मार्तीनीक बेटे : पूर्व कॅरिबियन समुद्रातील वेस्ट इंडीज बेटांपैकी लेसर अँटिलीस द्वीपसमूहातील विंडवर्ड बेटांमधील एक बेट व फ्रान्सचा एक सागरपार प्रांत. क्षेत्रफळ १,११६ चौ. किमी., लांबी ६४ किमी., कमाल रूंदी २६ किमी., लोकसंख्या ३,३४,००० (१९८४). फॉर द फ्रान्स उपसागरावरील प्रमुख शहर व बंदर असलेले फॉर द फ्रान्स हे राजधानीचे ठिकाण असून त्याची लोकसंख्या ९९, ८४४ (१९८२) आहे.

या ज्वालामुखीजन्य बेटावर उत्तरेकडे माँपले, मध्यभागी कार्बे, दक्षिणेस व्होक्लीं हे गिरिपिंड इ. प्रमुख प्राकृतिक विभाग असून त्यांवर त्याच नावाची अनुक्रमे १,३९७ मी., १,१९६ मी. व ५०५ मी. उंचीची ज्वालामुखी पर्वतशिखरे आहेत. ८ मे १९०२ या दिवशी माँपलेच्या उद्रेकामुळे बेटाचा एक-दशांश भाग उद्‌ध्वस्त होऊन सीं प्येर हे व्यापारी शहर संपूर्ण नष्ट झाले व ३०,००० लोक मरण पावले. बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर फॉर द फ्रान्स व ली मारीं हे दोन मोठे उपसागर, तेथून अंतर्भागात लामांतीं हे एकमेव विस्तीर्ण मैदान व पूर्व किनाऱ्यावर अपतट प्रवालभित्ती, कंकणाकार आखाते, उंच भूशिरे असून उत्तर किनाऱ्यावर ९० मी. उंचीचे कडे आहेत. मॉर्न-रूझ येथे उष्णोदकाचे झरे आहेत.

येथील नद्या आखूड, जोरदार प्रवाहाच्या व बऱ्याच खंडित प्रवाहाच्याही आहेत. मध्यवर्ती भागात त्या सर्व दिशांस वाहतात.

येथील हवामान उबदार व आर्द्र असून ईशान्य व्यापारी वारे प्रभावी आहेत. वार्षिक सरासरी तापमान २६ से. असते. पाऊस जवळजवळ वर्षभर पडत असून मध्यवर्ती पर्वतीय भागात वार्षिक पर्जन्य ५५९ सेंमी. तर नैर्ऋत्य निमओसाड भागात तो ५५·९ सेंमी. पडतो. तथापि जानेवारी ते जून हा त्यांतल्या त्यात कमी पावसाचा काळ असतो. मधूनमधून येथे हरिकेन ही प्रचंड विनाशकारी चक्री वादळे होतात. १९८० च्या वादळाने केळीच्या बागा पार उद्‌ध्वस्त होऊन व्यापाराला मोठाच धक्का बसला.

येथे वनस्पतींची वाढ विपुल व जलद होते. बेटाचा चौथा हिस्सा वनव्याप्त आहे. पर्वतीय खोल दऱ्यांत वर्षावने, किनाऱ्याजवळ कच्छ वनस्पती, नैर्ऋत्य भागात काटेरी व खुरटी झुडुपे व गवत आणि पर्वत उतारांवर उंचउंच जावे तसतसे वर्षारण्यांपासून काटेरान, दगडफूल, शैवालापर्यंत निरनिराळ्या वनस्पती आढळतात. काही पक्षी व कीटक हेच येथील मुख्य प्राणी तथापि मुंगूस, रॅट टेल व्हायपर (विषारी साप), रानससे, रानकबुतरे, होले, हे प्राणी कोठेकोठे आहेत.

ऊस, केळी, अननस ही प्रमुख व्यापारी पिके असून तंबाखू, कापूस, टोमॅटो, कोबी, ॲव्होकॅडो, वांगी, आंबे, लिंबे, कॉफी, कोको, याम, टॅपिओका इ. अनेक पिके होतात.

कोलंबस १५०२ मध्ये आपल्या चौथ्या सफरीच्या वेळी मार्तीनीकवर आला होता. येथील कॅरिब या मूळच्या कडव्या व दर्यावर्दी लोकांनी वसाहतींस विरोध केला. स्पॅनिशांनी या बेटाकडे दुर्लक्ष केले परंतु पश्चिमेकडील अर्धा भाग कॅरिबांस देण्याचे मान्य करून १६३५ मध्ये फ्रेंचांनी येथे वसाहत केली. नंतर त्यांनी मूळच्या लोकांस नामशेष केले व उसाच्या शेतांवर मजूर म्हणून आफ्रिकेतून निग्रो गुलाम आणले.


