माल्म : स्वीडनमधील एक प्रमुख बंदर आणि माल्मह्यूस परगण्याचे मुख्यालय. लोकसंख्या २,३०,३८१ (१९८२ अंदाज). हे डेन्मार्कच्या कोपनहेगन या राजधानीच्या पूर्वेस २६ किमी., बाल्टीक व उत्तर समुद्र यांमधील उरसूंद सामुद्रधुनीवर, स्वीडनच्या दक्षिण भागात वसलेले आहे. जवळच बुलतॉफ्त येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. व्यापारी बंदर, औद्योगिक केंद्र व स्वीडनमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथील प्रारंभीची वस्ती सु. बाराव्या शतकातील असून हेरिंग माशांच्या व्यापारामुळे जर्मन व्यापारी याकडे आकृष्ट झाले. येथील सागरकिनाऱ्याच्या विशिष्ट रचनेवरून एल्बोगिन (कोपर) म्हणून ते ओळखले जाई. ते दीर्घ काळ डॅनिश लोकांच्या ताब्यात होते. १६५८ मध्ये हे स्वीडनमध्ये समाविष्ट झाले.

स्वीडन सरकारने १७७५ मध्ये येथील बंदरसुविधांत वाढ केली आणि त्यामुळे व्यापारास चालना मिळाली. जहाजबांधणी हा तेथील प्रमुख व्यावसाय आहे. याशिवाय रासायनिक पदार्थ, कापड उद्योग, विद्युत्‌ उपकरणे, कागद, रबर, चामडी वस्तू, अन्नप्रक्रिया इ. व्यवसाय विकसित झाले आहेत. येथून कोळसा, तेल, रसायने इत्यादींची आयात तर साखर, सिमेंट, धान्य, इत्यादींची निर्यात होते. येथे नाविक तळही आहे. येथील सेंट पीटर चर्च (चौदावे शतक) माल्मह्यूस किल्ला व संग्रहालय, फोकेटस पार्क, नगरभवन (१५४६) इ. वास्तू उल्लेखनीय आहेत.

गाडे, ना. स.