माकडशिंग : (इं. मंकीज हॉर्न लॅ. कॅरॅलुमा फिंब्रिॲटा कुल-ॲस्क्लेपीएडेसी). ही मांसल व सरळ वाढणारी ⇨ औषधी भारतातील पश्चिम भागात विशेषेकरून रुक्ष जागी आढळते. खोडाच्या तळापासून अनेक चौकोनी मांसल फांद्या येतात व त्यांवर लवकर गळून पडणारी लहान पाने येतात पानांच्या जागी त्यानंतर टोकदार दाते उरतात. फांद्यांच्या शेंड्यांवर किंवा त्यांजवळच्या पेऱ्यावर एकटी किंवा दोनतीन फुले जूनमध्ये येतात. पुष्पमुकुट चक्राकार व पाकळ्या जांभळट व फणीप्रमाणे दातेरी असतात. तोरणाच्या (पाकळ्यांवर वाढलेल्या उपांगांच्या वर्तुळाच्या) बाहेरच्या मंडलातील भाग तळात अरुंद व वर दुभागलेले, आतील भाग विशालकोनी व परागकोशास मागील बाजूस संलग्न असतात [⟶ फूल]. पेटिकासम फळे लांब (१०–१२ सेंमी.), गोलसर, निमुळती, गुळगुळीत व बहुधा एक-एकटी येत असतात. याची इतर सामान्य लक्षणे व फुलाची संरचना ⇨ ॲस्क्लेपीएडेसी वा रुई कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. खोडांचा उपयोग भाजीकरिता करतात. शोभेकरिता बागेत खडकाळ जागी लावण्यास ही उपयुक्त असते ह्या वनस्पतीच्या कॅरॅलुमा प्रजातीतील इतर तीन-चार जातीही भाजीकरिता वापरतात. कॅ. इड्युलिस ही जाती रक्तविकारावर उपयुक्त आहे तसेच ती शीतकर (थंडावा देणारी), कृमिनाशक व आरोग्यपुनःस्थापक आहे. हिचे ‘दुग्धा’ हे संस्कृत नाव हिच्या दुधी चिकावरून दिले असावे.
हर्डीकर, कमला श्री.