बहुतेक लोक निग्रो, मिश्रवंशीय मुलेटो व मागासलेले असले, तरी फ्रेंच वसाहतकऱ्यांचे वंशज व नवीन मुद्दाम आलेले फ्रेंच यांच्याच हाती बहुतेक मोक्याची सत्तास्थाने आहेत. डचांनी व ब्रिटिशांनी अनेक आक्रमणे केली आणि फ्रेंच व ब्रिटिश यांमध्ये पुष्कळ वसाहत-तंटे झाले, तरी अखेर १८१६ पासून मार्तीनीक कायमचे फ्रेंचांकडेच राहिले. नेपोलियनची प्रथम पत्नी महाराणी जोझेफीन येथेच जन्मली व वाढली. १८४८ मध्ये गुलामगिरी नष्ट झाली. दुसऱ्या महायुद्धात येथून ४०,००० सैनिक फ्रान्सला पुरविण्यात आले. फ्रेंचांचा पाडाव झाल्यावर मार्तीनीकने व्हिशी शासनाला मान्यता दिली परंतु अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी १९४३ मध्ये अन्नपदार्थ वगैरेंची कोंडी करून मुक्त फ्रेंच सत्तेस मान्यता देणे भाग पाडले. फ्रेंच ही अधिकृत भाषा असली, तरी सामान्य लोक क्रिओल ही ग्रामीण भाषा बोलतात. बहुतेक लोक रोमन कॅथलिक आहेत.

 केवळ फ्रेच संसदेस जबाबदार असलेल्या नियुक्त शासकाच्या हाती सर्व सत्ता आहे. छत्तीस निर्वाचित सदस्यांचे विधिमंडळ आहे. फ्रेंच संसदेवर मार्तीनीकचे तीन व अधिसभेवर (सीनेट) आणि आर्थिक व सामाजिक परिषदेवर प्रत्येकी दोन प्रतिनिधी असतात. १९५८ मध्ये मार्तीनीकने फ्रेंच सागरपार प्रांत म्हणून रहावयाचे मान्य केले.

येथे १९६५–७० या काळात बेकारी व आर्थिक समस्यांमुळे फ्रेंचांविरुद्ध संप, निदर्शने, वांशिक दंगली इ. झाल्या. फ्रेंचांच्या मते याला क्यूबाची चिथावणी होती. १९८० मध्ये क्यूबाला पर्यटन व आर्थिक सुधारणा यांबाबत मदत आणि क्यूबाने येथे ढवळाढवळ न करणे, या मुद्यांवर तडजोड झाली. तथापि येथील आर्थिक समस्या न सुटल्यामुळे पुष्कळ लोकांनी फ्रान्सला देशांतर केले आहे.

येथील प्रमुख उद्योग शेती हाच आहे.साखर, रम, केळी, अननस,डबाबंद फळे यांची निर्यात होते परंतु निर्यातीच्या तिप्पट आयात करावी लागते. फ्रान्सला यासाठी बरीच मदत करावी लागते. मासेमारी, तेलशुद्धीकरण, खत कारखाने इ. इतरही उद्योग आहेत. चुनखडी व ग्रॅनाइट यांच्या खाणी आहेत. आर्थिक लाभाच्या दृष्टीने पर्यटन व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. सर्वस्वी आयात इंधनांपासून १९८० नंतर दरवर्षी ३० कोटी किवॉ. ता. विद्युत्‌शक्ती निर्माण केली जाते. येथे लोहमार्ग नाहीत. फ्रान्स व अमेरिका यांच्याकडे नियमित सागरी व हवाई वाहतूक चालते. किनारी वाहतूक बोटींनी व अंतर्गत वाहतूक रस्त्यांवरून चालते.

 मैदानात लामांतीं व ईशान्य किनाऱ्यावर सींत मारी ही इतर महत्वाची शहरे आहेत.

मार्तीनीकमध्ये आधुनिक इमारती, बँका, दवाखाने, रूग्णालये, आरोग्यकेंद्रे, सूतिकागृहे, शाळा, कलाकेंद्रे, चित्रपटगृहे, रेडिओ व दूरचित्रवाणी इत्यादींची संख्या वाढत आहे. प्राथमिक शिक्षण निःशुल्क आहे. माध्यमिक व व्यावसायिक शाळा, खाजगी शिक्षणसंस्था व अँटिलीस विद्यापीठ आहे. काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी फ्रान्सला जातात.

चौधरी, वसंत कुमठेकर, ज. ब.