मार्टिन, आर्चर जॉन पोर्टर : (१ मार्च १९१० – ). ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ. वर्णलेखनाद्वारे मूलद्रव्ये ओळखण्याची व अलग करण्याची पद्धती शोधून काढल्याबद्दल मार्टिन यांना ⇨ रिचर्ड लॉरेन्स मिलिंग्टन सिंग यांच्याबरोबर १९५२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

मार्टिन यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे आधीचे शिक्षण बेडफर्ड येथील शाळेत झाले. केंब्रिज विद्यापीठातून १९३२ मध्ये त्यांनी पदवी घेतली व १९३६ मघ्ये डॉक्टरेट मिळविली. १९३३–३८ पर्यंत ते डन न्यूट्रिशनल लॅबोरेटरीत संशोधन करत होते. १९३८–४६ या कालात ते लीड्स येथील वूल इंडस्ट्रीज ॲसोशिएशनमध्ये होते. १९४६–४८ मध्ये ते नॉटिंगॅम येथे ‘बूट्‌स प्युअर ड्रग कंपनी ’त जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते. १९४८–५९ दरम्यान त्यांनी मेडिकल रिसर्च कौन्सिलमध्ये प्रथम लिस्टर इन्स्टिट्यूट आणि नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये काम केले. १९५९ मध्ये ॲबट्‌सबरी लॅबोरेटरीज लि. चे संचालक झाले. १९४१ मध्ये मार्टिन व सिंग यांनी विभाजन वर्णलेखनाची [→ वर्णलेखन] पद्धती पूर्णत्वास नेली. या पद्धतीत विश्लेषण करावयाच्या विद्रावाचा थेंब कागदाच्या पट्टीवर टाकून सुकू देतात. नंतर विद्रावातील विद्रावकाने (विरघळविणाऱ्या पदार्थाने) ही पट्टी भिजवितात. कागदामध्ये शिरणाऱ्या विद्रावकाद्वारे विद्रावातील जटिल (गुंतागुंतीच्या) मिश्रणातील संयुगे अलग केली जातात. कारण विशिष्ट विद्रावकातून निरनिराळ्या संयुगांचे विसरण (स्थानांतरण) भिन्नभिन्न वेगांनी होते. या पद्धतीमुळे अत्यल्प पदार्थ वापरून थोड्या वेळात व कमी श्रमात शेकडो पदार्थांचे विश्लेषण करता येऊ लागले. तसेच प्रतिजैविक (अँटिबायॉटिक) पदार्थ, घटसर्पाची लस, ॲमिनो अम्ले, पेप्टाइडे आणि पुष्कळ जटिल (गुंतागुंतीच्या संघटनांच्या) रासायनिक पदार्थाची शुद्धता ठरवणे शक्य झाले. किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (तोच अणुक्रमांक परंतु भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या प्रकारांचा) मार्गण मूलद्रव्ये (किरणोत्सर्गी गुणधर्मामुळे ज्यांचे स्थान ठरविणे व ज्यांचा मागोवा घेणे शक्य होते अशी मूलद्रव्ये) म्हणून उपयोग करून संयुगाचे वर्णलेखनावरील स्थान ठरविणे सहज साध्य होते. विभाजन वर्णलेखनाचा उपयोग अकार्बनी रसायनशास्त्रातदेखील होतो (उदा., विरल मृत्तीका मूलद्रव्याचे विलगीकरण करण्यासाठी).

मार्टिन व सिंग यांनी १९४१ मध्ये काही ॲमिनो अम्ले वेगळी करण्याचे प्रयत्न सुरू केले. पूर्वीच्या वर्णलेखन तंत्राचा उपयोग यासाठी होत नाही, असे त्यांना आढळून आले. त्यांनी नवीन तंत्र शोधून काढले व ॲमिनो अम्ले अलग करण्यात यश मिळविले. सच्छिद्र घन पदार्थावर रासायनिक बाष्पांचे विभेदी (भीन्न प्रकारे) शोषण होऊन ती अलग करता येऊ शकतात या परिपूर्ण वायुवर्णलेखन पद्धतीविषयीचे १९५३ सालचे त्यांचे कार्य मोलाचे आहे. अशा तऱ्हेने त्यांनी वर्णलेखनामध्ये मोलाची भर घातली [→ वर्णलेखन]. १९५० मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो झाले व १९५१ मध्ये त्यांना बर्झीलियस सुवर्णपदक मिळाले.

मिठारी, भू. चिं. जमदाडे, ज. वि.