माँटी कार्लो : जुगारगृहांसाठी जगप्रसिद्ध असलेले मोनाको देशातील शहर. लोकसंख्या १३,१५४ (१९८२). हे मोनाकोची राजधानी मोनाकोव्हिलच्या उत्तरेस १·६ किमी. वर व फ्रान्समधील नीस या सुविख्यात पर्यटनकेंद्राच्या ईशान्येस १६ किमी. वर भूमध्य समुद्राकाठी वसलेले आहे.

मोनाकोचा राजपुत्र तिसरा चार्ल्‌स (कार्लो) याने समुद्रकाठच्या या जंगलमय परंतु निसर्गसुंदर भागात १८५६ मध्ये एका आलिशान जुगारगृहाची स्थापना केली. या जुगारगृहासभोवार विस्तारलेल्या गावाला राजपुत्राने आपले स्वतःचे नाव दिले. तेव्हापासूनच जगातील श्रीमंत, चैनी व विलासी प्रवाशांचे हे आवडते शहर बनले आहे. आरोग्यवर्धक हवामान, रम्य वनश्री, अनेक विहारस्थळे  व जुगारगृहे यांमुळे येथील अत्यंत उंची विलासी हॉटेले उन्हाळ्यात व हिवाळ्यामध्ये देशोदेशींच्या पर्यटकांनी भरलेली असतात. या काळात कलाकौशल्यांचे व खेळांचे विविध प्रकार दिसून येतात. जुगारगृहांशिवाय येथे संगीतिका गृहे नृत्य केंद्रे, ल्यूम्येर रंगमंदिर, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्लब (१९३२) इ. संस्था आहेत. येथील जुगारगृहांचा मक्ता १९५४ पासून ॲरिस्टॉटल ऑनॅसिस या एका धनाढ्य ग्रीक जहाज व्यापाऱ्याकडे होता. १९६७ मध्ये त्यांचा कारभार मोनाको सरकारने आपल्या ताब्यात घेतला. मोनाकोच्या नागरिकांना जुगारगृहांतून जुगार खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. ‘रूलेट’, ‘बॅकॅरा’, इ. खेळ येथील जुगारगृहांत लोकप्रिय आहेत. १९३१–६३ या काळात येथे रशियन बॅले कंपनीने अनेक नृत्यप्रकार सादर केले. येथे प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय ‘मोनाको ग्रां. प्री.’ व ‘माँटी कार्लो रॅली’ अशा मोटारगाड्यांच्या चित्तथरारक शर्यती भरविल्या जातात. जवळच शहराच्या वायव्येस आप्ल्स पर्वतात फ्रान्समधील बोसॉले हे हवेशीर ठिकाण आहे.

दळवी, र. कों.