बिलासपूर : मध्य प्रदेश राज्यातील बिलासपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या उपनगरांसह १,८६,८८५ (१९८१). मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील छत्तीसगढ विभागातील हे प्रस्थानक नागपूरच्या ईशान्येस ४१० किमी. अंतरावर आहे. येथून कटनीकडे एक फाटा जातो. अर्पा नदीच्या दक्षिण तीरावर सु. ३०० वर्षापूर्वी ‘बिलास’ ह्या कोळीणीने याची स्थापना केली, असे समजले जाते. हे शहर ‘कोसा’ रेशीम उद्योगासाठी व हातमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. भिलाईच्या स्थापनेनंतर याचेही औद्योगिकीकरण झपाट्याने झाले. शहरात सुती वस्रे, वनस्पतितेल यांचे उत्पादन करणारे कारखाने आहेत. कुटिरोद्योग केंद्र म्हणून हे आघाडीवर असून लाख तयार करणे व लाकूड कापणे हे महत्त्वाचे उद्योग येथे चालतात.

पंडित, अविनाश