मलिक, सैय्यद अब्दुल : (१६ जानेवारी १९१९− ). आधुनिक असमिया कथाकार, कादंबरीकार व कवी. जन्म पूर्व आसामामधील नाहरनी (जि. सिबसागर) ह्या खेडेगावी. आरंभीचे शिक्षण नाहरनी येथे व महाविद्यालयीन शिक्षण कॉटन कॉलेज गोहाती येथे. एम्.ए. झाल्यानंतर १९५१ पासून ते जोरहाट येथील जे. बी. महाविद्यालयात असमिया भाषासाहित्याचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले.
आधुनिक असमिया साहित्यात एक आघाडीचे लोकप्रिय कथाकार व कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. काही कविता व नाटकेही त्यांनी लिहिली आहेत तथापि कथाकार व कादंबरीकार म्हणूनच त्यांची प्रतिमा ठळक आहे. त्यांनी विपुल लेखन केले. १४ कथासंग्रह, ३७ कादंबऱ्या, ४ नाटके व २ काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत.१९६५ मध्ये त्यांना ‘सोविएत लँड नेहरू पुरस्कार ’ मिळाला. रशियाचा प्रवासही त्यांनी केला. रशियाच्या प्रवासातील आठवणी त्यांना नियतकालिकांतून क्रमशः प्रसिद्ध केल्या. त्यांच्या आघरी आत्मर काहिनी ह्या कादंबरीस १९७३ मध्ये साहित्य अकादेमी-पुरस्कार प्राप्त झाला. राज्यसभेचेही ते सदस्य होते. आसाम साहित्य सभेचे अध्यक्ष, साहित्य अकादेमीचे सदस्य इ. मानाची पदेही त्यांनी भूषविली.
मलिक यांनी दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात सु. २० वर्षे सातत्याने व मोठ्या निष्ठेने कथालेखन केले. कथालेखनाकडून ते कादंबरीलेखनाकडे यशस्वीपणे वळले. अत्यंत तरल संवेदनशीलता, अपार सहानुभूती व सामाजिक जाणिवांचे भान ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. आरंभी त्यांच्या लेखनाची प्रेरणा स्वच्छंदतावादी होती तथापि नंतर मनोविश्लेषण आणि सामाजिक जाणिवांतून ते लेखन करू लागले.
आधुनिक असमिया कथालेखनांत ते आघाडीचे आणि अत्यंत लोकप्रिय कथाकार म्हणून गणले जातात. त्यांच्या कथालेखनतंत्राचा विकास स्पष्टत्वे दिसून येतो. त्यांचे कथातंत्र प्रभावी, समृद्ध आणि वाचकांस खिळवून ठेवणारे आहे. स्वच्छंदतावाद, मनोविश्लेषण व समाजिक जाणिवा हे त्यांतील महत्त्वाचे टप्पे होत. त्यांच्या बहुतांश कथांतून लैंगिकतेचा−विशेषतः नागर तरूण−तरूणींतील−विषय मनोविश्लेषणाच्या आधारे हाताळलेला दिसतो. विविध मानसिक प्रवृत्ती, मानसिक दुबळेपण, चंचलता, प्रस्थापित नीतिमूल्यांपासूनचे अधःपतन, परिस्थितीची कोंडी व त्याविरूद्ध प्रतिक्रिया इत्यादींचे मार्मिक व प्रभावी चित्रण ते कथांतून करतात. ‘शेष उपकूलर सेलुवा पार’, ‘प्राण हेरोवार पाचत’, ‘जोवार आरू उपकूल’, ‘मरहा पापरि’ ह्या कथांतू त्यांनी मनोविश्लेषणाधारे स्त्री-मनाची मनोज्ञ उकल करून दाखविली. निषिद्ध वा अनैतिक पण दुर्दम्य अशा प्रेमाचेही त्यांनी अनेक कथांतून मोठ्या सहानुभूतीचे चित्रण केले. शुचिता, पावित्र्य, नीती इ. मूल्ये ही शाश्वत नसून स्थल-काल-परिस्थितीसापेक्षच असतात, असे ते कलात्मकपणे सूचित करतात. पारसमणि (१९४६), रंगा-गरा (१९५३), मरम्-मरम्-लागे (१९६१), शील आरू सिखा (१९६१) इ. त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह होत.
मलिक यांच्या रथर चकरि घूरे (१९५०) आणि वनजुई (१९५४) ह्या सुरवातीच्या कादंबऱ्यांतील अंतःप्रवाह स्वच्छंदतावादी असल्याचे स्पष्टपणे जाणवते. पहिल्या कादंबरीतील राजकीय प्रेरणा प्रभावी असून ती काहीशी आत्मचरित्रपर आहे. छवी घर (१९५८) ह्या त्यांच्या कादंबरीत मनोविश्लेषण व सामाजिक जाणिवा व्यक्त होतात तथापि प्रायोगिकतेच्या आहारी गेल्याने ती फसली आहे.
सुरजमुखीर स्वप्न (१९६०) ही त्यांची अत्यंत यशस्वी व उत्कृष्ट कादंबरी होय. काहीशी स्वच्छंदतावादी वळणाची ही कादंबरी. गुला हा तिचा तरूण नायक १५ वर्षे वयाच्या तारा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी विवाह करू इच्छितो तथापि ताराची प्रौढ आई कपही ही गुलाची फसवणूक करते व आपल्या मुलीऐवजी स्वतःचाच गुलशी विवाह जुळवून आणते. ह्या कादंबरीस धनसिरी नदीची पार्श्वभूमी मलिक यांनी अत्यंत प्रभावीपणे वापरली आहे. नदीच्या पार्श्वभूमीवर असमियात अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या पण त्यांत सुरजमुखीर स्वप्न ही सर्वोत्कृष्ट म्हणावी लागेल. नदीचा मानवी जीवनावर झालेला सखोल परिणाम तीत प्रभावीपणे सतत जाणवत राहतो. कपिलीपरिया साधु या कादंबरीमध्ये चंचल सौंदर्याचे चित्रण आहे. जियाजुरीर घाट (१९६०) ही त्यांची काहीशी अश्लील पण प्रकर्षाने मानवी जीवनाशी अतूट नाते असलेली कादंबरी. कंठहार (१९६१), अन्य आकाश अन्य तरा (१९६२), रूपतीर्थर जत्री (१९६३), आघरी आत्मर काहिनी (१९७२) इ. त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या होत.
राजद्रोही (१९५८) हे त्यांचे नाटक असून त्यात त्यांनी ‘सतराम’ ह्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेस आधुनिक कालाच्या म्हणजे लोकक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नवा अर्थ प्राप्त करून दिला आहे. त्यांचे दोन काव्यसंग्रह असून त्यांत सामाजिक जाणिवेच्या प्रेरणेतून लिहिलेल्या कविता संगृहीत आहेत. फुलसर्जार रति हा त्यांतील विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह होय.
सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
“