माद्रिद : यूरोपमधील स्पेन देशाची राजधानी. लोकसंख्या ४७,२६,९८६ (१९८१ जनगणना). सस. पासून ६५० मी. उंचीवर एका पठारावर वसलेले माद्रिद म्हणजे यूरोप खंडातील सर्वांत जास्त उंचीवर राजधान्यांपैकी एक होय. स्पेनच्या जवळजवळ मध्यावर मांथानारेस नदीवर असलेले हे शहर माद्रिद प्रांताचीही राजधानी आहे.

स्पेनवर मुसलमानी अंमल असताना ‘माजरीत’ या नावाची मूर लोकांची गढी म्हणून याचा उल्लेख दहाव्या शतकात झालेला दिसतो. कॅस्टीलच्या सहाव्या आल्फॉन्सो याने १०८३ मध्ये मूर लोकांना येथून हाकलून लावले. कॅस्टीलची संसद (कॉर्तेस) येथे भरत असे. नंतर काही राजघराण्यांतील लोकही येथे राहू लागले.

दुसऱ्या फिलिपने (१५६१) येथे आपला दरबार भरविला, तर तिसऱ्या फिलिपने स्पेनची राजधानी म्हणून माद्रिदची निवड केली (१६०७). बूर्बाँ  कारकीर्दीत, विशेषतः  तिसऱ्या चार्ल्सच्या काळात (१८ वे शतक), याची भरभराट झाली. ग्रेट ब्रिटन, पोर्तुगाल व स्पॅनिश गनीम यांच्याविरुद्ध झालेल्या द्वीपकल्पीय युद्धात (पेनिन्शुलर वॉर) (१८०८–१४) फ्रान्सने याचा ताबा घेतला (मे १८०८). स्पॅनिश यादवी युद्धाच्या वेळी (१९३६–३९) २९ महिने जनरल फ्रँकोच्या सैन्याच्या वेढ्याला धैर्याने तोंड दिल्यावर माद्रिद पडले.

माद्रिदमध्ये मूळच्या मूरिश आल्काथारच्या जागेवर असलेला राजवाडा हे शहराचे केंद्रस्थान होय. जुने माद्रिद या राजवाड्याभोवती मर्यादित होते. शहराची वाढ प्रामुख्याने पूर्वेकडे होत गेली. १९४८ नंतर मात्र पश्चिमेकडील भागही वाढत गेला आहे. १९४८–५१ या तीन वर्षांत याची दसपट वाढ होऊन सु ५३१ चौ. किमी. वर शहर पसरले. शहराचे आल्तो (उच्च), सेंत्रल (मध्य) व बाजो (निम्न) असे साधारणपणे तीन बारीओ (विभाग) पाडले जातात. ही विभागणी स्थानाची उंची व लोकांचे राहणीमान यांवरून करण्यात आली आहे.

एकेकाळी स्पेनची सांस्कृतिक राजधानी असलेल्या माद्रिदमधील प्रादो नॅशनल म्यूझीयम हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. पंधराव्या ते एकोणिसाव्या शतकांपर्यंतच्या काळातील चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचे दालन हे वैशिष्ट्य आहे. जगातील सुविख्यात कलावीथींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कलावीथीमध्ये एल ग्रेको (१५४१–१६१४), रिबेरा (१५८८–१६५२), व्हेलाथ्केथ (१५९९–१६६०), मूरील्यो (१६१७–८२), गोया (१७४६–१८२८) यांसारख्या श्रेष्ठ स्पॅनिश चित्रकारांच्या कलाकृती संगृहीत असून इटालियन, फ्लेमिश, डच, जर्मन व ब्रिटिश कलासंप्रदायांतील सु. ३,००० उत्कृष्ट कलाकृतींपैकी निम्म्यांहून अधिक कलाकृतीचे प्रदर्शन पहावयास मिळते. नॅशनल पॅलेसमध्ये एक भव्य शस्त्रसंग्रहालय आहे. यांखेरीज शहरात इतरही संग्रहालये आहेत. माद्रिदमध्ये प्रशस्त उद्याने असून, काझ द काम्पो हे उद्यान विशेष उल्लेखनीय आहे. प्लाझा मॉन्युमेंटल हे स्पेनचे सर्वांत मोठे बैलझोंबीरंगण असून तेथे सु. २४,००० प्रेक्षक बसू शकतात. मार्च ते ऑक्टोबर या काळात माद्रिद विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबजलेले असते. मेच्या मध्यावर येणारा सान इसिद्रोचा सण हा विशेष महत्त्वाचाआहे; याच सुमारास ‘माद्रिद’ विरुद्ध ‘बार्सेलोना’ अशी सॉकर खेळाची वार्षिक स्पर्धा सुरू होते. शहरात सु. शंभर ग्रंथालये असून त्यांपैकी काहींत दुर्मिळ हस्तलिखितांचे संग्रह आढळतात. प्रशस्त रस्ते हे शहराचे वैशिष्ट्य होय. येथे एक शासकीय विद्यापीठ, तंत्रनिकेतन, स्वायत्त विद्यापीठ असून टपाल रेडिओ व दूरदर्शन यांद्वारे शिक्षण देणारे एक विद्यापीठही आहे.

माद्रिद हे स्पेनचे एक महत्त्वाचे व्यापारी आणि औद्योगिक केंद्रही आहे. येथे मोटारी व मालमोटारी यांची एंजिने, विद्युत व इलेक्ट्रॉनिकीय उपकरणे, प्लॅस्टिकच्या वस्तू, रबर, विमाने, प्रकाशीय वस्तू इ. उद्योगांचे कारखाने आहेत. देशातील लोहमार्गांचे हे केंद्र आहे. शहराच्या वाढत्या उपनगरांना व विस्ताराला योग्य दिशा देण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला आहे.

पंडित, अविनाश