्कार केला व असे प्रतिपादन केले की, धर्माचे रक्षण हा राज्याचा प्रधान हेतू असून, त्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने राज्याला पाठिंबा दिला पाहिजे, कायदापालन म्हणजे धार्मिक कर्तव्य मानले पाहिजे, कर्तव्य असल्यामुळे राज्याचा कायदा अमान्य करण्याचा वा राज्याला विरोध करण्याचा कोणालाही हक्क नसतो. मात्र राज्याचा कायदा ईश्वरी इच्छेविरुद्ध म्हणजे प्रस्थापित धर्माविरुद्ध असेल, तर त्याचा अवमान करून तो मोडण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे, असे त्याने प्रतिपादन केले. त्याच्या वर्चस्वाखाली असलेल्या जेनोआच्या राज्यात धर्मशास्त्रनिर्दिष्ट नीतितत्त्वांवर आधारित कायदा, साधे व कडक नियमांनी बद्ध असे जीवन, धर्मसत्तेच्या हाती राजकीय अधिकार, विरोधकांना व नास्तिकांना कडक शिक्षा असा प्रयोग करण्यात आला पण तो अयशस्वी ठरला. अशाच प्रकारचा प्रयत्न अमेरिकेत नव्याने प्रस्थापित झालेल्या काही वसाहतींत करण्यात आला पण त्या प्रयोगाला विरोध झाला व तो अयशस्वी ठरला.

मध्ययुगीन यूरोपमध्ये पोप (ख्रिस्ती धर्मगुरू) व राजे यांच्यात सत्तेसाठी झालेल्या स्पर्धेतून ऐहिक व पारलौकिक क्षेत्रात भेद करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. यूरोपमधील प्रबोधन काळात बुद्धिवादास मिळालेल्या महत्त्वामुळे व विज्ञानाच्या प्रसारामुळे अनेक धार्मिक श्रद्धांविषयी प्रश्न निर्माण झाले. यूरोपमधील धर्मसुधारणेच्या चळवळींच्या काळात धर्मावरून झालेल्या युद्धामुळे धर्म व राजकारण यांत भेद करण्याची प्रवृत्ती बळावली. धर्म हा एक व्यक्तिगत प्रश्न मानण्यात येऊ लागला. आशिया व आफ्रिका या खंडांतही पाश्चिमात्यांच्या प्रभावामुळे धर्मसत्ता मागे पडली आहे. मात्र काही देशांतील राष्ट्रवाद हा धर्मभावनेवर आधारलेला आहे (उदा., इझ्राएल, पाकिस्तान). तेथे धार्मिक प्रश्नांना पुन्हा एकादा राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मशाहीतील काही घटक या राज्यांत असलेले दिसतात. धर्मग्रंथातील तत्त्वानुसार राज्य चालावे, असा आग्रह धरला जातो. तथापि ही राष्ट्रे धर्मशाही राष्ट्रे म्हणता येत नाहीत. कारण धर्माची प्रेरणा आधुनिक जीवनाचे प्रश्न सोडवू शकत नाही. यामुळे धर्म दिवसेंदिवस व्यक्तिगत बाब मानली जात असून धर्म राजकारणापासून अलग असावा, असे मत अधिकाधिक लोकांना पटत असल्याचे आढळून येते.

मोरखंडीकर, रा. शा. सोहोनी, श्री. प.