बीयारीका : द. अमेरिकेतील पॅराग्वाय देशाच्या ग्वाईरा विभागाची राजधानी. लोकसंख्या ३९,८३८ (१९७७ अंदाज). हे आसूनस्यॉनच्या अग्नेयीस सु. १५० किमी. लोहमार्गावर वसलेले आहे. देशातील एक प्रमुख औद्योगिक, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे.
प्रारंभी पाराना नदीकाठी १५७६ मध्ये हे वसविण्यात आले परंतु विद्यमान परिसरात ते १६८२ मध्ये स्थिर झाले. शहराचे हवामान आल्हाददायक असून आसमंतातील तंबाखू, कापूस, ऊस इ. शेतमालाची ही एक मोठी बाजारपेठ आहे. औद्योगिक दृष्ट्या हे शहर प्रगत असून साखर, लाकूड, कापड, मद्ये, कातडी वस्तू इ. उद्योग विकसित झालेले आहेत.ऊस,तंबाखू,कातडी इ.वस्तूंची येथून निर्यात होते. येथील कॅथीड्रल प्रसिद्ध आहे. शहरास धार्मिक महत्त्व असून येथे प्रवाशांची वर्दळ असते.
शहाणे, मो. ज्ञा.