माराकायव्हो : व्हेनेझुएलातील झूलिया राज्याची राजधानी तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक, व्यापारी शहर व बंदर. लोकसंख्या ९,२९,००० (१९८१). हे शहर व्हेनेझुएलाचे आखात व माराकायव्हो सरोवर (द. अमेरिकेतील सर्वांत मोटे-१६० किमी. लांब व १२० किमी. रूंद) यांना जोडणाऱ्या खाडीवर, राजधानी काराकासच्या पश्चिमेस ५२० किमी. वर वसले आहे.
या शहराची स्थापना १५२९ मध्ये आंब्रोस्यो आलफिंगर या धाडसी जर्मन प्रवाशांने केली पण लवकरच प्रतिकूल हवामानामुळे शहराचा ऱ्हास झाला. आलॉन्सो पाचेको या स्पॅनिश वसाहतकऱ्याने १५७१ मध्ये ‘न्वेव्हा झामोरा’ या नावाने त्याची पुनःस्थापना केली. स्पेनविरूद्धच्या युद्धात सतराव्या शतकात याची ब्रिटिश, स्पॅनिश, डच इत्यादींकडून अनेकदा लूट करण्यात आली. हेन्रि मॉर्गन या इंग्रज चाच्याने तर १६६९ मध्ये हे शहर उद्ध्वस्तच केले होते.
शहराभोवती सरोवरात १९१७ नंतर खनिज तेलाचे प्रचंड साठे आढळल्याने परदेशी वसाहतकऱ्यांचे, तेलकंपन्यांचे व खुद्द व्हेनेझुएलाचे लक्ष त्याकडे आकृष्ट झाले. फ्रेंच, ब्रिटिश, स्पॅनिश व डच या परदेशी वसाहतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करून आणि स्वतःच्या मालकीच्या तेलविहिरी खोदून संपूर्ण बंदराचा कायापालटच केला. देशाच्या एकूण ७५% तेलसाठा येथे सापडल्याने व निर्यातीसाठी नैसर्गिक असे सुरक्षित बंदर लाभल्यामुळे माराकायव्होचा जलद विकास होत गेला. हे जगातील मोठ्या खनिज तेलसमृद्ध शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले सांप्रत दक्षिण अमेरिकेचे खनिज तेलाच्या राजधानीचे शहर म्हणून यास मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सरोवराच्या अंतर्भागात असलेले तेलसाठ्याचे क्षेत्र व त्यातील गाळ काढून वाढविलेली सरोवराची खोली यांमुळे जहाजे आतपर्यंत येऊ शकतात.
शहरात खनिज तेल, रसायने, साखर, कॉफी, मद्ये, साबण, चॉकोलेट, विटा, मेणबत्त्या, सिमेंट, सुगंधी द्रव्ये, चामडी वस्तू इत्यादींचे चालतात. या बंदरातून प्रामुख्याने खनिज तेल व कॉफी तसेच कोको, साखर, जनावरांची हाडे इत्यादींची निर्यात होते. काही खनिजांचे व गंधकाचे साठेही याच्या परिसरात आढळून आले आहेत.
येथील हवामान उष्ण व दमट असून सरासरी तपमान २८० से. आहे. उत्तर व्हेनेझुएलातील शहरांशी राजमार्गाने हे शहर जोडण्यात आले असून दळणवळण जलद होण्यासाठी या शहरापासून माराकायव्हो सरोवरावर ७ किमी. लांबीचा एक पूल बांधण्यात आला आहे. येथे झूलिआ विद्यापीठ (स्था. १९४६) आहे. स्पॅनिश संस्कृती व आधुनिक उद्योगव्यवसाय, अमेरिकन इंडियन लोकविद्या व अर्वाचीन वास्तूकला यांसारख्या गुणवैधर्म्यांचा संगम या शहरात आढळून येतो.
अनपट, रा. ल.