मॉनो, झाक ल्यूस्यँ: (९ फेब्रुवारी १९१०–३१ मे १९७६). फ्रेंच जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी फ्रेंच जीववैज्ञानिक ⇨ फ्रांस्वा झाकॉब यांच्याबरोबर आनुवंशिकीतील संदेशक आरएनए [रिबोन्यूक्लिइक अम्ले→ न्यूक्लिइक अम्ले] व ओपेरॉन या महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या. या कार्याकरिता मॉनो व झाकॉब यांना ⇨

आंद्रे ल्वॉफ या फ्रेंच जीववैज्ञानिकांच्या समवेत १९६५ सालच्या वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञान विषयाच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

मॉनो यांचा जन्म पॅरिस येथे झाला. पॅरिस विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यांनी बी. एस्. (१९३१) व डी. एस्‌सी. (१९४१) या पदव्या संपादन केल्या. १९३२–३४ या काळात त्यांनी जैव क्रमविकासासंबंधी (उत्क्रांतीसंबंधी) संशोधन केले. १९३४ मध्ये पॅरिस विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेत प्राणिविज्ञानाच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली व १९४५ पर्यंत या पदावर त्यांनी काम केले. मध्यंतरी १९३६ मध्ये रॉकफेलर अनुदान मिळाल्याने त्यांनी काही काळ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम केले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी १९३९४५ या काळात लष्करातही नोकरी केली. १९४५ मध्ये ते पॅरिस येथील पाश्चर इन्सिट्यूटच्या प्रयोगशाळेचे संचालक झाले व पुढे त्याच संस्थेतील कोशिकीय (पेशीविषयक) जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदावर त्यांची नेमणूक झाली. १९५९ मध्ये पॅरिस विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेत ते चयापचय (सजीवांच्या शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींविषयीच्या शास्त्राच्या) रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १९६७ साली ते कॉलेज द फ्रान्समध्ये प्राध्यापक झाले. १९७१ मध्ये पाश्चर इन्सिट्यूटच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली. नंतर १९७३ साली कॉलेज द फ्रान्समध्ये सन्माननीय प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. 

मॉनो यांचे सुरुवातीचे कार्य मुख्यत्वे सूक्ष्मजंतूतील बीटा-गॅलॅक्टोसाइडेज या प्रवर्तनशील एंझाइमाच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनाच्या) संश्लेषणासंबंधी (शरीरात तयार होण्याच्या क्रियेसंबंधी) होते. १९४६ मध्ये सुरू केलेल्या या संशोधनाद्वारे त्यांनी असे दाखविले की, या एंझाइमाच्या प्रवर्तित निर्मितीच्या अगोदर अस्तित्वात असलेल्या व प्रथिनाचा पाया असलेल्या द्रव्याच्या रूपांतराने हे एंझाइम तयार होत नसून प्रथिन रेणूंचे सरळ संश्लेषण होते. पुढे जर्मेन कोएन बाझीर यांच्या सहकार्याने त्यांनी असेही दाखविले की, बीटा गॅलॅक्टोसाइडेजाचे संश्लेषण ज्यांत बाह्य प्रवर्तनाशिवाय अंगभूतपणे होते असे उत्परिवर्तित (आनुवंशिक लक्षणांमध्ये एकाएकी बदल झालेले) सूक्ष्मजंतू अस्तित्वात आहेत. 

पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये झाकॉब आणि अभ्यागत अमेरिकन जीववैज्ञानिक आर्थर पार्डी यांच्याबरोबर काम करीत असताना मॉनो यांनी ‘पा झा मॉ प्रयोग’ या नावाने आता प्रसिद्ध असलेल्या प्रयोगात सहकार्य केले. बीटा गॅलॅक्टोसाइडेज अंगभूतपणे संश्लेषित करू शकणाऱ्या ‘स्त्री’ उत्परिवर्तित सूक्ष्मजंतूचा बाह्य प्रवर्तनानेच बीटा गॅलॅक्टोसाइडेज संश्लेषित करू शकणाऱ्या ‘नर’ सूक्ष्मजंतूशी संयोग केला असता प्रवर्तनत्व  हे अंगभूततेपेक्षा प्रबल असते, असे या प्रयोगाद्वारे दाखविण्यात आले. यावरून या शास्त्रज्ञांनी अशी संकल्पना मांडली की, प्रवर्तकाने एखाद्या निरोधकाला (दमनकाला) निर्बल केल्यावर एंझाइमाच्या संश्लेषणाला प्रारंभ होतो. हा निरोधक स्वतः एका विशिष्ट जीनामुळे (गुणसूत्रावरील म्हणजे आनुंवशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकावरील लक्षणे निदर्शित करणाऱ्या विशिष्ट एककामुळे) निर्माण होतो. त्यानंतर मॉनो व झाकॉब यांनी विविध नियंत्रक उत्परिवर्तित सूक्ष्मजंतूंवर प्रयोग करून १९६१ मध्ये संदेशक आरएनए व ओपेरॉन या संकल्पना मांडल्या. त्यांच्या प्रतिपादनानुसार प्रथिनांच्या निर्मितीतील पहिली पायरी म्हणजे डीएनए [डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल → न्यूक्लिइक अम्ले] सर्पिलातील क्षारकांच्या श्रेणीला पूरक असलेल्या क्षारकांच्या श्रेणीचे आरएनएमध्ये प्रतिलेखन होणे, ही होय. हेच आरएनए प्रथिनांचे जेथे संश्लेषण होते, त्या रिबोसोमांकडे [→ कोशिका] जननिक संदेश (माहिती) वाहून नेत असल्याने त्याला मॉनो व झाकॉब यांनी संदेशक आरएनए असे नाव दिले. संदेशक आरएनए अगोदरच अस्तित्वात असलेला संदेशग्राहक आरएनएयुक्त रिबोसोमांशी संयोग पावते आणि तेथे स्वतःमधील क्षारक श्रेणीतील माहितीनुसार प्रथिन संश्लेषणासाठी ⇨ ॲमिनो अम्ले क्रमवार जोडण्याची क्रिया दिग्दर्शित करते.

 ओपेरॉन हा गुणसूत्रातील परस्परसंबंधित कार्य असलेले व एकमेकांच्या लगतच्या भागातील जीन (सिस्टॉन) आणि त्यांच्या भागीदारीत असलेला नियंत्रक जीन (याला ऑपरेटर असे म्हणतात) यानी बनलेला असतो, असे मॉनो व झाकॉब यांनी प्रतिपादले. जेव्हा ऑपरेटर ‘अनावृत्त’ (खुल्या) अवस्थेत असतो तेव्हा जीन संदेशक आरएनएचे संश्लेषण करू शकतात. जर ऑपरेटर एखाद्या विशिष्ट निरोधक पदार्थांमुळे (हा नियंत्रक जीनामुळे निर्माण झालेला असतो) ‘आवृत्त’ (बंद) अवस्थेत असेल, तर संदेशक आरएनए निर्माण होत नाही. ओपेरॉन संकल्पनेमुळे सूक्ष्मजंतूंमधील एंझाइमांचे संश्लेषण व सूक्ष्मजंतूंतील परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या) व्हायरसाच्या सुप्तावस्थेच्या प्रवर्तनाचे नियंत्रण यांचे स्पष्टीकरण मिळाले.

मॉनो यांना नोबेल पारितोषिकाखेरीज फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे माँत्यॉ फिजिऑलॉजी पारितोषिक (१९५५) व शार्ल लेऑपॉल्द मायर पारितोषिक (१९६२), लिजन ऑफ ऑनरचे ऑफिसर (१९६३), ऑक्सफर्ड, शिकागो व रॉकफेलर या विद्यापीठांच्या सन्माननीय डी. एस्‌सी. पदव्या वगैरे बहुमान मिळाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना ऑनररी कर्नल ऑफ द रिझर्व्ह, क्रॉस ऑफ वॉर (Croix de Guerre, १९४५) ब्राँझ स्टार पदक इ. सन्मान मिळाले. अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस (१९६०), लंडनची रॉयल सोसायटी (१९६८), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (वॉशिंग्टन, १९६८), अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी (१९६९) वगैरे अनेक मान्यवर संस्थांचे ते परदेशी सदस्य होते. रेणवीय जीवविज्ञानावर त्यांनी अनेक संशोधनपर निबंध लिहिलेले असून Le Hasart et la Necessite(१९७० इंग्रजी भाषांतर चान्स अँड नेसेसिटी, १९७१) हा त्यांचा सखोल तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. सर्व प्रकारचे सजीव हे केवळ योगायोगानेच निर्माण झाले आहेत आणि ते सजीव म्हणून एकत्रित आले म्हणजे त्यांत अनिवार्य गरजेचे बंधन निर्माण होते, असे विचार त्यांनी या ग्रंथात मांडलेले आहेत. नियती ही वर्तमान काळातच असून सृष्टिनिर्मितीची कोणतीही बृहत् योजना अस्तित्वात नाही, असे त्यांचे म्हणणे होते. कॅन येथे ते मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं. मिठारी, भू. चिं.