बॅसेलेसी : (मयाळ कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] एक लहान कुल. जे. हचिन्सन यांनी याचा अंतर्भाव चिनोपोडिएलीझमध्ये [चाकवत गणात चाकवत गणात ⟶चिनोपोडिएसी] केला असून ए. एग्लंर यांच्या पद्धतीत सेंट्रोस्पर्मी गणात हे कुल घातले आहे. जी बेंथॅम व जे. डी. हूकर यांनी या कुलातील वनस्पती चिनोपोडिएसीमध्ये (चाकवत कुलात) समाविष्ट केल्या होत्या. तख्तजान यांनी हे कुल कॅरिओफायलेलीझमध्ये (पाटलपुष्प गणात) समाविष्ट केले असून याचा पोर्चुलॅकेसी (लोणी कुल) या कुलाशी आप्तभाव दर्शविला आहे. मयाळ (सं. उपोदकी) ही बॅसेला वंशातील वनस्पती भारतात (व सर्व आशिया खंडात) आढळत असल्याने बॅसेलेसी या कुलाला मयाळ कुल हे मराठी नाव सुचविले आहे. यामध्ये एकूण पाच वंश व सु. बावीस जाती (जे.सी. विलिस यांच्या मते चार वंश व पंचवीस जाती) असून त्यांचा प्रसार अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडात झालेला आहे. या जाती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) वेली असून त्या काहीशा मांसल व केशहीन असतात. त्यांना जमिनीत मूलक्षोड (अनेक मुळे निघाली आहेत असे जाडजूड खोड) किंवा ग्रंथिल (गाठीसारखे) जाडजूड खोड असते आणि त्यापासून दरवर्षी जमिनीवरचा नवीन भाग (प्ररोह) वाढतो. पाने एकाआड एक, साधी, जाडसर, कधी रसाळ, कमीजास्त लांब देठाची व उपपर्णहीन असतात. फुलोरा मंजरी, कणिश किंवा परिमंजरी [⟶ पुष्पबंध] असून त्यावर लहान, नियमित, एकलिंगी अथवा द्विलिंगी आणि बहुधा आकर्षण रंगाची सच्छदक (तळाशी लहान उपांगे असलेली) फुले येतात. फुलात कमीजास्त जुळलेली पाच परिदले बहुधा चिरस्थायी (दीर्घकाल राहणारी असतात. केसरदले पाच, परिदलांसमोर व तळाशी चिकटलेली) असून तीन जुळलेल्या किंजदलाच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा (पुटक) व त्यात एक तळातून आलेले वक्रमुख बीजक (वाकडे अपक्व बीज) असते [⟶ फूल]. मृदुफळ किंवा अश्मगर्मी फळ (आठळी फळ) सतत राहणाऱ्या परिदलाने वेढलेले असते बिया सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) असतात.

या कुलातील पाच वंशांपैकी बौसिंगॉल्टिया वंशाच्या सु. बारा जाती द. अमेरिकेत व वेस्ट इंडिजमध्ये, ॲन्रेडराची एक जाती अमेरिकेत, टूर्नोनियाची एक जाती कोलंबियामध्ये, उल्लूकसची एक जाती अँडीजमध्ये, बॅसेलाची एक जाती आशियात, दोन आफ्रिकेत व तीन मॅलॅगॅसीत आढळातात परंतु ॲन्रेडेरा वंशाचा अंतर्भाव बौसिंगॉल्टिया वंशात केला जात असल्याने एकूण वंश चारच मानतात. या कुलाचे पोर्चुलॅकेसी व चिनोपोडिएसी या कुलांशी आप्तभाव आहेत. मॅदीरा व्हाइन (बौसिंगॉल्टिया) ही शोभेकरिता बागेत लावतात. मयाळाच्या काही जातींचे पल्लव मलबारात भाजीकरिता (स्पिनॅक) वापरतात. उल्लूकस ट्युबरोससचे गड्डे (मुळे) बटाट्याऐवजी उष्ण कटिबंधीय अमेरिकेत उपयोगात आहेत. भारतात बॅसेला रुब्रा (मयाळ, मायाळ, वेलबोंडी) भाजीकरिता बागेत लावतात ती औषधीही आहे.

कॅरिओफायलेलीझ (सेंट्रोस्पर्मी) या गणातील बहुतेक वनस्पती ⇨ ओषधी (नरम व लहान वनस्पती) व झुडपे आणि क्वचित वृक्ष आहेत. फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी व अरसमात्र असतात. त्यात परिदलांची दोन मंडले, परंतु काहींत ऱ्‍हसनामुळे एकच मंडल असते. ती अवकिंज, क्वचित परिकिंज असतात. किंजपुट ऊर्ध्वस्थ (परिदलांच्या वरच्या पातळीस), एकपुटक (एकच कप्पा असलेला) क्वचित बहुपुटक (अनेक कप्प्यांच्या) असून [⟶ फूल] बीजके वक्रमुख असतात बीजकाला दोन आवरणे असून त्यांची संख्या एक ते अनेक असते. ती बीजके मध्यवर्ती किंवा तळाशी असलेल्या बीजकधानीवर चिकटलेली असून त्यांचे देठ लांब असतात त्यांत गर्भ वक्र किंवा गुंडाळीसारखा असतो बियांत परिपुष्क (प्रदेहापासून बनलेले अन्न) असतो [⟶ फळ]. ह्या गणांत एकूण ८ कुले सर्वसाधारणपणे घालतात. हचिन्सन यांनी कॅरिओफायलेलीझ व चिनोपोडिएलीझ या दोन गणांत ही कुले विभागून ठेविली आहेत. ह्या संपूर्ण गणाचा उगम ⇨ रॅनेलीझ (मोरवेल गण) पासून कॅक्टेलीझ [⟶ कॅक्टेसी] ह्या जोडणाऱ्या दुव्यातून झाला असून क्रमविकासात (उत्क्रांती होताना) परिदलातील एका मंडलाचे ऱ्‍हसन झाले आहे.

पहा : कॅरिओफायलेसी घोळ मयाळ.

संदर्भ : 1. Lawrence, G H. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

           2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta 1964.

           3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1933.

परांडेकर, शं. आ.