महाश्मयुगीन संस्कृति : प्रागितिहास कालात विशेषतः इ. स. पू. दुसऱ्या-पहिल्या सहस्रकांत यूरोपात जी मोठमोठ्या ओबडधोबड शिळांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धती होती त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा महाश्मयुगीन संस्कृती (मेगॅलिथिक कल्चर) ही सर्वसाधारण संज्ञा देण्यात येते. मानवी सांस्कृतिक इतिहासात महाश्मयुग वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे ठरलेले आहे. त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत : (१) या संस्कृतीचे अवशेष जगात जवळपास सर्वत्र मिळतात आणि महाश्मयुगीन दफन पद्धतीशी संलग्न असलेल्या काही प्रथा सद्यस्थितीत काही ठिकाणी प्रचलित आहेत. (२) या संस्कृतीचा काल निरनिराळ्या प्रदेशांत निरनिराळा आहे. उदा., यूरोपमध्ये या संस्कृतीचा काल इ. स. पू. तिसरे-दुसरे सहस्रक एवढा असला, तरी भारतात उपलब्ध पुराव्यानुसार तो इ.स.पू. पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात या आधी फारसा जात नाही. यूरोपात या संस्कृतीचा काल सांस्कृतिक दृष्ट्या नवाश्मयुग व ताम्रपाषाणयुग एवढाही काही ठिकाणी प्राचीन आहे. या उलट भारतात ही संस्कृती पूर्णतः लोहयुगीन काळातीलच आहे.
या संस्कृतीचे जनक कोण, याबद्दल निश्चित माहिती नाही. याबद्दल अनेक मते प्रचलित आहेत. मात्र सर्व ठिकाणी ही महाश्मयुगीन स्मारके मानवी दफनाशी संबद्ध आहेत. यूरोपातील फार मोठा प्रदेश या संस्कृतीने व्यापला आहे तथापि भारताप्रमाणेच यांची वसतिस्थाने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे या संस्कृतीशी निगडीत असलेले अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिलेले आहेत.
भारतातील महाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने आणि मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतात उपलब्ध झाले आहेत. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या भागांत महाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांनी उभारलेली दफने मोठ्या प्रमाणावर आजही पहावयास मिळतात. दक्षिण भारत सोडून ती दवसा (जयपूर जिल्हा-राजस्थान), खेरी, देवधूरा, तसेच अलाहाबाद, मिर्झापूर, बनारस या जिल्ह्यांत (उत्तर प्रदेश), लेह (काश्मीर) व सिंगभूम जिल्हा (बिहार) येथेही अस्तित्वात आहेत. बलुचिस्तान व मकरान, वाघोदूर, मुराद मेमन (वायव्य सरहद्द प्रांत ) या प्रदेशांतही महाश्मयुगीन अवशेष उपलब्ध झाले आहेत. या शिवाय पूर्व भारतात बस्तरपासून आसामपर्यंत महाश्मयुगीन दफने वा दफन पद्धती अस्तित्वात आहेत परंतु ही दफने भारतातील इतर महाश्मयुगीन अवशेषांपेक्षा थोडी वेगळी आहेत आणि ती आग्नेय आशियातील ऑस्ट्रोएशियाटिक लोकांनी आपल्या संस्कृतीचा एक विशेष म्हणून भारतात प्रचलित केली असावीत, असे तज्ञांचे मत आहे.
भारतात महाश्मयुगीन संस्कृतीचे तीन प्रादेशिक विभाग पडतात : (१) दख्खन, (२) उत्तर व वायव्य प्रदेश आणि (३) ईशान्य प्रदेश. भारतातील या भागांव्यतिरिक्त बलुचिस्तान आणि मकरान येथील अवशेषही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या भागातील महाश्मयुगीन दफनात एककेंद्रीय चक्राचे चित्रण असलेली मृद्भांडी, लोखंडाच्या वस्तू व घोड्याचे अवशेष सापडतात. या प्रादेशिक महाश्मयुगीन संस्कृतीचा एकमेकींशी काही संबंध होता किंवा कसे व तो असल्यास त्याचे स्वरूप काय होते, याबद्दल निश्चित पुरावा उपलब्ध नाही आणि अवशिष्ट पुराव्याबद्दलही एकमत नाही. ईशान्य भारतातील महाश्मयुगीन दफनांची पाहणी केल्यावर असे आढळून आले की विद्यमान परिस्थितीत अशा प्रकारची पद्धत त्या प्रदेशातील आदिवासी जमातींत प्रचलित आहे. परंतु भारतीय उपखंडातील इतर भागातील महाश्मयुगीन अवशेषांबद्दल फारसे विस्तृत संशोधन झालेले नाही.
