न्यू बेडफर्ड :अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मॅसॅचूसेट्स राज्याच्या ब्रिस्टल परगण्यातील एक शहर आणि बंदर. लोकसंख्या १,०१,७७७ (१९७०). बुझार्ड्‍‍स उपसागराला मिळणाऱ्या अकुशनिट नदीच्या मुखावर वसलेले हे शहर लोहमार्गाने बॉस्टनच्या दक्षिणेस सु. ९० किमी., तर फॉल रिव्हर शहराच्या आग्नेयीस १९ किमी. वर आहे. १६५२ मध्ये प्लिमथ वसाहतकऱ्यांनी पहिली वसाहत तेथे केली व बेडफर्डचा ड्यूक याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या शहराला न्यू बेडफर्ड हे नाव दिले. क्रांतियुद्धात (१७७८) ब्रिटिश सैन्याकडून या शहरावर झालेल्या हल्ल्यात बरीच जाळपोळ झाली. त्यानंतर शहराचे पुनर्वसन होऊन १८४७ मध्ये याला शहराचा दर्जा प्राप्त झाला. या औद्योगिक आणि व्यापारी शहरात ठोक व किरकोळ अशा दोन्ही प्रकारचा व्यापार चालतो. कापड, विजेचे साहित्य, यंत्रे व त्यांचे सुटे भाग, रबर व काचेच्या वस्तू, तांब्या-पितळेच्या वस्तू व जहाज बांधणी, साबण, पादत्राणे तयार करणे इ. अनेक लहानमोठे उद्योगधंदे शहरात चालतात. १८२० च्या सुमारास देवमाशाच्या शिकारीबाबत जगातील प्रमुख केंद्रांत याची गणना होत असे. १८४६ मध्ये येथे पहिल्या कापडगिरणीची स्थापना होऊन सध्या ते कापडउद्योगाचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. येथून कापड, यंत्रे, दोरखंडे, पादत्राणे, तांब्या-पितळेच्या वस्तू, रबरी व काचेच्या वस्तू, वंगणतेल यांची निर्यात तर ताग, लाकूड, निर्मिति-वस्तू इत्यादींची आयात होते. येथील अनेक उद्याने, मैदाने, पुळण्या यांमुळे एक पर्यटन केंद्र म्हणूनही यास महत्त्व आहे. येथे असलेली ओल्ड डार्टमथ हिस्टॉरिकल सोसायटी व बोर्न व्हेलिंग म्यूझीयम, यादवी युद्धाच्या वेळी बांधलेल रॉडमन किल्ला आणि हर्मन मेलव्हिलच्या मॉबी डिक या जगद्‍‍‍विख्यात ग्रंथात उल्लेखिलेले सी-मेन्स बेथेल चर्च या वास्तू शहराच्या इतिहासाची साक्ष देतात.

चौधरी, वसंत