पांझरा नदी: धुळे जिल्ह्यातील तापीची उपनदी. लांबी सु. १६० किमी. हिचा उगम जिल्ह्यातील नैर्ऋत्य कोपऱ्यात, सह्याद्रीतील गाळ्ण्याच्या डोंगरात व उजवीकडील गाळण्याच्या डोंगरात झाला असून, ती पिंपळनेरवरून डावीकडील धानोऱ्याचे डोंगर व उजवीकडील गाळण्याचा डोंगर यांमधून वाहते. ही पूर्ववाहिनी नदी धुळे शहरापासून पुढे ८ किमी. अंतर पूर्वेकडेच वाहत जाते. त्यानंतर तिच्या मार्गात आलेल्या भित्तिप्रस्तराला फोडून ती एका अरुंद दरीतून एकदम उत्तरेकडे वळसा घेते. नंतर थाळनरेपासून सु. ८ किमी. अंतरावर असलेल्या मुडावद येथे ती तापी नदीस मिळते. नदीच्या पूर्वप्रवाहाच्या भागात तिच्या डाव्या तीराला समांतर पसरलेल्या लांबट आकाराच्या अनेक डोंगररांगा आढळतात. पांझरा नदीपासून वर्षभर पाणीपुरवठा होत असून, अनेक ठिकाणी प्रवाहाचे पाणी अडवून सिंचनाच्या सोयी केल्या आहेत. मुख्यतः साक्री धुळे आणि सिंदखेड या तालुक्यांतील जमिनीस जलसिंचनाचा फायदा झाला आहे. तापी–पांझरा संगमाजवळ महाशिवरात्रीस यात्रा भरते.
सावंत, प्र. रा.