माघ – २ : हिंदू कालगणनेतील अकरावा महिना. यातील पौर्णिमेला चंद्र मघा नक्षत्राच्या सन्निध असतो, म्हणून याचे नाव माघ पडले आहे. तपस् हे याचे वैदिक नाव आहे. पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत माघस्नान करण्याची पद्धत आहे. शुद्ध पक्षात तिलचतुर्थी, उमाचतुर्थी, कुंदचतुर्थी, किंवा गणेशजन्म वसंतपंचमी अथवा श्रीपंचमी (लक्ष्मीची पूजा) रथसप्तमी (सूर्यपूजा), दासबोध जयंती (नवमी), माघस्नान समाप्ती (पौर्णिमा) तर वद्य पक्षात गाणगापूर यात्रा (प्रतिपदा) व महाशिवरात्र (चतुर्दशी) हे महत्त्वाचे दिवस असतात. माघी पौर्णिमेस शनी मेषेत, गुरु व चंद्र सिंहेत आणि सूर्य श्रवण नक्षत्रात असल्यास तो महामाघी योग होतो. यादिवशी ‘श्री’ या बीजमंत्राचा जप करतात. भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना, निवृत्तिनाथ जयंती तसेच मध्वाचार्य रामदासस्वामी, चांगदेव यांची समाधी इ. घटना या महिन्यातील आहेत.

ठाकूर, अ. ना.