बुंदेलखंडी पट्टिताश्म : (बुंदेलखंडी ग्रॅनाइट). उत्तर भारतातील बुंदेलखंड भागामध्ये आढळणाऱ्या ग्रॅनाइट खडकांच्या गटाचे नाव. झांशी जिल्ह्याचा बहुतेक भाग आणि हमीरपूर, ग्वाल्हेर, दांतिया इ. जिल्ह्यांचा थोडाथोडा भाग व्यापणाऱ्या काहीशा त्रिकोणी भूप्रदेशात हा गट आढळतो. हा प्रदेश पूर्व-पश्चिम सु. ३२० किमी. व उत्तर-दक्षिण सु. १९० किमी. पसरलेला आहे. एकसंघ संरचना, पट्टणाचा (विशेषतः चापट खनिजे स्तररूपात साचली जाऊन निर्माण झालेल्या संरचनेचा) जवळजवळ अभाव व गौण खनिजांची दुर्लभता ही या ग्रॅनाइटाची वैशिष्ट्ये आहेत. हा भरडकणी किंवा मध्यमकणी असून यातील ऑर्थोक्लेज या प्रमुख खनिजाच्या गुलाबी वा लालसर रंगामुळे खडकाचा वैशिष्ट्यपूर्ण लालसर गुलाबी रंग आलेला आहे. क्वॉर्ट्झ व हॉर्नब्लेंड ही यातील प्रमुख अन्य महत्त्वाची खनिजे असून क्वचित प्लॅजिओक्लेजाचे छोटे स्फटिकही यात आढळतात. हॉर्नब्लेंड गडद रंगाचे व अंशतः अगर पूर्णतः विघटित झालेले असते व त्याच्यापासून क्लोराइट व एपिडोट ही खनिजे तयार झालेली असतात. मॅलेट व एच्. बी. मेडलीकॉट यांनी बुंदेलखंडावरून याला ’बुंदेलखंडी पट्टिताश्म’ हे नाव दिले परंतु यातील पट्टण अगदीच अस्पष्ट असल्याने त्याला आता पट्टिताश्म म्हणणे बरोबर होणार नाही, असे वाटल्याने ए.एम्. हेरन यांनी ’बुंदेलखंडी ग्रॅनाइट’ असे नाव दिले. तथापि या ग्रॅनाइटासमवेत अगदी अल्प प्रमाणात इतर अग्निज खडक व थोडे सुभाजा खडकही (सहज भंग पावणारे रूपांतरित-दाब व तापमान यांचा परिणाम होऊन तयार झालेले-खडकही) सापडतात. म्हणून आर्. सी. मिश्र व आर्.पी. शर्मा यांनी या गटाला ’बुंदेलखंडी ग्रॅनाइट व संबंधित खडक’ असे नाव सुचविले आहे.
बुंदेलखंडी ग्रॅनाइटात सु. ३० सेंमी. (क्वचित ६० सेंमी.) पर्यंत रूंदीच्या पेग्मटाइट खडकांच्या शिरा सर्वत्र आढळतात. या अती भरडकणी पेग्मटाइटामध्ये क्वॉर्ट्झ व फेल्स्पार (ऑर्थोक्लेज वा प्लॅजिओक्लेज किंवा दोन्ही) हीच खनिजे असतात गौण खनिजे यात आढळली नाहीत. या ग्रॅनाइटात क्वॉर्ट्झाच्याही शिरा विपुल असून त्यांची रुंदी काही सेंमी. पासून १०० मी. पर्यंत आणि लांबी १०० किमी. पर्यंत आढळते. ह्या शिरा जवळजवळ सरळसोट असून ईशान्य-नैर्ऋत्य दिशेत त्या पसरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्यापासून बनलेले वरंबे आढळतात व त्यांची उंची २०० मी. पर्यंत आढळली आहे. कित्येक ठिकाणी हे वरंबे नदीनाल्यांच्या मार्गात आडवे आलेले असून त्यांचा उपयोग करून घेऊन दोन शिरांमधील अरुंद फटीत बंधारा बांधल्यास कृत्रिम तलाव तयार होतो. बुंदेलखंडात असे तलाव खूप ठिकाणी आहेत. क्वॉर्ट्झाच्या शिरांभोवतालचा ग्रॅनाइट कधीकधी सर्पेंटाइनयुक्त असतो. या शिरांचे कमीअधिक प्रमाणात संपीडन (दाबले जाण्याची क्रिया) झालेले असून त्यामुळे क्वॉर्ट्झाचा थोडा फार चुरा झालेला आढळतो.
ह्यांखेरीज या ग्रॅनाइटात अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) खडकांच्या असंख्य भित्ती (मूळच्या खडकांच्या संरचनेला छेदून जाणाऱ्या व समांतर पृष्ठे असलेल्या भेगेत शिलारस थिजून बनलेल्या राशी) आढळतात. ह्या भित्तींचे अजिबात रूपांतरण झालेले नाही. त्या क्वॉर्ट्झांच्या शिरांशी ७०० चा अथवा ९०० चा कोन करून पसरलेल्या आहेत, हे नक्की. तथापि त्या आर्कीयन कालीन आहेत की पुराण महाकल्पातील आहेत, हे सांगणे कठीण आहे [⟶ आर्कीयन पुराण महाकल्प व गण]. किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) खनिजांच्या साहाय्याने काढलेले या ग्रॅनाइट खडकांचे वय २१८.७ ते २५२ कोटी वर्षे आले आहे.
राजस्थानात चितोड व भिलवाडा यांच्या दरम्यान बेराच नदीभोवतीचा बेराच ग्रॅनाइट हा बुंदेलखंडी ग्रॅनाइटाच्या पश्चिमेस सु. २७५ किमी.वर असला, तरी दोघांची वैशिष्ट्ये इतकी एकसारखी आहेत की, ते दोन्ही मूलतः एकच आहेत, यात शंका नाही.
राजस्थानात आढळणारे ⇨ अरवली संघाचे रूपांतरित खडक बुंदेलखंडी ग्रॅनाइटापेक्षा जुने आहेत की नाहीत, हा वादाचा मुद्दा आहे. काहींच्या मते बुंदेलखंडी व बेराच ग्रॅनाइटांवर अरवली संघाचे अवसाद (गाळ) साचले असून त्यांचे रूपांतरण नंतर झाले आहे तर काहींच्या मते बेराच ग्रॅनाइट अरवली संघाच्या खडकांमध्ये अंतःक्षेपित (घुसलेले) आहेत आणि इतर काहींचे म्हणणे असे की, अरवली संघातील खडकांचे ग्रॅनाइटीभवन (ग्रॅनाइटात रूपांतर) होऊन हे ग्रॅनाइट तयार झाले असावेत.
केळकर, क. वा. बोरकर, वि. द.
“