किसांगानी : १९६६ पर्यंतचे स्टॅन्लीव्हिल. काँगो लोकशाही गणतंत्राच्या, आता झाईरे गणतंत्राच्या पूर्व झाईरे प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,४९,९००, (१९६६ अंदाज). हे काँगो नदीच्या दोन्ही तीरांबर वसले असून उत्तरेकडे काँगोची उपनदी चोफापर्यंत त्याचा विस्तार आहे. येथून थोड्याच अंतरावर स्टॅन्ली फॉल्स असून किन्शासा १,२४० किमी. नैर्ऋत्येस आहे. लूआलाबा वरची काँगो नदीवरील द्रुतवाह टाळण्यासाठी बांधलेल्या पाँत्यॅर्व्हिल-स्टॅन्लीव्हिल लोहमार्गावरील अंतिम स्थानक आहे. काँगो नदीवरील मोठी जलवाहतूक, आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतूक, यांमुळे किसांगानी दळणवळणाचे व व्यापाराचे मोठे केंद्र समजले जाते. १९६३ पासून येथे विद्यापीठ सुरू झाले असून येथे अनेक शिक्षणसंस्था आहेत. सुप्रसिद्ध समन्वेषक सर स्टॅन्ली याने १८८२ च्या सुमारास येथे आपले ठाणे वसविले व नंतर ते अरबी व्यापाऱ्यांकडून घेतले. स्टॅन्लीवरूनच गावाला स्टॅन्लीव्हिल नाव पडले. शहराची वाढ प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतरच झाली. १९६४ मधील बंडाळीत किसांगानीस महत्त्व आले होते. विषुववृत्ताजवळील स्थान आणि काँगो नदीचा धबधब्यांचा परिसर, यांमुळे मध्य आफ्रिकेचे प्रवासी किसांगानीस भेट देतात.

शाह, र. रू.