बॉनर, जेम्स फ्रेडरिक : (१ सप्टेंबर १९१० – ). अमेरिकन जीववैज्ञानिक. फलित अंड्यापासून म्हणजे एका कोशिकेपासून (पेशीपासून) विविध प्रकारच्या पुष्कळ कोशिका असलेला प्रौढ जीव ज्या यंत्रणेद्वारे निर्माण होतो, तिला जैव विकास म्हणतात. बॉनर यांनी या क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांचा जन्म ॲन्स्ली (नेब्रॅस्का, अमेरिका) येथे झाला. त्यांनी १९३१ साली उटा विद्यापीठाची ए.बी. ही पदवी रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन मिळवली आणि १९३४ साली त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची जीवविज्ञान शाखेची पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. १९३५ साली ते याच संस्थेत दाखल झाले व १९४६ साली तेथे ते प्राध्यापक झाले. १९५० साली त्यांची नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड झाली.

बॉनर यांनी प्रथम कोशिकेतील जीवद्रव्यात असणाऱ्या रिबोसोम या कोशिकांगावर संशोधन केले [⟶ कोशिका]. रिबोसोममध्ये असलेले आरएनए [रिबोन्यूक्लिइक अम्ल ⟶ न्यूक्लिइक अम्ले] हे केंद्रकांत (कोशिकांच्या जीवनाकरिता आवश्यक असलेल्या नियंत्रक गोलसर पुंजांत) डीएनएपासून (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लापासून) निर्माण होते, हा शोध त्यांनी लावला. प्रत्येक कोशिकेच्या केंद्रकात डीएनएपासून बनलेली गुणसूत्रे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) असतात. या गुणसूत्रांत त्या जीवाचे सर्व जननिक वृत्त (आनुवंशिक गुणदोषांसंबंधीची माहिती) सामावलेले असते. गुणसूत्रापासून मिळणाऱ्या सूचनेनुसार कोशिकेत प्रथिने, एंझाइमे (जैव रासायनिक विक्रियांना उत्प्रेरक-प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणाऱ्या पदार्थासारखे-असलेले प्रथिनयुक्त पदार्थ) व रेणू तयार होतात. हे रेणू व एंझाइमे तयार करण्याकरिता डीएनएपासून संदेशक आरएनएची ( प्रथिन संश्लेषणासाठी-घटक रेणू एकत्र आणले जाऊन बनण्यासाठी-जननिक वृत्त डीएनएकडून रिबोसोमकडे घेऊन जाणाऱ्या आरएनएच्या रेणूची ) निर्मिती होते. या संदेशक आरएनएमध्ये असलेल्या माहितीचे रिबोसोमाद्वारे निःसंकेतन (उलगडा) होऊन विशिष्ट प्रथिनाची, एंझाइमाची किंवा जटिल रेणूची जुळणी होते. जीवाच्या सर्व कोशिकांमध्ये ही जुळणीची पद्धती वरीलप्रमाणेच असते. उच्चतर जीवांत सर्वच कोशिका एकसारखे कार्य करीत नाहीत. त्यांचे समूह बनतात व प्रत्येक समूहास ऊतक (समान रचना व कार्य असलेले पेशीसमूह) म्हणतात. जरी निरनिराळ्या ऊतकांतील कोशिकेत सर्व गुणसूत्रे व जीनसमूह [ गुणसूत्रामधील आनुवंशिक घटकांच्या एककांचा समूह ⟶ जीन ] असला, तरी त्यांच्या क्रियेत भिन्नता आढळते. रक्तातील कोशिका हीमोग्लोबिन (ज्यामुळे रक्ताला लाल रंग येतो ते लोहयुक्त प्रथिन) हे द्रव्य तयार करतात, तर स्नायूतील कोशिका स्नायूचे एंझाइम तयार करतात. जेव्हा कोशिकेत फक्त हीमोग्लोबिन तयार होत असते तेव्हा गुणसूत्रातील तर जीन काय करतात, हा प्रश्न बॉनर यांना पडला. या इतर जीनांच्या क्रियाशीलतेचे निरोधन होत असावे हे सयुक्तिक वाटते. या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्याकरिता बॉनर यांनी कोशिकांचे विभदन (कार्यविभागणीनुसार होणारे रूपांतर) या विषयावर संशोधन केले. त्यांनी कोशिकेतील गुणसूत्रे विलग करून परीक्षानळीत त्यांच्यापासून आरएनए तयार केले. जर शुद्ध रिबोसोम (ज्यावर पूर्वीचे संदेशक आरएनए नागी असे) व ॲमिनो अम्ले [⟶ ॲमिनो अम्ले] या तयार केलेल्या आरएनएत मिसळली, तर एंझाइमे तयार होतात, हे त्यांनी दाखविले. बॉनर आणि त्यांच्या सहाध्यायांस असे आढळून आले की, जीनांच्या क्रियाशीलतेचे निरोधन (दडपले जाण्याची क्रिया) हिस्टोन या प्रथिनामुळे होते. गुणसूत्रापासून हिस्टोन विलग केले म्हणजे पूर्वी जे जीन निष्क्रीय होते ते क्रियाशील बनतात. हिस्टोन हेच एकमेव निरोधक प्रथिन आहे की काय हे मात्र निश्चितपणे सांगता आले नाही. बॉनर यांना असेही आढळून आले की, काही लहान रेणू काही जीनांना क्रियाशील किंवा निष्क्रीय बनवू शकतात. ह्या लहान रेणूंत काही हॉर्मोनांचा [वाहिनीविहीन ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावांचा, ⟶ हॉर्मोने] अंतर्भाव आहे. काही वनस्पतींवर जिबरेलिक अम्ल या हॉर्मोनाचा प्रयोग करून बॉनर यांनी आपले वरील विधान सिद्ध केले. यानंतर आणखी काही हॉर्मोनेही याप्रमाणेच प्रभावी आहेत, असे आढळून आले. रेणवीय स्तरावर हॉर्मोन व हिस्टोनासारखे जीन-निरोधक प्रथिन यांचा अनिरोधनाच्या (एंझाइम-निरोधक माध्यमातून कोशिका अनिरोधक माध्यमात नेली जाण्याच्या) क्रियेत एकमेकांवर काय परिणाम होतो, याचाही वॉनर यांनी अभ्यास केला.

बॉनर व के.मारुशिगे यांना १९७१ साली असे आढळून आले की, गुणसूत्राच्या काही भागाचे एंझाइमाच्या साहाय्याने शीघ्र निम्नीकरण (जटील रेणूंचे साध्या रेणूंत रूपांतर होण्याची क्रिया) होते. हा भाग क्रियाशील असतो. या भागापासून संदेशक आरएनए तयार होते. गुणसूत्राच्या जीन-निरोधक हिस्टोन या प्रथिनाचे वेष्टिलेल्या भागाचे निम्नीकरण होत नाही. गुणसूत्रातील फक्त पाच ते दहा टक्के भाग क्रियाशील असतो. या क्रियाशील भागातील जीनांवरच त्या कोशिकेचे कार्य आधारित असते. बॉनर यांना गुणसूत्राचे हे क्रियाशील भाग विलग करण्यात यश आले व त्यांनी त्यापासून गुणसूत्रेही तयार केली.

स्वतः व इतरांबरोबर बॉनर यांनी बरेच ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : प्लँट बायोकेमिस्ट्री (१९५०), मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ डेव्हलपमेंट (१९६५).

फाळके, धै. शं. इनामदार, ना. भा.