मांगला धरण : पाकिस्तानमधील झेलम नदीवरील एक बहूद्देशीय प्रकल्प. झेलम नदीवर मांगला गावाजवळ बांधलेले जगातील हे एक मातीचे प्रचंड धरण भारत-पाकिस्तान सरहद्दीवर आहे. झेलम नदीच्या पुराला आळा घालणे, पुराचे पाणी साठवून ते जलसिंचनासाठी वापरणे व वीजनिर्मिती या उद्देशांनी हे धरण बांधण्यात आले आहे. झेलम नगरापासून ३२ किमी. अंतरावरील या धरणाचे काम १९६७ मध्ये पूर्ण झाले. धरणाची लांबी ३,४०० मी., उंची ११६ मी., जलाशयाची लांबी ६४ किमी. व जलधारणक्षमता ७२५ कोटी घ. मी. आहे. १९७० नंतर जलविद्युत्‌निर्मितीस प्रारंभ झाला असून वीज उत्पादनक्षमता ६·५ लक्ष किवॉ. होती. ही क्षमता १९८० पर्यंत ३० लक्ष किवॉ. इतकी वाढविण्याची योजना आखण्यात आली. वीज-घरातील पाणी अपर झेलम कालव्यात सोडून त्याचा सिंचनासाठी वापर केला जातो.

मुख्य धरणाशिवाय जलाशयाच्या दक्षिणेस वीज उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने आणखी तीन धरणे बांधण्यात आली आहेत.  मीरपूर, धुलियाल वसाहत व २१४ खेडी या धरणाखाली गेली असून त्यामुळे ८१,००० लोकांचे पुनर्वसन करावे लागले. प्रमुख मासेमारी केंद्र, उत्तम प्रर्यटनस्थळ म्हणून मांगला सरोवर प्रसिद्ध आहे. सरोवरात जलविहारासाठी व मासेमारीसाठी मोटारनौकांची सुविधा उपलब्ध आहे.

चौधरी, वसंत