ओल्डुवायी गॉर्ज : आफ्रिकेच्या टांझानिया प्रदेशातील पुराणाश्मयुगीन अवशषांचे प्रसिद्ध स्थळ. ते व्हिक्टोरिया सरोवराच्या आग्‍नेयीकडील सेरेगेटी ह्या सु. १,५२५ मी. उंच गवताळ पठाराच्या पूर्वेस असलेल्या सुप्रसिद्ध खचदरीत आढळले. ओल्डुवायी नदीच्या पाणलोटाने धुपून जाऊन उघड्या पडलेल्या थरांत एल्. एस्. बी. लीकी यांना १९५९ मध्ये अश्मीभूत मानवी अवशेष सापडले. त्या मानवास त्यांनी झिंजॅनथ्रपस हे नाव दिले. यात मोठे दात व कवटीचे तुकडे होते. या माणसाचा काळ इ. स. पू. सु. १७ लाख असावा, असा तज्ञांचा अंदाज आहे. याच्याबरोबर दगडी हत्यारे, त्रिदळी खूर असलेल्या घोड्याचे व तत्कालीन हत्तीचे अश्मीभूत अवशेषही मिळाले. त्यापेक्षाही प्राचीन अशा होमो  हॅबिलिस या मानवाचे १८ १/४ लाख वर्षांपूर्वीचे अवशेषही तेथेच मिळाले आहेत. दगडांची हत्यारे प्रथम एका बाजूस छिलके  काढून नंतर त्याविरूद्धच्या बाजूची  छिलके काढून धारदार कडा केलेली आढळतात. यातूनच पुढे दगडी हातकुऱ्‍हाड बनविली गेली असावी. त्यामुळे ॲबेव्हिलियन काळापासून ते उत्तर ॲश्युलियन काळापर्यंतचा उत्क्रम मिळाला आहे.

संदर्भ :Grosvenor, M.B., Ed. National GeographicNovember, 1966, Washington, 1966.

देव, शां. भा.