भारतात महाश्मयुगीन दफनांच्या विविध पद्धती आढळून येतात : शिळावर्तुळ, शिळावर्तुळातील पेटिका-दफन इत्यादी. या दफन पद्धतीव्यतिरिक्त काही आणखी प्रकारही सापडलेले आहेत. त्यांत शैलोत्कीर्ण खोल्यातील दफने केरळमध्ये आढळतात तर कर्नाटकातील काही भागात मार्गयुक्त पेटिका-दफने सापडली आहेत. शिळावर्तुळे सर्वांत जास्त ठिकाणी एकवटल्याचे स्थान महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील खैरबांडा हे होय. दफनातील ही विविधता बऱ्याच प्रमाणात स्थानिक रीत्या उपलब्ध असलेल्या-प्रस्तर, शिळा, दगडगोटे, फरशा या सामग्रीमुळे आलेली आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. या विविध प्रकारांना इंग्रजीत भिन्न नावे दिलेली आढळतात: केर्न सर्कल, सिस्ट सर्कल, मेनहीर, डॉलमेनॉइड सिस्ट, टोपीकल इत्यादी. योजनाबद्ध शिळारचना, कुंभात केलेले दफन इ. प्रकार दक्षिण भारतात आढळून येतात. उत्तर भारतात तुलनात्मक दृष्ट्या महाश्मयुगीन दफने कमी आहेत.
या महाश्मयुगीन दफनांत लोखंडाचा विपुल वापर केलेला असून त्याबरोबर काळी आणि तांबडी मृत्पात्रे सापडतात. घोड्याचेही दफन मृत व्यक्तीबरोबर काही वेळा केलेले दिसून येते. काळ्या आणि तांबड्या मृत्पात्रांव्यतिरिक्त दक्षिण भारतात विटकरी तांबड्या पृष्ठभागावर पिवळसर-पांढरट रंगात रेखाकृती चित्रण केलेली मृद्भांडीही दफनांत आढळून येतात. त्याचप्रमाणे लोखंडाशिवाय तांबे, कांस्य व सोने या धातूंचाही वापर या महाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांना माहीत होता, हे दफनात सापडलेल्या विविध धातूंच्या वस्तूंवरून सिद्ध झाले आहे. दक्षिण भारतात अदिचनल्लूर येथील महाश्मयुगीन दफनात विविध तऱ्हेचे लोखंडाचे भाले, त्रिशूळ, कट्यारी, शूल, तलवारी इ. मिळलेल्या असून नागपूरजवळील माहुरझरी येथील शिळावर्तुळाच्या उत्खननात लोखंडी छिन्न्या, भाले, चपट्या कुऱ्हाडी, तलवारी, कट्यारी, त्याचप्रमाणे कढ्या, बांगड्या व नखण्या मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त नक्षी असलेली तांब्याची कडी, सोन्याची कर्णफुले व कंठमाला इ. वस्तूही मिळाल्या. यांपैकी एक कट्यार वैशिष्ट्यपूर्ण असून तिचे पाते लोखंडाचे व मूठ तांब्याची आहे. या व्यतिरिक्त घोड्याच्या तोंडावर घालावयाचे व बहुधा चामड्यावर शिवलेले तांब्याच्या पत्र्यांचे बनविलेले अलंकारही घोड्याच्या अवशेषांबरोबर सापडले. मृत्पात्रांत सर्वसामान्यतः वाडगे, थाळ्या, निमुळत्या बुडाची भांडी असून त्यांच्या झाकण्यांवर कळ्यांची अथवा चार पक्ष्यांची आकृती छोट्या आकारात करून त्या झाकण्यांच्या शीर्षावर बसवल्याचे आढळून आले.
