मॅपल : (लॅ. ॲसर कुल-ॲसरेसी). हे इंग्रजी नाव ॲसर या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एका प्रजातीतील सु. २०० जातींना दिले आहे. ॲसर प्रजातीचा अंतर्भाव ॲसरेसी या लहान कुलात डिप्टेरोनिया व निगुंडो या दोनच प्रजातीबरोबर केला जातो काही शास्त्रज्ञ निगुंडो ही स्वतंत्र प्रजाती मानीत नाहीत. ॲसर व डिप्टेरोनिया या दोन्ही प्रजातींतील काही वनस्पतींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) उत्तर क्रिटेशस (सु. १२ ते ९ कोटी वर्षांपूर्वी पासूनच्या कालखंडातील) खडकांत आढळतात ते पाने व फळे यांचे आहेत. इओसीन आणि मायोसीन (सु. ५·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील यांचे जीवाश्म विपुल व विविध प्रकारचे आहेत त्यांपैकी काहींचे विद्यमान जातींशी साम्य आढळते. ॲसरेसी कुलाचा अंतर्भाव ⇨ सॅपिंडेलीझ किंवा अरिष्ट गणात करतात. ⇨ सॅपिंडेसी वा अरिष्ट कुलाशी याचे आप्तभाव आहेत. ॲसर प्रजातीतील जातींचा प्रसार उत्तर अमेरिका, मध्य व पूर्व आशिया, यूरोप व उत्तर आफ्रिका इ. प्रदेशांत आहे हिमालयात २,४००–३,१०० मी. पर्यंत आणि आसाम व ब्रह्मदेश येथील डोंगराळ मुलखात कित्येक जाती आढळतात तसेच चीन, जपान, जावा आणि सुमात्रा येथेही काही जाती सापडतात. क्वीन्सलँड मॅपल (फ्लिंडडर्सिया ब्रेलियाना) व मॅक्वेरी मॅपल (क्रिप्टोकॅरिया ऑब्लॅटा) यांचा ॲसर प्रजातीशी काही संबंध नाही मात्र मॅपलप्रमाणे त्यांचे इमारती लाकूड उपयुक्त असते. खऱ्या मॅपलचे लाकूड जमिनीकरिता विशेषेकरून वापरीत असल्याने याला कुट्टिमदारू (कुट्टिम = जमीन, दारू = लाकूड) हे संस्कृत नाव सुचविलेले आढळते. ॲसरच्या ॲ. स्यूडोप्लॅटॅनस या जातीला सिकॅमूर मॅपल म्हणतात हा मध्य यूरोप व पश्चिम आशियातील महत्त्वाचा इमारती लाकडाचा वृक्ष आहे पंजाबातील डोंगराळ प्रदेशात याची लागवड केली आहे. नॉर्वे मॅपल (ॲ प्लॅटॅनॉइड्स) हा ब्रिटनमध्ये सामान्यपणे शोभेकरिता लावला जातो.
मॅपल ही वनस्पती वृक्ष किंवा झुडूप असून पाने साधी, अखंड, कधी त्रिखंडी-पंचखंडी (विभागून अंशतः तीन किंवा पाच भाग झालेली). क्वचित संयुक्त, हस्ताकृती (पंजासारखी), दातेरी व प्रकुंचित (टोकांकडे थोडी थोडी निमुळती होत गेलेली) असतात [⟶ पान]. फुले नियमित, बहुयुतिक (एकलिंगी व द्विलिंगी), लहान, लाल, नारिंगी किंवा हिरवट असून ती पानांपूर्वी, बरोबर किंवा नंतर विविध प्रकारच्या फुलोऱ्यांवर येतात. फुलांत संदले व प्रदले बहुधा सुटी व प्रत्येकी पाच केसरदले आठ (कधी दहा) किंजदले बहुधा दोन क्वचित तीन व जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ असून [⟶ फूल] फळ शुष्क (कपालिका), पंखयुक्त, जोडीने येते व प्रत्येकात एक बी असते. फळाला ‘किल्ली’ या अर्थाचे इंग्रजी नाव साधारणपणे आकारसाम्यामुळे दिले असावे.
रॉक किंवा शुगर मॅपल (ॲ.सॅकॅरम), ब्लॅपक मॅपल (ॲ. नायग्रम) व फ्लोरिडा मॅपल (ॲ. बार्बॅटम) यांना कठीण मॅपल म्हणतात. त्यांपैकी शुगर मॅपल विशेष महत्त्वाचा आहे. न्यू फाउंडलंड ते उत्तर डकोटा आणि दक्षिणेस जॉर्जिया व टेक्ससपर्यंत याचा प्रसार आहे. हा वृक्ष २७–३६ मी. उंच असून याच्या जड, कठीण, बळकट, फिकट तपकिरी व गुलाबी लाकडाचा उपयोग तक्ते, सजावटी सामान, जमीन, वाद्ये, खेळांचे साहित्य, कपाटे इत्यादींकरिता करतात. तो ३००–४०० वर्षे जगतो. ब्लॅक मॅपलचे लाकूडही साधारण तसेच असते. या दोन्ही जातीपासून ‘मॅपल सिरप’ हा गोड रस मिळतो. ईशान्य अमेरिकेत झाडे प्रसुप्तावस्थेत (फेब्रुवारी ते मार्चमध्ये) असताना त्यांच्या खोडांपासून (सालीवर खोल जखम केली असता) गोड रस मिळतो तो जमा करून नंतर आटवतात. ३०–५० लिटर रसापासून १ लिटर मॅपल सिरप बनते. ते पेय खाद्य पदार्थांत (उदा., मिठाई व आइसक्रीम) व सिगारेटच्या तंबाखूत घालतात. प्रत्येक वृक्षापासून १–२ किंग्रॅ. मॅपल शर्करा मिळते. रेड मॅपल (ॲ. रुब्रम) व सिल्व्हर मॅपल (ॲ. सॅकॅरिनम) हे मध्यम आकाराचे वृक्ष नरम मानले जातात ते सावली व शोभेकरिता लावतात लाकूडही इतर मॅपलप्रमाणे उपयुक्त असते. बिगलीफ मॅपल (ॲ. मॅक्रोफायलम) हा सु. ३० मी. उंच असून त्याला व्यापारी महत्त्व आहे. चिनी मॅपल (ॲ. ट्रंकॅटम) शोभेकरिता लावतात. जपानी मॅपल (ॲ. पामेटम) ची लालसर किरमिजी व खंडित पाने शोभेत भर टाकतात. ॲ. ऑब्लाँगम हा हिमालयातील वृक्ष डेहराडूनमध्ये शोभेकरिता लागवडीत आहे. ॲ. मॉनो (पंजाबी नाव कांझल) याची पाने क्षोभक (आग करणारी) आणि साल स्तंभक (आकुंचन करणारी) असते. हा वृक्ष वायव्य हिमालयात सिंधूपासून आसामपर्यंत १,२४०–२,७९० मी. उंचीपर्यंत आढळतो. (चित्रपत्र ५६).
संदर्भ : 1. Arnold, C. A. An Introduction to Paleobotany, New York, 1947.
2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.
3. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
4. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1953.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“