सँता मोनिका : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यातील एक निसर्गरम्य शहर. लोकसंख्या ८९,७३६ (२०१०). कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण भागात, पॅसिफिक महासागराच्या सँता मोनिका उपसागर-किनाऱ्यावर आणि याच नावाच्या पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी हे शहर वसले आहे. या शहराच्या पूर्वेस २४ किमी.वर प्रसिद्घ लॉस अँजेल्स शहर आहे. कर्नल आर्. एस्. बेकर व जॉन पी. जोन्स यांनी १८७५ मध्ये याची स्थापना केली. १८८६ मध्ये याला नगराचा तर १९०२ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला. शहराच्या स्थापनेपूर्वीच ४ मे १७७० रोजी कॅप्टन गॅस्पर द पॉर्तोला या स्पॅनिश समन्वेषकाने या स्थळाला भेट दिली असल्याचे मानले जाते. तो सेंट मोनिका दिन होता. एका आख्यायिकेनुसार पॉर्तोलाच्या एका सहयोगी योद्ध्याला येथे एक लहानसा धबधबा नजरेस पडला. तेव्हा त्याला सेंट मोनिका आपल्या ऑगस्टीन या स्वच्छंदी पुत्रासाठी अश्रू ढाळत असल्याची वदंता आठवली. म्हणून त्याने या स्थळाला सँता मोनिका असे नाव दिले.

पहिल्या महायुद्घानंतर येथे विमानांची निर्मिती करणाऱ्या डग्लस एअरक्रा फ्ट (मॅकडॉनेल-डग्लस) या कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीमुळेच शहरातील आधुनिक हवाई वाहतूक व संदेशवहन उद्योगाच्या विकासाचा पाया घातला गेला. साहजिकच इलेक्ट्रॉनिकी क्षेत्रात प्रगत उच्च संशोधनाला येथे चालना मिळाली. क्षेपणास्त्रे, विमानांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक सामग्री, प्रकाशीय उपकरणे, लाकडी सामान, मृत्तिकाशिल्प, रसायने, चामडी उत्पादने, प्लॅस्टिक व धातूच्या वस्तू बनविणे असे अनेक छोटे-मोठे उद्योग येथे चालतात. लॉस अँजेल्स ते इंडिपेन्डन्स लोहमार्गाचे हे पॅसिफिक महासागर किनाऱ्यावरील अंतिम स्थानक म्हणून विकसित झाले आहे. सॅन पेद्रो बंदराच्या विकासामुळे बंदर म्हणून सँता मोनिकाचे महत्त्व कमी झाले असले, तरी सागरकिनाऱ्यावरील एक निवासी व पर्यटनस्थळ म्हणून त्याची भरभराट झाली आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर अनेक अमेरिकन सिने अभिनेत्यांचे आणि उच्च पदस्थांचे राजप्रासादसदृश भव्य बंगले आहेत. शहरालगतच्या सागरकिनाऱ्यावर विस्तृत व सुंदर पुळणी असून पर्यटकांसाठी मनोरंजनाच्या अनेक सोयी, समुद्रस्नान व हौशी मासेमारीच्या सुविधा उपलब्ध आहेत. शहरालगत अनेक राज्य उद्याने असून किनाऱ्यावर असलेल्या पॅलिसेड्स राज्य उद्यानाचे सुंदर विहंगम दृश्य लगतच्या उंच सुळक्यावरून दिसते. येथे सँता मोनिका सिटी ज्युनिअर कॉलेज (स्था. १९२९) व जे. पॉल गेट्टी वस्तुसंग्रहालय आहे. येथील सँता मोनिका कलासंघ, सिंफनी वाद्यवृंद व संगीतिका मंडळामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सँता मोनिका नागरी प्रेक्षागृहात अधिवेशने व व्यापारी प्रदर्शने भरविली जातात.

चौधरी, वसंत