शोण : सोन. गंगा नदीला दक्षिणेकडून मिळणारी एक प्रमुख उपनदी. पुराणगंथांत तिला सुवर्ण नदी म्हटलेले आहे. शोणभद्रा, हिरण्य-वाह (हिरण्य-वाहू), सोनोस या नावांनीही तिचा उल्लेख आढळतो. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, झारखंड व बिहार राज्यांतून वाहणाऱ्या या नदीची लांबी सु. ७८० किमी. व जलवाहन क्षेत्र सु. ७१,९०० चौ. किमी. आहे. छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर जिल्ह्यात, मैकल डोगररांगांमधील अमरकंटक या उच्च्भूमी प्रदेशात तिचा उगम होतो. उगमानंतर बिलासपूर व शहडोल (मध्य प्रदेश) जिल्ह्यांतून ती उत्तरेस वाहत जाते. सुरूवातीच्या काही भागांत ती वायव्यवाहिनी दिसते. त्यानंतर ती ईशान्यवाहिनी होऊन प्रथम सिंधी (म. प्र.) जिल्ह्यातील कैमूर टेकडयंमधून, पुढे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून व त्यानंतर झारखंड-बिहार राज्यांच्या सरहद्दीवरून जाते. पुढे बिहार राज्यातून वाहत जाऊन पाटणा शहराच्या पश्चिमेस गंगा नदीला मिळते. बिहारमधून ती रोहटास-पालामाऊ (झारखंड), रोहटास-औरंगाबाद, भोजपूर-गया, भोजपूर-पाटणा या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहते. शोण नदी हंगामी आहे. ती जलवाहतुकीस उपयुक्त नाही. तिचे खोरे अरण्यमय व विरळ लोकवस्तीचे आहे. जोहिला, बनास, गोपट, रिहांड व कनहार या तिच्या प्रमुख उपनदया आहेत. शोण कालवा प्रकल्पांतर्गत १८७५ साली डेहरी (बिहार) येथे शोण नदीवर एक मोठे धरण बांधण्यात आले. त्यामुळे सु. २,८०,००० हे. क्षेत्र ओलिताखाली आले. डेहरी येथूनच ग्रँड ट्रंक मार्ग जातो. मध्य प्रदेशात शोण नदीवर अंदाजे १,०५४.९६ कोटी रूपये खर्चाचा बनसागर प्रकल्प उभारण्यात येत आहे. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्हावयाचा होता. नोव्हेंबर २००० पर्यंत या प्रकल्पावर ६६०.८७४ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. शोण नदीच्या काही उपनदयांवरही धरणे बांधली जात आहेत.

चौधरी, वसंत