दफनात आढळून आलेल्या पुराव्यांवरून हे लोक भटके होते का? असा प्रश्न पडतो तथापि त्यात फारसे तथ्य नाही. या लोकांनी तलाव बांधले, भातशेती मोठ्या प्रमाणावर रूढ केली इ. महत्त्वाच्या बाबी द. भारतातील संगम वाङ्मयातील उल्लेखावरून प्रचलित असाव्यात असे दिसते. महाश्मयुगीन दफनपद्धतीच्या काही प्रकारांचा उल्लेखही संगम वाङ्मयात आलेला आहे मात्र घरेदारे व वसाहती यांच्या स्वरूपाबद्दलचा पुरावा अद्याप फारसा उपलब्ध झालेला नाही. अगदी अलीकडे महाराष्ट्रात नागपूरजवळील नैकुण्ड व भागी माहारी या ठिकाणी झालेल्या उत्खननात या लोकांच्या गोल झोपड्यांचे अवशेष त्याचप्रमाणे लोखंड बनवायच्या भट्ट्या व गहू, तांदूळ, जव व वाटाणे या धान्यांचे अवशेष सापडले आहेत.
दक्षिण भारताच्या महाश्मयुगीन दफनांत अनेक ठिकाणी अपूर्ण वा विछिन्न स्वरूपात मानवी सांगाडे वा मानवी हाडे मिळालेली आहेत. त्यामुळे मानवशास्त्रज्ञांचे त्याबद्दल एकमत झालेले नाही. मस्की, येलेश्वरम्, नागार्जुनकोंडा, चंद्रावल्ली आणि पेरूम्बैर या ठिकाणी संपूर्ण सांगाडे उपलब्ध झालेले आहेत. काही दफनात एकाहून जास्त व्यक्तींचे सांगाडे तर काहीत अनेक व्यक्तींची हाडे एकत्रित करून ठेवली असल्याचे आढळून आले. यांतील काही दफने एका कुटुंबातील व्यक्तींची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तमिळनाडूतील अदिचनल्लूर येथील दफनात सापडलेल्या एका सांगाड्याची वांशिक वैशिष्ट्ये ऑस्ट्रेलॉइड वंशाशी मिळती जुळती होती, तर दुसऱ्याची द्राविड वंशाशी समान होती. या उलट आंध्र प्रदेशातील ब्रम्हगिरी व येलेश्वरम् येथील सांगाडे ऑस्ट्रेलॉइड वंशाव्यतिरिक्त इतर वंशाच्या व्यक्तींचेही असल्याचे दर्शवितात. इराणमधील नेक्रोपोलिस बी-सियाल्क येथे सापडलेल्या सिथोइराणियन वंशाच्या सांगाड्याशी ब्रह्मगिरी व येलेश्वरम् येथील सांगाडे वांशिक दृष्ट्या साम्य दाखवितात.
क्रिस्टोफ फ्यूरर-हायमेनडॉर्फ या मानवशास्त्रज्ञाच्या मते महाश्मयुगीन लोक द्राविडी भाषा बोलणारे होते. बल्लुचिस्तानातील ब्राहूई ही द्राविडी भाषेचाच एक आविष्कार मानली जाते. यामुळे महाश्मयुगीन दफनांची भौगोलिक व्याप्ती द्राविडी भाषीयांच्या भौगोलिक व्याप्तीशी मिळती जुळती आहे, असे काहीसे विवादास्पद मांडले गेले आहे.
