माखिमोव्ह, न्यिकली अल्यिक्‌सांद्रव्ह्यिच : (२९ मार्च १८८०–९ मे १९५२). रशियन वनस्पतिवैज्ञानिक. कडक थंडीत व दुष्काळात टिकून राहण्याच्या वनस्पतींच्या क्षमतेविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यांचा जन्म सेंट पीटर्झबर्ग (आताचे लेनिनग्राड) येथे झाला व १९०२ साली त्यांनी तेथील विद्यापीठाची पदवी संपादन केली. १९०५ साली ते तेथील वनविद्या संस्थेत तर १९२१ साली मुख्य वनस्पतिसंग्रहोद्यानात दाखल झाले. तेथे त्यांनी वनस्पतिविषयक परिस्थितिविज्ञानाची प्रयोगशाळा स्थापन केली व १९२७ पर्यंत ते तिचे संचालक होते. ऑल-युनियन रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट ग्रोइंग या संस्थेत त्यांनीच स्थापन केलेल्या वनस्पति-क्रिया-वैज्ञानिक प्रयोगशाळेचेही ते संचालक होते (१९२५–३३). १९३३–३९ दरम्यान ते सराटव्ह येथील ऑल-युनियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट इकॉनॉमी या संस्थेच्या वनस्पति-क्रियावैज्ञानिक विभागाचे प्रमुख होते. ते सोव्हिएट ॲ‌कॅडेमी ऑफ सायन्सेसच्या वनस्पति-क्रियावैज्ञानिक संस्थेचे १९३६ मध्ये व्यवस्थापक व १९३९ साली संचालक झाले. १९४३–५१ या काळात ते मॉस्कोतील तिमिरियाझ्येफ ॲ‌ग्रिकल्चरल ॲ‌कॅडेमीच्या वनस्पति-क्रियाविज्ञान विभागाचे प्रमुख होते.

वनस्पतींच्या परिस्थितिवैज्ञानिक क्रियाविज्ञानाचे ते एक प्रमुख प्रवर्तक आहेत. प्रथम त्यांनी कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यारहित वनस्पतींच्या) श्वसनावर होणाऱ्या इजेच्या परिणामाचा अभ्यास केला. काष्ठयुक्त वनस्पतींच्या हिवाळ्यातील श्वसनाचेही त्यांनी अध्ययन केले. ते करीत असतानाच इतर वनस्पती तगू शकत नाहीत इतक्या कमी तापमानात सूचिपर्णि वृक्षांची पाने व हिवाळी कळ्या कशा जगतात, याविषयी त्यांना रस निर्माण झाला. अशा तऱ्हेने अतिशय थंडीतही जगण्याच्या वनस्पतींच्या क्षमतेविषयीच्या तेव्हाच्या कल्पना त्यांनी खोडून काढल्या. वनस्पतींचा हा गुणधर्म पर्यावरणावर अवलंबून नसून ती वनस्पतींची आंतरिक शक्ती असल्याचे त्यांनी प्रतिपादिले होते. यांशिवाय त्यांनी वनस्पतींचे परिस्थितिवैज्ञानिक क्रियाविज्ञान, वृद्धी, विकास, प्रकाशसंश्लेषण [घटक अणू वा रेणू यांच्यापासून प्रकाशाचा उपयोग करून रासायनिक क्रियेने अन्ननिर्मिती करणे ⟶ प्रकाशसंश्लेषण], प्रकाशावधिप्रभाव (२४ तासांच्या कालावधीत वनस्पतीवर पडणाऱ्या प्रकाशाला वनस्पतीकडून वाढ, प्रजोत्पादन इ. रूपांत मिळणारा प्रतिसाद) आणि वनस्पतिवृद्धीच्या नैसर्गिक आणि कृत्रिम चेतना यांविषयीचे संशोधनही केले.

संशोधनाशिवाय त्यांनी वनस्पति-क्रियाविज्ञानाच्या अनेक प्रयोगशाळा उभारल्या. शिवाय त्यांनी इंट्रॉडक्शन टू बॉटनी (१९१५), शॉर्ट कोर्स इन प्लँट फिजिऑलॉजी (१९२७), व्हॉट कॉझेस ड्राउट्स अँड हाऊ टू फाइट देम (१९५१) व हाऊ ए प्लँट लिव्हज (१९५१) हे ग्रंथ लिहिले. ते झेकोस्लोव्हाकियन ॲ‌ग्रिकल्चरल ॲ‌कॅडेमी (१९३४), रॉयल नेदर्लंड्स बोटॅनिकल सोसायटी (१९३६) व रशियन ॲ‌कॅडेमी ऑफ सायन्सेस (१९४६) या संस्थांचे सदस्य होते. मॉस्को येथे ते मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.