महाश्मयुगीन संस्कृतीचा भारतातील काल आतापर्यंत तरी प्रामुख्याने दक्षिण भारतातील या संस्कृतीच्या संदर्भात उपलब्ध झालेल्या कार्बन-१४ कालमापनानुसार बराचसा निश्चित करण्यात आला आहे. विसाव्या शतकाच्या मध्यास सर मॉर्टिमर व्हीलर यांनी ब्रह्मगिरीच्या उत्खननाच्या आधारे महश्मयुगीन संस्कृतीचा काल इ.स.पू.सु. २०० ते इ. स. पहिल्या शतकाचा मध्य असा वर्तविला. काही महाश्मयुगीन दफनांत रोमन नाणी सापडल्यामुळे या दफनांचा अंतिम काल इसवी सनाचे पहिले शतक असा निश्चित करता येतो तथापि हल्लूर (कर्नाटक) व टाकळघाट (महाराष्ट्र) येथील पुराव्यांच्या कार्बन –१४ पद्धतीनुसार आलेल्या सनावळ्या अनुक्रमे इ.स.पू. ९५० ± १०० व ११०५ ± १०० आणि इ.स.पू. ५५५ ± ११५ व ६०५ ± ११० अशा असल्याने महाश्मयुगीन संस्कृतीचा प्रारंभकाल कमीतकमी इ.स.पू.सु. १००० इतका मागे नेता आलेला आहे. उत्तर भारतातील महाश्मयुगीन स्थलांच्या कार्बन –१४ पद्धतीनुसारच्या सनावळ्या फारशा उपलब्ध नाहीत. अगदी अलीकडे नैकुण्ड येथे इ.स.पू. ६९२ ± १०५ अशी सनावळी उपलब्ध झालेली आहे.
भारतातील महाश्मयुगीन संस्कृतीच्या उद्गमाच्या संदर्भात इराणमधील पुरावा लक्षणीय आहे. इराणमध्ये सियाल्क येथील महाश्मयुगीन दफने व लोहाचा वापर इ.स.पू.सु. १००० ते ८०० या काळातील आहे. हे कालखंड अत्यंत सूचक आहेत. यावरून सियाल्कचा पश्चिमेशी आणि इराणचा भारताशी महाश्मयुगीन संस्कृतीच्या संदर्भात संबंध जोडता येईल, असे पुरातत्त्वज्ञांना वाटते.
दक्षिण भारतातील महाश्मयुगीन दफणात वैशिष्ट्यपुर्ण काळी-आणि-तांबडी मृत्पात्रे सिंधू संस्कृतीच्या मृत्पात्रांबरोबर त्याचप्रमाणे नंतरच्या कालातही सापडलेली आहेत. मात्र उत्तर भारतातील या मृत्पात्रांचा दक्षिण भारतातील महाश्मयुगीन मृत्पात्रांशी सांस्कृतिक दृष्ट्या काही संबंध आहे किंवा कसे हे सांगता येत नाही.
उत्तर भारतात लोखंडाचा कालनिबद्ध पुरावा उत्तर प्रदेशातील अत्रंजी खेडा येथे उपलब्ध झाला आहे. कार्बन-१४ कालमापनानुसार तो. इ.स.पू. १०२५ ± ११० या काळातील आहे. बिहारमधील चिरांद येथिल उत्खननात आढळलेल्या लोहाचा कार्बन-१४ मापित काल इ.स.पु. ७६५ ± १०० असा आहे यावरून उत्तर भारतातही लोहयुगाची सुरुवात इ.स.पु. पहिल्या सहस्त्रकाच्या सुरुवातीस झाली, असे मानता येईल.
साहजिकच असे अनुमान निघते की उत्तर भारतातील लोहयुग, दक्षिण भारतातील लोहयुग आणि महाश्मयुगीन संस्कृती यांबद्दलचे प्रश्न अद्यापही निर्णायक अवस्थेस पोहोचलेले नाहीत.
यूरोपात महाश्मयुगीन संस्कृती नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग यांच्याशी निगडित आहे. त्या ठिकाणी महाश्मयुगीन स्मारके उपलब्ध झालेली आहेत. स्टोनहेंज व बॅरोज (इंग्लंड), कारनॅक (फ्रान्स) तसेच स्पेन, पोर्तुगाल व आयर्लंड या विभागांतील महाश्मयुगीन स्मारके प्रख्यात आहेत.
संदर्भ : 1. Childe, V. Gordon The Dawn of European Civilization, New York, 1961.
2. Daniel, G. E. The Megalithic Builders of Western Europe, London, 1963.
3. Daniel, G. E. The Prehistoric Chamber Tombs of France, London, 1960.
4. Deo, S. B. Problem of South Indian Megaliths, Dharwar. 1973.
5. Krishnaswami V. D. Megalithic Types of South Indian, Ancient India, No. 5, New Delhi, 1949.
6. Werwich, Robert, The Monument Builders : The Emergence of man, Time –Life International, Netherlands, 1974.
देव शां. भा.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..